कथा क्र,184
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
भारतावर इंग्रजांचे राज्य होते. माणसांनी खच्चून भरलेली एक रेल्वे प्रवास करत
होती. प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्यात एक
भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा हा मनुष्य
साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्याच्या रंगाकडे आणि एकूणच
अवताराकडे बघून डब्यातील बहुतांश इंग्रज त्याची चेष्टामस्करी करत होते. त्याला
खेडूत, अडाणी समजून त्याच्या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्यांच्या त्या
चेष्टामस्करीकडे, टिंगल करण्याकडे त्या भारतीयाचे लक्ष नव्हते. तो त्याच्या
नादात मग्न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्याने रेल्वेची साखळी ओढली. वेगात
धावणारी ती आगगाडी तात्काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्याला काहीबाही बोलू लागले.
थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्वे थांबविली’’ त्या सावऴया रंगाच्या व्यक्तिने
उत्तर दिले,’’ मी ओढली
साखळी, मी थांबवली रेल्वे’’ गार्डने या
कृतीचे कारण विचारले असता ती व्यक्ति उत्तरली,’’ माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्वे पट्ट्या
खराब झाल्या आहेत.’’ गार्डने
विचारले,’’ हे तुला कसे
कळले’’ ती व्यक्ति
म्हणाली,’’ माझ्या
अनुभवानुसार रेल्वेच्या गतीमध्ये काही फरक पडला आहे आणि त्यामुळे रेल्वेचा जो
विशिष्ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज
फक्त रेल्वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून
बघू शकता.’’ गार्डने याची खातरजमा करून बघण्यासाठी त्या
व्यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्या
पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत
होते. हे सर्व होत असतानाच रेल्वेत त्या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे
येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्चर्यचकित झाले. केवळ त्या माणसाच्या
ज्ञानामुळे आज त्यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्या माणसाची
प्रशंसा व स्तुती करू लागले. गार्डने त्यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो
काय’’ त्या माणसाने
शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव
डॉ.एम. विश्र्वेश्वरैय्या असून मी व्यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्तब्ध
झाले. कारण त्याकाळात विश्र्वेश्वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्हणून
ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्यांची क्षमा मागितली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा