दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याच तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो, असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशहाच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचीती घेण्यासाठी, एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की, हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशहाच्य बेगमला सणसणून ताप भरला. स्वत: बादशहालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून, त्याचा तोल जाऊ लागला, आणि त्यामुळं हकिमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला, आणि उन्हं ओसरताच राजस्तानातल्या एका राजाची बादशहानं जिंकून घेतलेला प्रदेश, पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदानं येऊन बादशहाला दिली.‘हा सर्व सकाळी सकाळीच झालेल्या हिराचंद व्यापाऱ्याच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे,’ असा समज होऊन, बादशहान त्याल फ़ाशीची शिक्षा फ़र्माविली. हिराचंदने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चींत रहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करुन, रस्त्याच्या कडेला जाऊन बसला, नित्याप्रमाणे बादशहा त्या रस्त्याने फ़िरायला जाऊ लागला. बादशहाला दुरुन येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशहाकडे हजर केले. बादशहानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, ‘खाविंद, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळं आपला व आपल्या बेगमसाहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला, पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे, त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फ़ाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा, आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे, ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो.’ बादशहाने बिरबलाचे हे शब्द ऎकून जसे त्याला ओळखले, तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फ़र्मावलेली फ़ाशीची शिक्षा रद्द केली.
==============
इंटरनेटवरील एक वाचलेली कथा
==============
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा