शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

त्‍यागाचे महत्‍व

कथा क्र.157

फार वर्षापूर्वी एक स्‍वाभिमानी राजा होऊन गेला. त्‍याचे राज्‍य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्‍याचे महाल सोन्‍यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्‍याचे सल्‍लागार त्‍याच्‍या अहंकाराला प्रोत्‍साहन देत होते. एकदा त्‍याच्‍या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्‍याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्‍हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्‍यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्‍हणाला,''राजन, त्‍यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्‍हा त्‍याग समाविष्‍ट होते तेव्‍हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्‍याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्‍म्‍याकडे पोहोचण्‍यासाठी तयार होते.'' फकीराच्‍या राजा खजील आला आणि त्‍याचे डोळे उघडले. त्‍याने गर्वाचा त्‍याग केला.


तात्‍पर्य :- त्‍यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्‍याचे नुकसान करतो. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा