(कथा क्र. ६१)
एका गावात हिरामण आणि नारायण या नावाचे दोन शेतकरी राहत होते. दोघेही चांगले मित्र होते. हिरामण मोठ्या शेतजमिनीचा मालक होता तर नारायणाजवळ थोडी जमीन होती. पण नारायण त्यात संतुष्ट होता. एकेदिवशी नारायण हिरामणकडे गेला तेंव्हा हिरामण खूपच त्रस्त झालेला त्याला दिसत होता. त्याच्या संपूर्ण घरात वास येत होता आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत होते. नारायणने हिरामणला त्याच्या अडचणीचे कारण विचारले, तेंव्हा म्हणाला, समजत नाही कि माझी शेती नष्ट का होत आहे? गरजेपुरते धान्यही पिकत नाही. असेच जर चालत राहिले तर काही काळानंतर जगणेही मुश्कील होईल," नारायणने हैराण होवून विचारले, "तुझ्याकडे तर इतकी जमीन आहे. मग तुझे का हाल होत आहेत? तू माझ्या घरी चल. तिथून आपण दोघे एका संताकडे जाऊ, ते तुला योग्य मार्ग दाखवतील." असे म्हणून दोघे नारायणाच्या घरी आले.नारायणाचे घराचे अंगणात येताच हिरामण चमकला, कारण अंगण स्वच्छ झाडून सडा रांगोळी केली होती, जनावरांचे गोठे स्वच्छ दिसत होते. घरात फारशी सुबत्ता नसतानासुद्धा नीटनेटकेपणे घर आवरले होते. देवाच्या तसबिरींना ताज्या फुलांचे हार घातलेले होते, देवापुढे अगरबत्ती लावलेली होती. घरातील वातावरण शांत होते. हे दोघे येताच नारायणाच्या पत्नीने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली. खाणे झाल्यावर नारायण व त्याची पत्नी हे दोघे हिरामणला सांगून काही काळ घरातील कामे करण्यात दंग झाले. कामे आटोपताच नारायण हिरामणला म्हणाला,"चल मित्रा ! आता संतांकडे जाऊ." यावर हिरामण उत्तरला,"मित्रा! तुझ्या घरी येऊन माझे डोळे उघडले आहेत. आता मी सुद्धा तुझ्यासारखे वागण्याचा प्रयत्न करेन. संतांकडे जाण्याची गरज आता मला वाटत नाही, तू मला अशी शिकवण तुझ्या वागणुकीतून दिली आहेस. धन्यवाद मित्रा ! चल निघतो मी.माझे घर आवरायला."
तात्पर्य-"हात फिरे तिथे लक्ष्मी वसे" या म्हणीनुसार आचरण केल्यास मन प्रसन्न राहते व यश प्राप्तीचा मार्ग दिसतो./ आत्मनिर्भरता(स्वावलंबन) हि यशाची गुरुकिल्ली आहे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा