मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

भीतीमुळेच मरण आले


कथा क्र.240

एका गावातील चार मित्र व्‍यापार करण्‍यासाठी शहराकडे चालले होते. वाटेत मोठे जंगल लागले. चालून चालून दमल्‍यावर विश्रांतीसाठी आसरा शोधू लागले. त्‍यांना भूकसुद्धा लागली होती. त्‍यांना एक झोपडी दिसली. त्‍याचे दार वाजवल्‍यावर एक म्‍हातारी बाहेर आली. त्‍यांनी तिला जेवण मिळेल का असे विचारले असता. म्‍हातारीने त्‍यांना भाकरी आणि ताक मोठ्या प्रेमाने खाऊ घातले. जेवण करून तृप्‍त झालेले ते मित्र काही वेळाने मार्गस्‍थ झाले. ते निघून गेल्‍यानंतर म्‍हातारीने ताकाच्‍या भांड्यात वाकून पाहिले असता त्‍यात साप मरून पडलेला दिसला. ती म्‍हातारी अस्‍वस्‍थ झाली. आपण त्‍या वाटसरूंना विष खायला घातले असे तिला वाटले. तिकडे त्‍या चौघांनी शहरात चांगला जम बसवला. बरेचसे पैसे मिळवून ते गावाकडे परतत होते. वाटेत त्‍या म्‍हातारीकडे पुन्‍हा थांबले. तिला म्‍हटले, आई तुम्‍ही आम्‍हाला चांगले जेवण दिले होते. आजही तसेच चांगले जेवण पुन्‍हा एकदा द्या. म्‍हातारी म्‍हणाली,'' बाबांनो तुम्‍ही जीवंत आहात याचेच मला समाधान आहे रे बाबांनो, कारण तुम्‍ही चौघे जेवून गेल्‍यावर मी ताकाच्‍या भांड्यात साप मेलेला पाहिला होता मला वाटले की तुम्‍ही चौघेही मेलात की काय'' हे ऐकताक्षणी आपण साप मेलेल्‍या भांड्यातील अन्न खाल्‍ले याची किळस येऊन व विष आपल्‍या पोटात गेले या भीतीने चौघांनाही उलट्या होऊ लागल्‍या व वारंवार उलट्या येऊन चौघेहीजण घाबरून मरण पावले.

तात्‍पर्य :- माणसाला जोपर्यत खरे समजत नाही तोपर्यंत तो‍ निश्चिंत असतो पण सत्‍य समजताच त्‍याच्‍यातील निडरपणा कमी होऊन तो घाबरतो. यासाठीच निडरपणा अंगी बाणवणे गरजेचे आहे.

मराठी बोधकथा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा