कथा क्र.202
एकदा भगवान महावीरांचे दर्शन घेण्यासाठी
राजा श्रेणीक आणि राणी चेलना दोघेही गेले होते. त्यांना भेटून दोघेही फारच
प्रभावित झाले. परतत असताना वाटेत राणीला एक मुनी तपश्चर्येत मग्न दिसले. त्यांच्या
अंगावर एकच वस्त्र होते. कडाक्याच्या थंडीतसुद्धा ते मुनी कठोर तपश्चर्या करत
होते. राणीने प्रभावित होऊन मुनींना नमस्कार केला. महालात आल्यानंतर राणी
शयनकक्षात निद्रिस्त झाली. रात्रभर तिचा एक हात पलंगाखाली लटकत राहिल्याने आखडला
व सकाळी तो हात ठणकू लागला. दासींनी तिचा हात शेकून देण्यास सुरुवात केली तेव्हा
राणीला अचानक जंगलातील त्या मुनींची आठवण झाली. त्याने तर भर थंडीतसुद्धा एका
वस्त्रात स्वत:चे शरीर लपेटले होते. राणीला ह्याची आठवण होऊन तिच्या तोंडून
अचानक शब्द बाहेर पडले,’’अगं बाई गं, त्या बिचा-याचे कसे हाल झाले
असतील’’ तेवढ्यात राजाचे तेथे आगमन झाले व हे वाक्य ऐकून राजाचा असा समज झाला की
राणीचे दुस-या कोणावर तरी प्रेम आहे. राजाला हे ऐकून खूप राग आला. रागाच्या भरात
त्याने मंत्र्याला बोलावून आपल्या अंत:पुराला आग लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर
तो भगवान महावीरांकडे गेला. त्यांना सगळी हकिकत सांगितली. महावीर म्हणाले,’’राजा श्रेणिका, राणी चेलना पतिव्रता आहे. त्यांनी दिव्यदृष्टीच्या
सहाय्याने मुनींबाबतचा तो प्रसंग आहे हे स्पष्ट केले.’’ श्रेणिकाचा राग शांत झाला. तो महालात आला मंत्र्याला विचारले की तू
अंत:पुराला आग लावलीस का. मंत्र्याने होकारार्थी मान डोलावली. राजाला खूप दु:ख
झाले हे पाहून मंत्री म्हणाला, राजन मी जाणून होतो, तुम्ही रागात आदेश दिले आहेत
त्यामुळे मी हत्तीशाळा जाळली, अंत:पूर जाळले नाही. राजाला आपल्या चुकीची जाणीव
झाली. त्याने राग सोडून देण्याचा संकल्प केला.
तात्पर्य :-क्रोध व अविचार एकत्र राहतात.
अविचाराने केलेली कोणतीही कृती नाशास कारणीभूत ठरते. क्षणिक येणारा राग माणसाला
आयुष्यभराचे नुकसान भोगायला लावतो. राग माणसाचा शत्रू आहे असेच सर्व संतांनी
सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा