सोमवार, २४ फेब्रुवारी, २०१४

सोन्‍याची कुदळ

कथा क्र,182

एका माणसाला दोन मुले होती जेव्‍हा तो म्‍हातारा झाला. तेव्‍हा त्‍याने आपल्‍या दोन्‍ही मुलांना बोलावले आणि म्‍हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्‍यापूर्वी मी तुम्‍हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्‍यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्‍ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्‍याकडे काहीच राहणार नाही. त्‍यामुळे धन-संपत्ती घ्‍यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्‍यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्‍यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्‍यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्‍यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्‍याला खोटे का सांगितले? मग त्‍याच्‍या आत्‍म्याने म्‍हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्‍य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्‍याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला.

तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते. 

मानवता

कथा क्र, 181

जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’ संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही


तात्‍पर्य:-ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

देवतांचा अहंकार

    कथा क्र. 180     

उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्‍वराने देवांवर कृपा केली आणि त्‍यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्‍यावर प्रत्‍येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्‍यातील प्रत्‍येक जण विजयाचे श्रेय स्‍वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्‍छ मानत असे. यामुळे देवतांमध्‍ये विनाकारण वाद चालु झाले. त्‍यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्‍वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्‍यातील वैमनस्‍य यांना पराजित करेल. ही समस्‍या सोडविण्‍यासाठी ईश्‍वर एक विशाल यक्षाच्‍या रूपात देवतांच्‍या समोर हजर झाले. देवतांनी आश्‍चर्याने त्‍यांना पाहिले आणि त्‍यांचा परिचय करून घेण्‍यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्‍यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्‍वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्‍वी अग्नि आहे. मी ठरवल्‍यास सारी पृथ्‍वी जाळून भस्‍म करून टाकीन.'' यक्षाने त्‍यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्‍यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्‍यासाठी गेले. तेव्‍हाने यक्षाने त्‍यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्‍हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्‍यांना उडवण्‍यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्‍यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्‍वराचा परिचय दिला. आता देवतांना त्‍यांच्‍या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्‍यांचा अहंकार नष्‍ट झाला. 

तात्‍पर्य :- अहंकार आणि अहंका-याचे पतन निश्चितच होते. आपली शक्ती योग्‍य कार्याला लावल्‍यास सार्थक होत असते.


राम आणि भरत

कथा क्र. 179

रावणाचा वध करून राम अयोध्‍येला परत आले आणि त्‍यांचा राज्‍याभिषेक झाला तेव्‍हा एक दिवस एका सभासदाने भरताला विचारले की आपण रामासाठी इतका मोठा त्‍याग केला आणि रामही आपल्‍याला प्राणप्रिय समजतात मग असे काय कारण आहे की आपल्‍याला सर्वात मागे स्‍थान देण्‍यात आले आहे? भरत म्‍हणाले,'' जे झाड कडू असेल त्‍याची सर्व पाने, फळे व फुले कडू असतात, माझ्या मातेने रामाला वनवासाला पाठवून पाप केले होते. तिचा पुत्र असल्‍यामुळे त्‍या पापाच्‍या कडवटपणातून मी कसा अलिप्त राहू शकतो? त्‍यामुळे मला मागचे स्‍थन देण्‍यात आले आहे.'' जेव्‍हा सभासदाने रामाला भरताचे हे विचार सांगितले तेव्‍हा रामचंद्र म्‍हणाले,''भरताचे हे विचार ठीक नाहीत, अयोध्‍येला परतल्‍यावर मी भरताला म्‍हटले होते की, उद्यापासून तू माझे छत्र घेऊन माझ्या मागे उभा राहा. कोणीही राजा तोपर्यत राजा राहू शकतो जोपर्यत त्‍याचे छत्र सुरक्षित आहे.'' सभासद आता विचारात पडला की कोणाचे विचार खरे मानावे? त्‍याने परत जाऊन भरताला रामाचे विचार ऐकवले. भरत म्‍हणाले,''रामचंद्र तर आपल्‍या लहानातल्‍या लहान सेवकाचीही प्रशंसा करत असतात. खरे तेच आहे जे मी तुम्‍हाला सांगितले.'' सभासद गोंधळला त्‍याने रामाला पुन्‍हा जाऊन भरताचे विचार सांगितले तेव्‍हा रामचंद्र म्‍हणाले,'' प्रेम आणि त्‍यागाच्‍या युद्धात मी भरताकडून हरलो, मी आपला पराभव स्‍वीकारून त्‍याला पाठ दाखविली, त्‍यामुळे तो पाठीमागे आहे. त्‍याचे मागे होणे हे त्‍याच्‍या महानतेचे लक्षण आहे.


तात्‍पर्य :- त्‍याग, सेवा आणि भक्ती हे तीन सूत्रे धरतीवर रामराज्‍य साकार करू शकतात. धन्‍य ते प्रभू रामचंद्र आणि त्‍यांचे बंधू 

राजा आणि मुंगळा

कथा क्र. 178

एका जंगलात एक मुंगळा आपल्‍या बिळात राहत होता. एकदा त्‍या देशाचा राजा त्‍या जंगलात शिकार करण्‍यासाठी आला. सा-या मुंग्‍यांचे घर राजाच्‍या सैनिकांच्‍या घोड्यांच्‍या चालण्‍याने उद्ध्‍वस्‍त झाले. त्‍यामुळे मुंग्‍यांची राहण्‍याची समस्‍या निर्माण झाली. त्‍यांची अंडीही नष्‍ट झाली. मुंग्‍यांची लहान पिलेही मेली. आपली जात आणि वंश नष्‍ट झालेला पाहून मुंग्‍यांच्‍या सरदाराला फारच राग आला. त्‍याने राजाचा बदला घेण्‍याचे ठरविले. तो जंगलातून राजाच्‍या महालाकडे निघाले. रस्‍त्‍यात त्‍याला एक अस्‍वल गाठ पडले. त्‍याने मुंगळयाला विचारले,'' कुठे निघाला सरदार?'' मुंगळयाने सर्व हकीकत अस्‍वलाला सांगितली. अस्‍वलाला पण राजाचा राग आला. तो पण मुंगळयाबरोबर निघाला. पुढे जाताना घोडा, हत्ती, उंट, माकड, वाघ, कोल्‍हा, लांडगा, तरस आणि अनेक प्राणी गाठ पडले. त्‍या सर्वांना हा राजाकडून झालेला अत्‍याचार कळाला व ते सर्वच जण मुंगळयाच्‍या सरदारासोबत राजाकडे निघाले. महालाच्‍या दारावर पोहोचल्‍यावर मुंगळ्याने राजाला युद्धासाठी पुकारले. आवाज ऐकून राजाने महालाच्‍या खिडकीतून खाली पाहिले तर तो इतकी मोठी प्राण्‍यांची फौज पाहून राजा घाबरला. त्‍याने कारण जाणून घेतले व आपली चूक मान्‍य केली. मुंगळ्याबरोबर त्‍याने तह केला त्‍यात मुंगळ्याच्‍या राहण्‍याच्‍या भागात त्‍याने मनुष्‍यास फिरण्‍यास बंदी केली व मुंगळ्याने राजाला झुकण्‍यास परावृत्त केले.


तात्‍पर्य :- संघटनेत मोठी ताकद असते. एकत्र राहिल्‍यास मोठ्यातल्‍या मोठ्या संकटाचा सामना करता येतो. 

संत उमर आणि भटका माणूस

कथा क्र. 177

सूफी संत उमर बगदादमध्‍ये राहत होते. त्‍यांच्‍या ख्‍यातीने प्रभावित होऊन मोठया संख्‍येने लोक त्‍यांच्‍याकडे येत असत. ते सर्वानाच प्रेमाने भेटायचे आणि प्रसन्न व संतुष्‍ट करायचे. एकदा एक भटका माणूस त्‍यांच्‍याकडे भेटण्‍यासाठी आला. जेव्‍हा तो उमर यांच्‍या निवासस्‍थानी पोहोचला तेव्‍हा त्‍याला दिसले की, संत उमर हे एक फकीर म्‍हणवतात पण त्‍यांचे बसायचे आसन हे सोन्‍याचे आहे. खोलीला सगळीकडे जरीचे पडदे लावलेले आहेत आणि रेशमी दो-यांची सजावट होती. दो-यांच्‍या खालील बाजूस सोन्‍याचे घुंगरू बांधलेले होते. चहुकडे सुगंधी अत्तराचा वास दरवळत होता. थोडक्‍यात काय विलास आणि वैभवाची छाया या फकीराच्‍या घरावर पसरलेली दिसत होती. उमर काही बोलण्‍याच्‍या आधीच हा भटका माणूस त्‍यांना म्‍हणाला,'' मी आपली फकीरी ख्‍याती ऐकून आपल्‍या दर्शनासाठी आलो होतो पण येथे आल्‍यावर माझी निराशा झाली. आपण फकीरी सोडून वैभवाचा सागर पसरलेला दिसून येतो आहे.'' संत उमर हसले आणि म्‍हणाले,''हे मात्र खरे आहे, पण तुझी हरकत नसेल तर हे सर्व सोडून मी तुझ्याबरोबर यावयास तयार आहे.'' भटका तयार होताच, उमर यांनी सर्व सोडून नेसत्‍या कपड्यांनिशी ते भटक्‍याबरोबर निघाले. काही अंतर जाताच भटका एके ठिकाणी थांबला व उमर यांना म्‍हणाला,'' तुम्‍ही इथेच थांबा, मी माझा भिक्षेचा कटोरा तुमच्‍या घरी विसरलो आहे. तेवढा मी परत जाऊन घेऊन येतो.'' उमर मोठमोठ्याने हसू लागले आणि भटका अचंबित झाला. त्‍याला काही कळेना की तो असा काय वेगळे बोलला की उमर एवढे मोठ्याने हसताहेत. मग उमर म्‍हणाले,'' अरे मित्रा, तुझ्या सांगण्‍यावरून मी माझे सर्व ऐश्‍वर्य सोडून या रानावनात हिंडायला तयार झालो मात्र तुझी त्‍या कटो-याची आसक्ती मात्र सुटली नाही. मनात जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत मनुष्‍य मोठा होत नाही हे मात्र खरे'' भटक्‍याला आपली चूक कळाली व त्‍याने संतांची माफी मागितली


तात्‍पर्य :- मोहाने लालसा वाढते आणि ती संग्रहवृत्तीला प्रोत्‍साहन देते.

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

परोपकार

                 कथा क्र.176              

फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एका राजाने दुस-या राजासाठी एक पत्र आणि एक भेटवस्‍तू पाठविली. पत्रात लिहीले होते की या भेटवस्‍तूचे मोल तुम्‍ही अधिक जाणून घ्‍याल. ती भेटवस्‍तू म्‍हणजे एक सोन्‍याची डबी होती आणि त्‍या डबीमध्‍ये एक डोळ्यात घालावयाचे अंजन होते. या अंजनाचे महत्‍व तुम्‍ही जाणून घ्‍या. आमच्‍या राज्‍यात या अंजनाचे महत्‍व अनन्‍यसाधारण आहे कारण हे अंजन डोळयात घालताक्षणी आंधळयाचे अंधत्‍व दूर होते आणि त्‍याला सर्व काही दिसू लागते. राजाने हे पत्र वाचताच तो विचारात पडला. कारण त्‍याच्‍या राज्‍यात नेत्रहीनांची संख्‍या भरपूर होती आणि डबीत पाठवलेले अंजन तर फक्त दोन डोळ्यांना पुरेल इतकेच होते. राजा ते अंजन आपल्‍या प्रियजनांसाठी वापरू इच्छित होता जेणेकरून त्‍याच्‍या मर्जीतील कोणीतरी हे जग पाहू शकेल. तेवढ्यात राजाला लक्षात आले की त्‍याचे एक वृद्ध मंत्री काही महिन्यांपासून कामावर येणे बंद झाले आहेत. कारण वृद्धत्‍वामुळे त्‍यांचे दोन्‍ही डोळे अधू झाले होते आणि त्‍यांना काही दिसत नव्‍हते. पण हे मंत्री अतिशय हुशार, प्रजाहितदक्ष, प्रामाणिक आणि चतुर होते. ते कामावर न आल्‍यामुळे राजालाही काही निर्णय घेणे अवघड जात होते. वडीलधारे असल्‍याने त्‍यांच्‍या सल्‍याने राज्‍यकारभार चालविणे राजाला सोपे जात होते. असा बुद्धिमान मंत्री केवळ अंधत्‍वामुळे घरी बसून होता हे राजाला पाहवले नाही. त्‍याने त्‍या मंत्र्याला घेऊन येण्‍यासाठी सेवक पाठविले. सेवक मंत्रीमहोदयांना घेऊन दरबारात आले. राजाने मंत्र्याला सगळी कहाणी सांगितली व त्‍याच्‍या हातात ती अंजन असलेली सोन्याची डबी देऊन सांगितले, केवळ तुम्‍हीच याचा वापर करा. जेणेकरून तुम्‍हाला दिसू लागेल व राज्‍याला तुमच्‍या सल्‍याचा फायदा मिळेल. मंत्र्याने ती डबी हातात घेतली व तो म्‍हणाला,''महाराज आताच्‍या आता येथे राजवैद्याला बोलावणे धाडावे.'' राजाला काहीच कळेना की मंत्री असा काय सांगत आहे. राजाने वैद्यबुवांना बोलावून घेतले व मंत्र्याच्‍या समोर उभे केले. मंत्र्याने सोन्‍याची डबी उघडली व त्‍यात दोन बोटे घातली. दोन्‍ही बोटावर लागलेल्‍या अंजनापैकी एक त्‍याने स्‍वत:च्‍या डोळयाला लावले. त्‍याक्षणी मंत्र्याला एका डोळ्याने दिसू लागले व दुसरे बोटावरील अंजन त्‍याने वैद्यबुवाच्‍या जिभेवर फिरवले. राजा पाहतच राहिला. त्‍याने मंत्र्याला विचारले,'' मंत्रीजी तुम्‍ही असे काय करत आहात, एका डोळ्यातच तुम्‍ही का अंजन घातले. खरेतर तुम्‍ही दोन्‍ही डोळ्यात अंजन घालू शकला असता पण तुम्‍ही दुसरे बोट वैद्यबुवाच्‍या जिभेवर का ठेवले'' मंत्री म्‍हणाला,'' राजन, मी जर दोन्‍ही डोळ्यात अंजन घातले असते तर मला दोन्‍ही डोळ्यांनी दिसले असते हा एक आनंदाचा भाग झाला असता व मी स्‍वार्थी ठरलो असतो. पण आता राजवैद्याने या अंजनाची चव घेतली आहे व त्‍यातून वैद्यबुवा इतके निष्‍णात आहेत की चवीनुसार ते अंजन बनवू शकतात, त्‍या अंजनात कोणते घटक मिसळले आहेत व आपणही आपल्‍या राज्‍यात असे अंजन बनवून आपल्‍या राज्‍यातली नेत्रहीनांची संख्‍या कमी करू शकू. यासाठी मी केवळ एका डोळयात अंजन घातले आहे.'' राजा व दरबारीजन मंत्र्याच्‍या या परोपकारीवृत्तीने प्रभावित झाले. 

तात्‍पर्य :- परोपकाराची संधी जेव्‍हा कधी आपल्‍या आयुष्‍यात येईल तेव्‍हा त्‍या संधीचा अवश्‍य लाभ घ्‍यावा. 

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४

शेती आणि देव


कथा क्र.175

एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.'' देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते. त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही. आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

कथासार- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाहीत.

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

अदृश्‍य पेरू

था क्र 174

एका सात वर्षाच्‍या मुलीला एक शिक्षक गणित शिकवित होते. त्‍यांनी तिला प्रश्‍न विचारला,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलीने काही काळ विचार केला आणि बोटे मोजत उत्तर दिले,'' चार पेरू'' शिक्षक आश्‍चर्यचकित झाले, त्‍यांना वाटले की मुलीने नीट ऐकले नसावे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न पुन्‍हा विचारला,'' बाळा प्रश्‍न नीट ऐक,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलगी शिक्षकांच्‍या आश्‍चर्यचकित चेह-याकडे पाहत विचार करू लागली मगाशी मी चार उत्तर दिले तर शिक्षक आश्‍चर्यात पडले आता असे काय उत्तर द्यावे जेणेकरून ते खुश होतील. तिच्‍या डोक्‍यात असा विचार जरा सुद्धा स्‍पर्शून गेला नाही की खरे उत्तर द्यावे तिला फक्त असे वाटत होते आपल्‍या उत्तराने शिक्षक खुश झाले पाहिजेत. ती पुन्‍हा बोटे मोजू लागली व तिने उत्तर दिले, '' सर चार पेरू माझ्याकडे असतील.'' आता शिक्षक निराश झाले व विचार करू लागले की या मुलीला बहुधा पेरू आवडत नसावेत म्‍हणून ती चुकीचे उत्तर देत आहे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न बदलून विचारायचे ठरवले,'' बाळा समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि मग पुन्‍हा एक चिकू दिला तर तुझ्यापाशी किती चिकू होतील?'' मुलीने परत बोटे मोजली व उत्तर दिले,'' सर तीन चिकू असतील माझ्याकडे'' शिक्षकांना याची मोठी गंमत वाटली कि तीन वेळेला चुकीचे उत्तर देणारी मुलगी चौथ्‍या वेळेला कशी काय बरोबर उत्तर देते, त्‍यांना वाटले की आता या मुलीला गणिताची गंमत कळाली, म्‍हणून त्‍यांनी परत आपला पहिलाच प्रश्‍न रिपीट केला,''समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मागच्‍या वेळचे उत्तर बरोबर आल्‍याने मुलीचा आत्‍मविश्‍वास आता वाढला होता तिने फारसा वेळ न दवडता उत्तर दिले,'' सर माझ्याकडे चार पेरू असतील'' हे चुकीचे उत्तर ऐकून शिक्षक संतापले व तिच्‍या दिशेने जात जोरात ओरडले,'' तुला काही डोक्‍याचा भाग वगैरे आहे की नाही, जरा मला पण सांग की चार पेरू कसे काय होतील तुझ्याकडे'' सरांना असे रागावलेले पाहून ती छोटीसी मुलगी रडू लागली, डोळ्यातून अश्रुंच्‍या धारा वाहत असतानाच ती मुलगी दप्‍तर शोधू लागली, दप्‍तरात हात घालून तीने दप्‍तरातील एक पेरू काढून शिक्षकांना म्‍हणाली,'' सर तुम्‍ही मला तीन पेरू देणार आहात आणि माझ्याकडचा एक पेरू मी त्‍यात मिसळत गेले त्‍यामुळे सर मी चार पेरू हे उत्तर देत होते.''

तात्‍पर्य मित्रांनो, आपले ही असेच होते ना ब-याचदा, समोरच्‍याकडून जर अनुकुल प्रतिसाद आला नाही तर आपण आपला संयम गमावून बसतो पण त्‍याची बाजू काय आहे हे आपण कधीच समजून घेत नाही. त्‍याचा त्‍यापाठीमागील तर्क, त्‍यावेळची परिस्थिती, तो ज्‍या संस्‍कृतीमध्‍ये वाढला आहे त्‍याचे संस्‍कार याचा आपण कधीच विचार करत नाही ना. तेव्‍हा जर इथून पुढे कधी जर आपल्‍या मनासारखा प्रतिसाद समोरच्‍याकडून आला नाही तर त्‍याचीही कृपया बाजू समजून घ्‍या. काय सांगावे त्‍याच्‍याजवळ असणारा तो छुपा पेरू आपल्‍याला दिसतही नसेल कदाचित. 


सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

आणि त्‍यांनी संन्‍यास घेतला.

कथा क्र.173

शंकर आई-वडिलांचा एकुलता एक पुत्र होता. तो आज्ञाधारक, गुणी होता. आई जेव्‍हा मंदिरात जात असे. तेव्‍हा शंकराचे मन आनंदून जात असे. एके दिवशी शंकरने आईकडे संन्‍यास घेण्‍याची इच्‍छा व्‍यक्त केली. आई म्‍हणाली,'' तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. तुला मी कोठेही जाऊ देणार नाही.'' शंकरने आईला समजावण्‍यास बराच प्रयत्‍न केला. परंतु तिचे ऐकले नाही. एकदा ते दोघे नदीवर स्‍नान करण्‍यास गेले. शंकर पाण्‍यात उतरताच एका मगरीने त्‍याचा पाय धरला. तो ओरडू लागला त्‍याचे ओरडणे ऐकून आई तेथे धावली, पण ती एकटी मगरीचा सामना कसा करणार? तिने लोकांना बोलावले, लोक येण्‍यापूर्वीच शंकर तिला म्‍हणाला,'' आई मी आता मरतो आहे किमान मरताना तरी मला संन्‍यास घेऊ दे.'' शेवटी मन घट्ट करून तिने शंकरला संन्‍यासी होण्‍याची परवानगी दिली. याचवेळी मगरीच्‍या तोंडातून त्‍याचा पाय सुटला. त्‍या आनंदाच्‍या भरात आईच्‍या डोळयातून अश्रू ओघळले, मुलाच्‍या आनंदाचे कारण दुसरेच होते. त्‍याला संन्‍यास घेण्‍याची परवानगी आईने दिली होती. हेच शंकर पुढे आदि शंकराचार्य बनले

______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________


रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

अडचण

कथा क्र.172

एका गावात एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याने त्याच्या गरिबीमुळे त्‍याने एका सावकाराकडून काही पैसे उसने घेतले होते. ब्राह्मणाची परिस्थिती इतकी बिघडली की तो काही पैसे परत करू शकत नव्‍हता. त्‍यातच सावकाराने त्‍याला पैसे परत करण्‍याचा तगादा लावला. ब्राह्मण आपले पैसे परत करत नाही हे पाहिल्‍यावर सावकाराने त्‍याची तक्रार देशाच्‍या बादशहाकडे केली. बादशहाने ब्राह्मणाला बोलावणे पाठवले. ब्राह्मणही मग दरबारात हजर झाला. ब्राह्मण दरबाराच्‍या दारात येताक्षणी सावकाराने बादशहाला मोठया सुरात सांगण्‍यास सुरुवात केली,'' महाराज, हाच तो अधम मनुष्‍य ज्‍याने माझ्याकडून ५०० रूपये घेतले आणि आता ते परत करण्‍याचे हा नाव सुद्धा काढत नाही. महाराज, तुम्‍ही याला माझे पैसे परत करण्‍याचे आदेश द्यावे ही माझी तुमच्‍याकडे विनंती आहे.'' बादशहाने ब्राह्मणाकडे सूचक नजरेने पाहिले व ब्राह्मण बोलू लागला,'' महाराज मी याचे पैसे देणे लागतो ही गोष्‍ट मला मान्‍य आहे पण महाराज माझी गाय आणि घोडा मी विक्रीस काढली आहे, ती दोन्‍ही जनावरे विकली गेली की मी या सावकाराचे पैसे व्‍याजासहीत परत करीन हा माझा शब्‍द आहे.'' असे ब्राह्मणाने बोलताच सावकाराचा संताप झाला व तो ब्राह्मणाकडे धावून जात मोठमोठ्याने ओरडू लागला व म्‍हणाला,'' महाराज हा खोटारडा इसम, किती खोटे बोलत आहे ते पहा, अहो महाराज, याच्‍या घरात याला खायला अन्नाचा कणही नाही आणि हा गायघोडा पाळण्‍याची भाषा करतो. याच्‍याकडे फुटकीकवडीसुद्धा नाही की जी विकून हा माझे पैसे परत करेल. महाराज याला शिक्षा करा'' सावकाराचे बोलणे संपताच ब्राह्मण हात जोडून सावकाराला व बादशहाला नम्रपणे म्‍हणाला,'' महाराज मी खोटे बोललोही असेन पण बघा सावकाराला माझी सर्व आर्थिक परिस्थिती माहिती आहे तरीही ते मला पैशाचा तगादा लावत आहेत. महाराज सर्व दिवस सारखे नसतात आज माझ्याकडे पैसा नाही पण माझ्याकडे पैसे आल्‍यावर मी सावकाराचे ऋण फेडून टाकीन एवढे खरे.'' बादशहाने ब्राह्मणाच्‍या बोलण्‍यातील तळमळ ओळखून स्‍वत:कडील पैसे सावकाराला दिले व ब्राह्मणाला सन्‍मानपूर्वक घरी पाठविले.


तात्‍पर्य :- अडचणीत असणाराला नेहमीच मदत करावी. तसेच मदत करताना तो खरेच अडचणीत आहे की नाही याचीही शहानिशा करणे गरजेचे आहे.