(पिसन हारीची विहीर)
(कथा क्र.५६)
प्राचीन भारतात बालविवाहाची प्रथा होती. याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे त्याकाळी मुलीना अशिक्षित ठेवले जायचे आणि एखाद्या मुलीचा पती मृत्यू पावल्यास तिला आयुष्यभर दुख:च सोसावे लागे. मेहनत आणि मजुरीशिवाय तिच्याकडे पर्याय नसे. अशीच एक गरीब बालविधवा पूर्व मथुरेजवळ राहत होती. ती एकटीच होती आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी ती पिठाची गिरणी चालवायची. एक दिवस तिच्या मनात गावातून शहराकडे जाणा-या रस्त्यावर एक विहीर खोदण्याचा विचार आला. कारण त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नव्हती. मात्र त्या बिचाऱ्या गरीब विधवेकडे विहीर खोदून घेण्यासाठी पैसेही नव्हते. शेवटी तिने विचार केला कि दिवसभरात ती दोन आणे मिळवते त्यातील दोन पैसे पाठीमागे टाकायला पाहिजेत. तिने पैसे जमवायला सुरुवात केली. असे करता करता तिने अनेक वर्षे पैसे मागे टाकले. वृद्धावस्थेत तिच्याकडे एक हजार रुपये जमा झाले. (त्या काळी हजार रुपयांना खूप किंमत होती) त्यावेळी तिने आज दिल्ली-आग्रा नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर एक पक्की विहीर खोदली. आजही ती विहीर तिच्या नावाने ओळखली जाते. लोक त्या विहिरीला पिसन हारीची विहीर म्हणून ओळखतात. त्या मार्गावर ती गरीब विधवा तिच्या पश्चात पण प्रसिद्ध आहे. लोक तिथे थांबतात, पाणी पितात आणि मनातून तिच्या कार्याचे आभार मानतात.
तात्पर्य -मर्यादित साधने असतील पण दृढ संकल्पशक्ती असेल तर अशक्य वाटणारे काम शक्य होते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा