बुधवार, २४ एप्रिल, २०१३

(हार जीत)

(कथा क्र.६७) 


एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमधेही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या महाविद्यालयातील गणेश नावाचा एक विद्यार्थी प्राचार्यांना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,"सर! मी संजयपेक्षाही जास्त अचूकतेने नेम साधू शकतो. संजयला पराजित करणे हे माझे उद्दिष्ट आहे." प्राचार्य मंदसे हसले आणि पुढे गेले, कारण त्यांना माहित होते कि संजयला हरवणे इतके सोपे काम नाही. स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एका धाग्याला एक लाकडी फळ बांधले होते, त्याचा वेध नेमबाजांनी घ्यायचा होता. सर्व नेमबाजांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना यश मिळाले नाही. फक्त गणेश आणि संजय हे दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले. गणेशने यावेळी पुढाकार घेतला. त्याने पहिला नेम साधला तो अचूकपणे, दुसरा नेम त्याचा हुकला आणि तिसराही नेम योग्य पद्धतीने साधला. आता संजयची वेळ होती. संजय नेमबाजीला उभारला कि मुलांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. संजयने पहिला नेम मारला तो चुकला, दुसरा मारला तोही चुकला आणि तिसराही नेम त्याला मारता आला नाही. संजय पराजित झाला. सारी मुले, शिक्षक हिरमुसले झाले. संजय प्रथमच पराजित झाला होता. प्राचार्यांना व शिक्षकांना संजय हरला यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याला एकटे बोलावून घेतले. अनेकांनी त्याला विचारले पण तो काही सांगायला तयार होईना. शेवटी प्राचार्यांनी त्याच्यावर दबाव टाकला तेंव्हा त्याने सांगितले,"सर ! गणेशला मी बाहेर त्याच्या मित्रांबरोबर बोलताना ऐकले कि त्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे या पुरस्काराच्या रकमेतून त्याची फी तो भरणार आहे. मी या गोष्टीची अनेक मित्रांकडून खात्री केली. सर माझ्या हरण्याने जर कुणाचे आयुष्याचे कल्याण होत असेल तर मी कायम हरायला तयार आहे. सर माफ करा यामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला पण त्यातून एका विद्यार्थ्याचे आयुष्य उभारेल याचे मला समाधान आहे." या त्याच्या बोलण्याने सर्वच उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या व प्राचार्यांनी संजयचे एक विशेष गुणवान विद्यार्थी म्हणून अभिनंदन केले.

तात्पर्य-आपल्या सदवर्तन करण्याने कुणाचे ना कुणाचे चांगले कसे करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा