एक फकीर रस्त्याने चालले होते. रस्त्यात त्यांना एक व्यापारी गाठ पडला, व्यापा-याबरोबर पाच गाढवे होती आणि पाचही गाढवांवर पाच मोठमोठी गाठोडी
लादलेली होती. गाढवे त्या गाठोड्यांच्या ओझ्याने अगदी दबून गेली होती. फकीराने
व्यापा-याला विचारले,'' या गाठोड्यात असे तुम्ही
काय नेत आहात की ज्याच्या वजनाने तुमची गाढवे अगदी दमून, दबून गेलेली दिसत आहेत'' व्यापा-याने उत्तर दिले,'' यात माणसाच्या वापराच्या अनमोल गोष्टी
आहेत. मी त्या गोष्टी बाजारात विकण्यास निघालो आहे.'' फकीराने विचारले,'' अच्छा, अशा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही विकता ते तरी सांगा'' व्यापारी म्हणाला, '' पहिल्या गाढवाकडे जाऊ, त्याच्या पाठीवर ठेवलेल्या गाठोडयात अत्याचार भरलेले आहेत. ज्यांची खरेदी
ही राजा-सत्ताधारी लोक, वरीष्ठ लोक करतात. खूप मोठ्या भावाने हे
विकले जातात.'' मग व्यापारी दुस-या गाठोड्याकडे वळाला
आणि सांगू लागला,'' या गाठोड्यात अहंकार भरला आहे. याची खरेदी
ही उच्चशिक्षित, उच्चभ्रु, विद्वान माणसे करतात.'' तिस-या गाठोड्याला हात लावून व्यापारी म्हणाला,'' यात ईर्षा भरली आहे. याचे ग्राहक आहेत ते म्हणजे धनवान लोक जे दुस-याची
प्रगती कधीच पाहू शकत नाहीत. याच्या खरेदीसाठी अक्षरश: लोकांच्या उड्या पडतात.'' फकीर म्हणाला,'' चौथ्या गाठोडयात काय आहे'' व्यापारी म्हणाला,'' यात बेईमानी भरून आणली आहे आणि याचे
गि-हाईक म्हणजे धंदेवाईक लोक, उद्योगपती लोक जे आपल्या फायद्यासाठी
ग्राहकांच्या जीवाशी खेळतात आणि भेसळ करून लहानमोठ्यांना प्राण गमाविण्यास भाग
पाडतात. यालासुद्धा बाजारात प्रचंड मागणी आहे.'' फकीर अचंबित होऊन पाहत असतानाच व्यापारी शेवटच्या गाढवाकडे जाऊन म्हणाला,'' या शेवटच्या गाढवावर मी कट-कारस्थान भरून आणले आहे. आजकाल सर्वच जण कटकारस्थान
करून दुस-याला कसा त्रास देता येईल याचा विचार करत असतो म्हणून यालाही मागणी
भरपूर आहे.'' एवढे बोलून व्यापारी काही अंतर निघून
पुढे गेला व फकीर त्याच्या जाणा-या आकृतीकडे पाहतच राहिला
काय सांगायचे किंवा बोलायचे ? आपण कोणत्या गाठोड्यातील मालाचे गिर्हाईक आहोत इतकाच विचार करायचा .
उत्तर द्याहटवासुन्दर
उत्तर द्याहटवा