राजा सूर्यसेनचे राज्य प्रतापगड इथपर्यंतच मर्यादित होते. आणखी काही राज्ये त्याच्या अधीन होती. राजाला एक मुलगी होती. ती दिसायला फार सुंदर आणि बुद्धिमान होती. ती लग्नाच्या वयाची झाल्यावर राजाने तिच्यासाठी वर पाहाणे सुरु केले. त्याची इच्छा अशी होती की, आपल्या मुलीचा विवाह वीर आणि बुद्धिमान मुलाशी व्हायला पाहिजे. जो आपल्यानंतर या राज्याचा योग्यप्रकारे सांभाळ करू शकेल. राजकुमारी आणि राज्यावर अनेक राजकुमारांची नजर होती. मात्र राजा सूर्यसेनने एक कठीण अट ठेवली होती. जेव्हा जो कोणी विवाहाचा प्रस्ताव ठेवित असे तेव्हा राजा त्याला संसारातील सर्वात मौल्यवान वस्तू घेऊन ये असे सांगत असे व लोभी व्यक्तींना धडा बसविण्यासाठी त्याने पुढे अट ठेवली होती की ती वस्तू मला आवडली नाही तर मी त्याला कारागृहात टाकणार.अनेक राजकुमार वेगवेगळ्या वस्तू घेऊन आले परंतु राजाने त्या वस्तूंना असहमती दर्शवत त्यांना कारागृहात टाकले. राजाला विश्वास होता की, एक ना एक दिवस कोणी ना कोणी बुद्धीमान वीर पुरुष आपल्या राजकन्येसाठी ही अट पूर्ण करेल. एके दिवशी त्याच्याच राज्यातील एका छोट्या खेडयातील एका शेतक-याचा तरूण मुलगा रघु तीन वस्तू घेऊन राजाकडे आला व अट मान्य करण्याची इच्छा व्यक्त करू लागला. राजाने अनुमती दिली. रघु म्हणाला,’’मी जगातील तीन अनमोल वस्तु आणल्या त्यापैकी पहिली म्हणजे माती, जी आपल्याला अन्न देते, दुसरे म्हणजे पाणी जे भेदाभेद न पाहता सर्वांची तृषा शांत करते, आयुष्य वाचवते आणि तिसरी वस्तू म्हणजे पुस्तक जे सर्वांना समान न्यायाने ज्ञानदान करते, ज्ञानाचा आधार म्हणजे पुस्तक. ज्ञानाची गरज भागविण्याचे काम याच्याकडून केले जाते.’’ राजा या तीनही वस्तू व त्याचे त्यामागचे विचार पाहून ऐकून भारावून गेला. त्याने त्याच्या मुलीचा विवाह रघुशी केला व राज्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले.
तात्पर्य-बुद्धिमान लोकांकडूनच जगातील कठिणातील कठीण प्रश्र्नांची उत्तरे प्राप्त केली जाऊ शकतात.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा