शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

(फटकळपणा)

कथा क्र.122

एका गावात एक शेतकरी राहत होता. शेती करण्याशिवाय त्याने काही गायी पाळल्या होत्या. त्यांचे दूध विकून तो गुजराण करत असे. शेतकरी प्रामाणिक होता. त्यामुळे तो दुधात मुळीच भेसळ करत नसे. त्यामुळे त्याचे दूध चांगलेच असणार याची लोकांना खात्री पटली होती. गावातील बहुतांश लोक त्याचेच ग्राहक होते. त्याच्या नियमित ग्राहकांमध्ये एक महिलादेखील होती. तिचा स्वभाव रागीट होता. शेतकर्‍याला तिचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो प्रथम तिच्या घरी दूध पोहोचवत असे. एके दिवशी त्या महिलेने घरी पूजापाठ आयोजित केला होता. बरेच नातेवाईक येणार होते. परंतु नेमके त्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध देण्यास जाऊ शकला नाही. शेतकºयाच्या या वागण्यामुळे ती महिला प्रचंड संतापली. त्याच्या या वागण्याचा तिला खूप रागही आला. पर्यायी व्यवस्था करून तिने कार्यक्रम पार पाडला. दुसºया दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध घेऊन गेला. तेव्हा तिने त्याचा बराच पाणउतारा केला. बराच वेळ तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. शेतकरी गप्प राहिला. काही वेळाने तिच्या रागाचा पारा किंचित कमी झाला, तेव्हा धाडस करून शेतकरी बोलला, ‘माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली. त्याबद्दल मी प्रथम आपली क्षमा मागतो. परंतु काल माझ्या आईचे निधन झाले. मला तिच्यावर अग्निसंस्कार करावे लागले. त्यामुळे मी दूध द्यायला येऊ शकलो नाही.’ हे ऐकताच महिलेला तिची चूक उमगली. शरमेने तिला काहीच बोलता येईना. रागाच्या भरात भलतीच चूक आपण केल्याचा तिला पश्चात्ताप झाला. तिने शेतकºयाची माफी मागितली व यापुढे मागचा-पुढचा विचार न करता कुणाशीही फटकळपणे न वागण्याची तिने शपथ घेतली. 

तात्पर्य असे की, अतिउत्साह, घाई-गडबडीत, समोरच्या व्यक्तीची अडचण जाणून न घेता अनुचित व्यवहार करणे योग्य नाही. गैरसोय झाली तर प्रथम त्याचे कारण शोधावे आणि नंतरच त्यावर प्रतिक्रिया द्यावी.

वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा