मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

(कष्टाची कमाई)


(कथा क्र. ३७) 

ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला ठकवणे त्याचे नित्याचे काम झाले होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. कधी आजारात खर्च होत असे तर दुकानदारीत कधी खोट येत असे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची कि बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला कि सून जे म्हणते आहे त्याची परिक्षा घेवून बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपड्यात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. बरेच लोक येत जाता त्या कपड्याकडे बघत पण कोणीही उचलून नेले नाही. सर्वांच्या पायात लागत होते म्हणून एका माणसाने ते तसेच उचलले आणि तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका मच्छिमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेंव्हा तिच्या पोटात कापडात बांधलेले सोन्याचे गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. अनेक महिन्यांनी आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खुश झाला. आता त्याचा सूनबाईच्या बोलण्यावर विश्वास बसला कि इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानिचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खुश होवून त्या मच्छिमारांना चांगले बक्षीस दिले व सुनेला शाबासकी दिली. 



तात्पर्य- कष्टाने कमावलेल्या धनाने मानसिक शांतता, सुख मिळते तर   बेइमानीने मिळवलेल्या धनाने अनेक वाईट गोष्टी घडून येतात.
वर्तमानपत्रातून संग्रहित

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

(माणूस व देश)


(कथा क्र. ३६)  

इनामदार सर शाळेत फार प्रसिद्ध होते. कारण ते नेहमी आपला विषय जरा वेगळ्या पद्धतीने शिकवीत असत. इनामदार सर हे राष्ट्रभक्त होते. त्यांना आपला देश, मातृभूमी याबद्दल प्रेम होते. ते एक उपक्रमशील शिक्षक असल्याने त्यांनी एकेदिवशी मुलांना असाच एक उपक्रम सांगितला. भारताचा नकाशा ! भला मोठा नकाशा असलेला एक कागद त्यांनी बरोबर आणला. त्यावर विविध प्रांतांच्या हद्दी निरनिराळ्या रेषांनी दाखविल्या होत्या, शिवाय नकाशाच्या चित्राच्या मागेसुद्धा एक चित्र सरांनी काढला होता. मग त्यांनी कात्री घेतली, त्यामागील भागावर जे चित्र होतं, त्या चित्राचे जे निरनिराळे भाग होते त्यानुसार त्या चित्राचे तुकडे कापले, अर्थातच भारताच्या नकाशाचेही तुकडे झाले, मग सर म्हणाले, "मुलानो! आता हे तुकडे एकत्रित करा आणि भारताचे नकाशाचे चित्र पूर्ण करा," सारे विद्यार्थी सरसावले, हे तुकडे वेडेवाकडे कापले गेले होते.बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना ते चित्र जोडणे जमले नाही. त्याच वर्गात सलील नावाचा विद्यार्थी होता. तो पुढे आला आणि म्हणाला," सर मला एक संधी द्या मी चित्र पूर्ण करतो." सलील तुकडे जोडू लागला, त्याने नकाशाच्या बाजूने चित्र जोडले नाही तर मागील चित्राच्या बाजूने चित्र जोडायला सुरुवात केली, भारताचा नकाशाच्या मागच्या बाजूला माणसाचा चित्र इनामदार सरांनी काढला होता. सलीलने माणसाचं चित्र जोडला आणि भारताचा नकाशा तयार झाला. इनामदार सरांनी सलील ला शाबासकी दिली आणि म्हणाले, "देश म्हणजे सीमा नाहीत तर देश म्हणजे माणूस, माणूस जोडला कि आपोआपच देश जोडला जातो." 

तात्पर्य- माणसांचे हितसंबंध चांगले असले कि देशाची एकात्मता सिद्ध होते. 
वर्तमानपत्रातून संग्रहित

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

(भोजन आणि मौन)


(कथा क्र.३५) 

कथा सिद्धार्थाच्या जीवनाशी निगडीत आहे. तेंव्हा ते बुद्धत्वाला गेले नव्हते आणि ते निरंजना नदीच्या काठी जंगलात वृक्षाखाली ध्यान करीत असत. सिद्धार्थ ध्यान केल्यानंतर जवळच्या गावात जावून भिक्षा मागून आणत असत. काही दिवसानंतर त्यांनी भिक्षा मागायला जाणे बंद केले. कारण एका गावात गावप्रधानाची छोटी मुलगी सुजाता त्यांना भोजन आणत असे. सिद्धार्थाना ती मोठ्या प्रेमाने भोजन देत असे. काही दिवसानंतर त्याच गावातला एक गुराखीही प्रभावित होवून सिद्धार्थांकडे येवू लागला. त्याचे नाव स्वस्ति होते. एके दिवशी सिद्धार्थ स्वस्तिबरोबर चर्चा करीत होते. तेवढ्यात सुजाता भोजन घेवून आली. भोजन सुरु करताच त्यांनी चर्चा बंद केली. भोजन संपेपर्यंत ते गप्पच होते. तेथे शांतता पसरली. स्वस्ति या सिद्धार्थांच्या वागण्याने हैराण झाला. त्याने सिद्धार्थांचे भोजन आटोपल्यावर विचारले,"गुरुदेव ! मी आल्यानंतर आपण भरपूर चर्चा केली पण भोजनाच्या वेळी आपण एकही शब्द बोलला नाहीत, याचे कारण काय?" सिद्धार्थ म्हणाले,"भोजन निर्मिती मोठ्या कष्टाने होते. शेतकरी जमिनीची मशागत, नांगरणी करतो, बी पेरतो, रोपांची देखरेख करतो, धान्य तयार होते. त्या धान्यासाठी आपण धन खर्चतो, धान्य घरी आल्यावर ते निवडून टिपून त्याचे सुंदर असे अन्न तयार होते. घरातील महिला सुग्रास असे भोजन तयार करते. इतक्या कष्टाने तयार झालेल्या अन्नाचा आनंद आपण शांततेने तेंव्हाच घेवू शकू जेंव्हा आपले मन शांत असेल. त्यामुळे माझे मन शांत राहण्यासाठी मी भोजन करताना शांत राहतो आणि त्यामुळे माझे मन शांत राहते आणि अन्नाचा अपमान न होता मी त्या कष्टाने मिळवलेल्या सुग्रास अन्नाचा आनंद घेवू शकतो." 

तात्पर्य - शांततेत केलेले भोजन हे न केवळ भूक मिटविते तर मानसिक आनंद आणि सात्विक ऊर्जाही देते . 


=============
वर्तमानपत्रातून संग्रहित
=============


सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

(बुद्धीबळ)


(कथा क्र. ३४) 

एक पंडित एकदा एका राजाकडे गेला व त्याला म्हणाला,"महाराज ! मी आवाहन करतो कि या राज्यातील कोणीही माझ्याशी वादविवाद करावे. जर मी जिंकलो तर मला हजार होन द्यावे आणि मी हरलो तर मी राजाचा गुलाम म्हणून राहीन." राजाने ते आवाहन स्वीकारले. वादसभा सुरु झाली, पंडित हा त्या राजाच्या जनतेपेक्षा खूप हुशार निघाला. त्याने सर्वाना हरविले. आता पंडिताला बक्षीस म्हणून हजार होन देण्याची वेळ आली तेंव्हा राजा म्हणाला,"पंडितजी! तुम्ही मला कुठे हरविले आहे? " हे ऐकताच पंडित म्हणाला,"महाराज! आपण राजे, मी आपल्याला कसा काय हरविणार?" राजा म्हणाला,"अहो! मी कुठे तुम्हाला वादविवाद करायला सांगतो आहे. तुम्ही माझ्याशी बुद्धिबळ खेळा, जर तुम्ही जिंकलात तर दोन हजार होन मी देईन आणि मी जिंकलो तर तुमचा शिरच्छेद करेन." पंडिताने हे ऐकले आणि तो घाबरला त्याला बुद्धिबळ खेळता येत नव्हते. पंडित म्हणाला,"महाराज, मला आपल्याइतकं चांगलं बुद्धिबळ खेळता येणार नाही, तेंव्हा मी मरणार हे निश्चित आहे. तेंव्हा माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. तेंव्हा मरण्यापूर्वी माझ्या कुटुंबाची सोय व्हावी म्हणून मला तांदूळ द्या अशी विनंती करतो." राजा म्हणाला,"किती पाहिजे तितके मागा देतो!" पंडित म्हणाला," महाराज! पण तांदूळ देताना मला असे द्या कि या बुद्धिबळाच्या पटाने मोजून द्या. म्हणजे पहिल्या घरात जर एक दाणा असेल तर दुसऱ्या घरात दोन थोडक्यात दुपटीने तांदळाची संख्या वाढवून मला द्या." राजाला हे सोपे वाटले त्याने ते मान्य केले. राजाला गणित लक्षात आलं नाही. बुद्धिबळाच्या बत्तिसाव्या घरात जेंव्हा तांदूळ मोजणी चालू झाली तेंव्हा तांदळाची संख्या झाली होती २१४ कोटी. हे देण्यासाठी राजाचा पूर्ण खजिना रिता करावा लागणार होता. हे पाहून राजाने पंडितापुढे हात टेकले व त्याची योग्य सन्मानाने बोळवण केली. 



तात्पर्य- बुद्धीचातुर्यामुळे अवघड समस्येवर मात करता येते.
वर्तमानपत्रातून संग्रहित

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३

(मोहोर आणि बियाणे)


(कथा क्र. ३३) 

अंबाप्रसाद नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना दोन मुलगे होते. एकाचे नाव होते लक्ष्मिधर आणि दुसऱ्याचे भूपाल. लक्ष्मिधरला नावाप्रमाणेच संपत्तीची हाव होती तर भूपाल हा भूमातेची सेवा करण्यात धन्यता मनात असे. अंबाप्रसाद हे आता वृद्ध झाले होते. त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी करायचे ठरविले, राहता वाडा त्यांनी एका शाळेसाठी देवून टाकला. दोन्ही मुलांसाठी त्यांनी दोन पर्याय तयार केले होते. एका बाजूला हंडाभर मोहोरा आणि एका बाजूला माळरान जमीन आणि तीन पोती बियाणे. मग त्यांनी दोन्ही मुलांना बोलावले आणि सांगितले. ह्या दोन गोष्टीपैकी एकाची निवड करण्यास सांगितले, लक्ष्मिधरने विचार केला, माळरान आणि बियाणे घेवून शेती कुठे करत बसणार त्यापेक्षा आपण मोहोरांचा हंडा घेवू आणि त्या पैशाने वाडा विकत घेवून आयुष्यभर सुखात राहू. त्याने तो पर्याय स्वीकारताच भूपालाकडे दुसरा पर्याय नव्हताच. त्याने आनंदाने आपल्या वडिलांची ती देणगी स्वीकारली. अंबाप्रसादांचे काही दिवसातच निधन झाले. त्यांच्यानंतर ठरल्याप्रमाणे वाटण्या झाल्या. लक्ष्मिधरने नवीन घर घेतलं. तो चैनीत राहू लागला. भूपाल मात्र माळरान जमीन कसण्यासाठी तयार झाला. त्याने ती जमीन नांगरली, खूप कष्ट घेतले, मशागत केली, वडिलांकडून मिळालेलं बियाणे पेरले. जमीन चांगली होतीच पण कसलेली नसल्याने माळरान झाली होती. जमीन पिकाने बहरली, शेतं डोलू लागली, सुगी झाली आणि भूपालचे घर म्हणजे धान्याचे कोठार झाले, लक्ष्मिधर मात्र संपत्ती उधळत होता आणि मोहोरा संपवून दरिद्री होत होता. भूपाल मात्र सुखाने राहू लागला. वडिलांची देणगी त्याला समजली होती. 



तात्पर्य - केवळ संपत्तीपेक्षा श्रमाचं धन उपयोगी येतं. श्रम हे मानवाला संपत्ती मिळवून देतात हेच खरे. 
वर्तमानपत्रातून संग्रहित

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

(काल्पनिक मर्यादा)


(कथा क्र.३२) 

गरुडाचे अंडे एका कोंबडीच्या पंखाखाली ठेवले, यथावकाश अंडे उबवल्यावर त्यातून गरुडाचे पिल्लू पडलं. पण ते सदासर्वकाळ कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर राहत असल्याने त्याने स्वत:ला कधीच ओळखले नाही व ते स्वत:ला कोंबडीचे पिल्लू समजू लागले. कोंबडीच्या पिल्लांच्या अनुकरणामुळे घाणीत अडकलेले धान्याचे कण वेचणे, कर्कश्य आवाज करत इकडेतिकडे हिंडणे यातच त्याचा वेळ जावू लागला. त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे. कारण डौलदारपणे उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे त्याचा लक्ष गेलं आणि बरोबरीच्या कोंबडीच्या पिल्लांना त्याने विचारला,"हा कोणता पक्षी आहे? किती उंच उडतो आहे? त्याचा रुबाब सुद्धा पाहण्यासारखा आहे." हे एकच त्यातील कोंबडीचे पिल्लू त्याला म्हणाले," तो गरुड पक्षी आहे. अतिशय सामर्थ्यवान पक्षी! पण आपल्याला कुठे त्याच्यासारखा उडायला येणार.कारण आपण पडलो कोंबडीची पिल्ले. तू पण त्यातलाच एक.त्यामुळे त्याचा रुबाब हा फक्त बघ." अशा या उत्तराने गरुडाच्या पिल्लाचे समाधान झाले. त्याने काहीही विचार न करता स्वत:ला कोंबडीचे पिल्लू मानून घेतलं. आपण हि कोंबडी आहोत असेच गरुडाचे पिल्लू म्हणू लागले. स्वत:ला ओळखण्याच्या दृष्टीअभावी स्वत:चा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही, तो एका कोंबडीचे पिल्लू म्हणून जन्माला आला आणि कोंबडीचे पिल्लू म्हणूनच मेला. ! यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादेमुळे अपयशी जीवन जगावे लागले.



तात्पर्य- आपल्यातील कर्तुत्वाला वाव आपणच दिला पाहिजे, आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाहीत तर अपयशाचे धनी व्हावे लागते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

(कर्तव्याचे पालन करा)


(कथा क्र. ३१) 

एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्र मंत्र साधना करू लागला, अनेक वर्षे लोटली, एकेदिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला, डोळे उघडल्यावर पाहतो ते काय! एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले, हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले.त्याक्षणी तो कावळा जळून खाक झाला. आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जावून आवाज दिला. पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला तेंव्हा एका स्त्रीने म्हटले," महाराज! थोडा वेळ थांबा! मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले,"दुष्टे! तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहित आहे काय?" हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली," माहित आहे! तुम्ही शाप देताल. परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा! तू माझे काही बिघडवू शकत नाही." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली तेंव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेंव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता ? असा प्रश्न केला. तेंव्हा ती म्हणाली,"आपली साधना तीच असते आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही." हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व सन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला. 



तात्पर्य- प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य योग्यपणे करावे.
वर्तमानपत्रातून संग्रहित

सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

(कौतुक आणि शिक्षा)


(कथा क्र.३०) 

एक नावाजलेली शाळा होती. सगळे शिक्षक कामसू आणि विद्यार्थीप्रिय होते. चित्रे गुरुजी हे चित्रकला शिक्षक होते. विद्यार्थ्यांना चित्रकला शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या वर्गात सगळे विद्यार्थी चांगले होते फक्त एक सोडून. तो विद्यार्थी जरा वेगळा होता. तो काम करणे यापेक्षा काम टाळणे, चुकारपणा करणे यासाठी प्रसिद्ध होता. एकदा असं झालं कि, चित्रे गुरुजींनी मुलांना धावत्या आगगाडीचं चित्र काढायला सांगितलं. सगळ्या मुलांनी भराभर कागद घेतले, पेन्सिली, खोडरबर, रंगीत खडू घेवून चित्र काढण्यास सुरुवात केली. चित्रे गुरुजींनी चित्र तासामध्ये पूर्ण करायला सांगितलं होतं. धावती आगगाडी काढायची म्हणजे रूळ, इंजिन, गाडीचा दाबा, पिस्टन, डब्यांच्यामधील जोडणी काढायला हवी होती मात्र आपले हे चुकार महाशय मात्र गप्पच बसले होते. गुरुजींनी विचारले, "कारे तुला चित्र काढायचं नाही का?" तो म्हणाला "हो! काढणार आहे. मी वेळेतच चित्र पूर्ण करणार आहे." तास संपायला दहा मिनिटे शिल्लक होती. त्याने भराभर चित्र काढले, तासाची घंटा वाजली, सर्व मुलांनी चित्र पूर्ण करून दिली, चुकार मुलानेही चित्र पूर्ण करून दिलं. त्यांना चित्र असं काढलं होतं, एक बोगदा काढला होता, या बाजूला रुळाची टोकं आणि गाडीच्या डब्याचा भाग. गुरुजींनी चित्र बघितलं आणि म्हणाले,"अरे मी तर धावत्या गाडीचं चित्र काढायला सांगितलं होतं, मग हे काय काढलस?" चुकार मुलगा म्हणाला,"गाडी धावतेच आहे, पण ती बोगद्यात आहे." गुरुजींनी सर्वाना गुण दिले पण याच्या चित्राला गुण दिले नाहीत, तो म्हणाला, "गुरुजी मला गुण केंव्हा देणार" गुरुजी म्हणाले,"तुझी गाडी बोगद्यातून बाहेर आल्यावर मी तुला गुण देईन" गुरुजींनी त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले पण कामचुकारपणाबद्दल शिक्षा हि केली. 

तात्पर्य- कोणतेही काम मन लावून करावे.
वर्तमानपत्रातून संग्रहित

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

(चिलटांचा प्रताप)


(कथा क्र. २९) 

एका गावाजवळ एक मोठा तलाव होता. त्याच्या पलीकडे अरण्य होते. तलावात खूप पाणी होते. तलावात जास्त पाणी झालं तर ते गावात येवू नये म्हणून तलावाला एक बांध घातला होता. तलावाचा गावाला खूप फायदा होता. गावातले लोक अंघोळीला, धुण्याला, जनावरांसाठी हेच पाणी वापरत असत. तलावाच्या पलीकडच्या बाजूला काही झाडं होती. शेराची झाडं होती. त्या झाडाझुडपामध्ये बरेच कीटक होते. तसेच चिलटेहि होती. कधी कधी या चिलटांचा जथाच्या जथा तलावावर येत असे. तलावाच्या दुसऱ्या बाजूला एक साधू राहत असे. तो हि रोज तलावावर येत होता. तो रोजच आपल्या अंगावरील उपरणे काढून या चिलटाना हाकलून लावायचा. एक साधू पलीकडच्या काठावर उभारून चिलटे हाकलतो, हे काही तरुण मुले बघत होती आणि एकमेकात त्याची टिंगल करत होती. साधू मात्र रोज निष्ठेने हे काम करीत असे. एक दिवस साधू आजारी होता. त्याला तलावावर यायला जमले नाही. त्याच दिवशी नेमके जंगलातले दोन हत्ती पाणी पिण्यासाठी तलावापाशी आले. तलावावर भरपूर चिलटे घोंगावत होती. ती त्या दोन हत्तींच्या डोळयापाशी, कानापाशी, सोंडेत जावून घिरट्या घालू लागली. हत्ती यामुळे चिडले, त्यांना ती चिलटे मारता येईनात. हत्ती सैरावैरा पळू लागले. त्यात त्यांच्या पायांनी तलावाचा बांध फुटला. तलाव फुटला, गावात पाणी शिरले, घरं बुडाली, मानसं हवालदिल झाली. चिलटांच्या प्रतापामुळे सगळा गाव संकटात सापडला. तेंव्हा टिंगल करणाऱ्या मुलांना साधूच्या त्या चिलटे हाकलण्याच्या छोट्याशा कृतीचे अपरंपार महत्व समजले. 

तात्पर्य- छोट्याशा कृतीचेसुद्धा काही वेळेला खूप महत्व असते / छोटीशी चूकही मोठ्या संकटाना आमंत्रण देते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित


शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

(संत आणि शिष्य)


(कथा क्र. २८) 

एका संताच्या आश्रमात शेकडो गाई होत्या. त्या गाईच्या उत्पन्नातून ते आश्रम चालवीत असत. एकेदिवशी एक शिष्य म्हणाला,"गुरुजी! आश्रमाच्या दुधात दररोज पाणी मिसळण्यात येत आहे." संताने ते रोखण्यासाठी त्याला उपाय विचारला तेंव्हा तो म्हणाला, "एक कामगार ठेवू, तो दुधाची देखरेख करेल," संताने ते मान्य केले. दुसऱ्याच दिवशी कामगार नेमण्यात आला. तीन दिवसानंतर तोच शिष्य येवून संताला म्हणाला,"या कामगाराची नियुक्ती केल्यापासून दुधात जास्तच पाणी मिसळले जात आहे." संताने म्हटले,"आणखी एका व्यक्तीची नियुक्ती करा तो पहिल्या कामगारावर लक्ष ठेवेल" आणि तसेच करण्यात आले. परंतु दोन दिवसानंतर आश्रमात गोंधळ उडाला, सर्व शिष्य संताकडे येवून म्हणाले,"आज दुधात पाणी तर होतेच पण त्याबरोबर एक मासाही आढळून आला," तेंव्हा संत म्हणाले," तुम्ही भेसळ रोखण्यासाठी जितके कामगार ठेवलं तितकी भेसळ जास्त होईल. कारण प्रथम या अनैतिक कामात कमी कामगारांचा सहभाग असतो तेंव्हा पाणी कमी असते, एक कामगार वाढल्याने त्याचा हिस्सा ठेवून पाणी अधिक मिसळले जावू लागले, इतके पाणी मिसल्यावर त्यात मासा नाही तर लोणी येईल." तेंव्हा शिष्यांनी यावर उपाय विचारला तेंव्हा संत म्हणाले,"यासाठी त्यांची कामावर निष्ठा वाढवावी लागेल तर ते काम प्रामाणिकपणे करतील."

तात्पर्य- प्रतिबंध लावण्याऐवजी मार्गदर्शन केल्याने, विचार बदलल्याने व्यक्ती कुमार्ग सोडून सन्मार्ग धरतील. 

वर्तमानपत्रातून संग्रहित