सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

स्‍वातंत्र्य-पारतंत्र्य


कथा क्र.२३६

अमेरिकेत एकेकाळी गुलामगिरीची प्रचलित होती. निग्रो लोकांची शेळ्या मेंढ्यांप्रमाणे खरेदीविक्री होत असे. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यामुळे या प्रथेचा अंत झाला व निग्रो लोकांची गुलामीतून सुटका झाली. मुक्त झाल्‍यानंतर निग्रो लोकांनी रोजगाराचा शोध सुरु केला. एक वृद्ध, अशक्‍त वृद्ध निग्रो माणूस कामाच्‍या शोधात भटकत होता. पण त्‍याला काम काही मिळाले नाही. फिरून फिरून तो थकला व एके जागी बसला. तेथे त्‍याची भेट एका मालक जातीच्‍या ओळखीच्‍या माणसाबरोबर झाली. वृद्ध निग्रोची ती अवस्‍था पाहून तो माणूस म्‍हणाला,''तुझे हे होणारे हाल मला पाहवत नाहीत. तू कशाने इतका त्रस्‍त झाला आहे'' वृद्ध म्‍हणाला,''मला काम मिळत नाही'' तो माणूस म्‍हणाला,''काही दिवसांपूर्वी तर तुझी अवस्‍था चांगली होती.'' निग्रो म्‍हणाला,'' त्‍यावेळी मला बराच आराम होता. माझा मालक खूप दयाळू माणूस होता. मला तो फारसे काम लावत नसे. माझ्यावर अत्‍याचार करत नसे. कठीण कामे करण्‍यास लावित नसे.'' सहानुभूती दाखवून तो माणूस म्‍हणाला,'' अरे मित्रा मग तर ते गुलामीचे दिवसच चांगले म्‍हणायला हवे की, ही मुक्ती काही तुला मानवली नाहीये असेच दिसून येतेय. ती तुझ्या कोणत्‍याच कामी येत नाहीये.'' हे ऐकताच बसलेला तो निग्रो माणूस ताडकन उठून उभा राहिला व उंच स्‍वरात ओरडून बोलला,''मालक, गुलामगिरी स्‍वीकारण्‍यापेक्षा हे मुक्त जीवन हजारपट चांगले आहे. कारण आमच्‍या जीवनावर केवळ आमचाच अधिकार आहे; ते सावरण्‍यासाठी आम्ही स्‍वतंत्र आहोत. मालकाकडून पिंज-यात मिळणा-या पेरूच्‍या फोडी खाण्‍यापेक्षा उंच आकाशात उपाशीपोटी भरारी घेणे पोपटाला खूप आवडते हे लक्षात आहे ना.''

तात्‍पर्य :- मनुष्‍याच्‍या सर्वांगीण विकासासाठी स्‍वातंत्र्य ही पहिली अट आहे, पारतंत्र्य पतनाचे तर मुक्ती प्रगतीचे द्वार आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा