सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

वृद्ध महिला आणि चोर


कथा क्र.२३४

एक गरीब वृद्ध महिला आपल्‍या गावातून दुस-या गावाला जाण्‍यास निघाली. तिच्‍या डोक्‍यावर मोठे गाठोडे होते. चालून चालून ती फार थकली. ती विचार करू लागली कि आपल्‍याला आता कोणाचीही जर मदत मिळाली तर किती बरे होईल तेवढ्यात तेथून एक घोडेस्‍वार जाताना तिला दिसला. वृद्ध महिला त्‍याला थांबवत म्‍हणाली,'' मुला मी फार थकले आहे. तू माझ्यावर दया कर आणि ही गाठोडी पुढच्‍या गावात पोहोचवून दे. मी पाठीमागून चालत चालत येईन आणि ते गाठोडे तेथून घेईन'' घोडेस्‍वार घाईत होता, त्‍याने न थांबताच म्‍हटले की मला इतका वेळ नाही की दुस-याचे ओझे मी वहात बसू. इतके बोलून तो पुढे गेला. महिलेला फार वाईट वाटले आणि ती त्‍याला दोष देऊ लागली मग अचानक कोणीतरी तिच्‍या कानात म्‍हणले,'' जे झाले ते चांगले झाले. तुझे गाठोडे घेऊन तो पळून गेला असता तर. तू तर त्‍या माणसाला ओळखतही नव्‍हतीस की मग तू काय केले असते.'' हा विचार मनात येताच तिने सुटकेचा निश्‍वास सोडला. कारण त्‍या गाठोड्यात तिच्‍या आयुष्‍यभराची कमाई होती. तिने तिची जीवनभराची कमाई चांदीच्‍या रूपात साठविली होती. पुढे थोडे दूर गेल्‍यावर घोडेस्‍वाराच्‍या मनात विचार आला की आपण त्‍या गाठोड्यात काय आहे हे न पाहताच संधी सोडून दिली. कदाचित त्‍या गाठोड्यात काही सोनेनाणे असले तर आपण मोठी चूक केली हे लक्षात येऊन तो परत वृद्धेच्‍या दिशेने परत आला आणि तिला म्‍हणाला,''आजीबाई, मी चूक केली तुझे गाठोडे मी घेतले नाही, मला आता चुकीचे परिमार्जन करण्‍याची संधी दे. मी तुझे गाठोडे पुढच्‍या गावात नेऊन पोहोचवितो.'' पण महिला आता सावध होती. तिने घोडेस्‍वाराची मानसिकता अचूक ओळखली व म्‍हणाली,''बेटा, आता काहीही झाले तरी हे गाठोडे मी तुला देणार नाही. ज्‍याने तुला गाठोडे परत मागण्‍याची अक्कल दिली त्‍यानेच मला गाठोडे न देण्‍याचीही अक्कल दिली आहे.'' घोडेस्‍वार रिकाम्‍या हाताने परत गेला.

तात्‍पर्य : बिगर ओळखीच्‍या माणसावर विश्‍वास ठेवल्‍याने धोका होण्‍याची शक्‍यता असते. विश्‍वास अशा माणसावर ठेवा ज्‍याला तुम्‍ही पारखले आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा