एका गावात एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याने त्याच्या गरिबीमुळे त्याने
एका सावकाराकडून काही पैसे उसने घेतले होते. ब्राह्मणाची परिस्थिती इतकी बिघडली की
तो काही पैसे परत करू शकत नव्हता. त्यातच सावकाराने त्याला पैसे परत करण्याचा
तगादा लावला. ब्राह्मण आपले पैसे परत करत नाही हे पाहिल्यावर सावकाराने त्याची
तक्रार देशाच्या बादशहाकडे केली. बादशहाने ब्राह्मणाला
बोलावणे पाठवले. ब्राह्मणही मग दरबारात हजर झाला. ब्राह्मण दरबाराच्या दारात
येताक्षणी सावकाराने बादशहाला मोठया सुरात सांगण्यास सुरुवात केली,'' महाराज, हाच तो अधम मनुष्य ज्याने
माझ्याकडून ५०० रूपये घेतले आणि आता ते परत करण्याचे हा नाव सुद्धा काढत नाही.
महाराज, तुम्ही याला माझे पैसे
परत करण्याचे आदेश द्यावे ही माझी तुमच्याकडे विनंती आहे.'' बादशहाने ब्राह्मणाकडे
सूचक नजरेने पाहिले व ब्राह्मण बोलू लागला,'' महाराज मी याचे पैसे देणे लागतो ही गोष्ट मला मान्य
आहे पण महाराज माझी गाय आणि घोडा मी विक्रीस काढली आहे, ती दोन्ही जनावरे विकली
गेली की मी या सावकाराचे पैसे व्याजासहीत परत करीन हा माझा शब्द आहे.'' असे ब्राह्मणाने बोलताच
सावकाराचा संताप झाला व तो ब्राह्मणाकडे धावून जात मोठमोठ्याने ओरडू लागला व म्हणाला,'' महाराज हा खोटारडा इसम, किती खोटे बोलत आहे ते
पहा, अहो महाराज, याच्या घरात याला खायला
अन्नाचा कणही नाही आणि हा गायघोडा पाळण्याची भाषा करतो. याच्याकडे
फुटकीकवडीसुद्धा नाही की जी विकून हा माझे पैसे परत करेल. महाराज याला शिक्षा करा'' सावकाराचे बोलणे संपताच
ब्राह्मण हात जोडून सावकाराला व बादशहाला नम्रपणे म्हणाला,'' महाराज मी खोटे बोललोही
असेन पण बघा सावकाराला माझी सर्व आर्थिक परिस्थिती माहिती आहे तरीही ते मला पैशाचा
तगादा लावत आहेत. महाराज सर्व दिवस सारखे नसतात आज माझ्याकडे पैसा नाही पण
माझ्याकडे पैसे आल्यावर मी सावकाराचे ऋण फेडून टाकीन एवढे खरे.'' बादशहाने ब्राह्मणाच्या
बोलण्यातील तळमळ ओळखून स्वत:कडील पैसे सावकाराला दिले व ब्राह्मणाला सन्मानपूर्वक
घरी पाठविले.
बरोबर आहे
उत्तर द्याहटवाप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
हटवा