(इंद्र आणि मुनी मार्कंडेय)
(कथा क्र. ४१)
मुनी मार्कंडेय यांच्या कठोर तपस्येने देवराज इंद्र भयभीत झाला होता. त्याला वाटायचे कि आपल्या सिहांसनावर मुनी अधिकार तर दाखवणार नाहीत. त्यामुळे त्याने मुनींची तपस्या खंडित करायचे ठरवले. एके दिवशी इंद्राने मुनींच्या अनुपस्थितीत आश्रमात भरपूर धन आणून ठेवले. जेंव्हा मुनी आश्रमात परत आले तेंव्हा ते धन पाहून हैराण झाले. आपल्या शिष्यांना मार्कंडेय म्हणाले, " हे धन माझे नाही. त्यामुळे हे धन गरीबात वाटून टाका." हे बघून इंद्राच्या लक्षात आले कि मुनिना धनाचा लोभ नाही. त्यावेळी इंद्र राजाच्या वेशात आश्रमात आला आणि मुनींना म्हणाला,"मुनिवर! माझी एक इच्छा आहे कि मी एक राजा आहे आणि माझ्याकडे भरपूर धन आहे. परंतु संतती नाही. माझी अशी इच्छा आहे, कि आपल्याला दत्तक घेवून बसवावे आणि राजगादीवर बसवून संन्यास घ्यावा." मुनी म्हणाले," राजन एकदा ईश्वराशी नाते जोडल्यावर तो धन आणि सिंहासनाशी कधीही लोभ ठेवत नाही. मला त्याचा कधीही लोभ नाही, नव्हता आणि नसणार. तेंव्हा तुम्हालाच संन्यास घ्यावयाचा असेल माझ्या शेजारीच तुमच्यासाठी एक कुटी बनवतो. यापेक्षा मी आपली काय सेवा करू शकतो.? " मुनींचे हे उत्तर ऐकून इंद्र आपल्या खऱ्या रुपात प्रकट झाला आणि म्हणाला मला आपल्या कठोर तपस्येमुळे भीती वाटत होती कि आपण माझ्या सिंहासनावर अधिकार तर सांगणार नाहीत ना? त्यामुळे मी आपली तपस्या भंग करण्यासाठी हे सारे केले. मला क्षमा करा." मुनी म्हणाले"देवेंद्र! आपल्याला स्वत:वरच विश्वास नाही तर राज्य कारभार कसे चालवणार. संन्याशाला राज्याची काय गरज?" इंद्र लाजीरवाणा होवून तेथून परत गेला.
तात्पर्य - मनावर संयम असणारेच सत्तेपासून दूर राहू शकतात. भौतिक आकर्षण ज्यांना नसते तेच खरे साधू होत.
वर्तमानपत्रातून संग्रहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा