मराठीत ऐकलेल्या, वाचलेल्या काही निवडक बोधकथांचा एक संग्रह.
मंगळवार, १४ मे, २०१३
(जीवनाचा उपयोग)
(कथा क्र ७८)
कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.
तात्पर्य-जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा