मंगळवार, ३० जुलै, २०१३

(निर्मळता )

(कथा क्र.118) 
 
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."

तात्पर्य- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा