कथा क्र.२३६
एकदा एका राजाला त्याच्या राजपुरोहिताने सांगितले की, श्रीमदभागवताचे पूर्ण पारायण केले तर त्याच्या श्रवणाने त्याला मुक्ती मिळेल. आपल्यालाही मुक्ती मिळावी अशी राजाची इच्छा होती. त्याला हा मार्ग फारच सोपा वाटला, त्याने पारायण करविले. पारायण पूर्ण झाल्यावर स्वत: मुक्त करण्यास त्याने राजपुरोहितांना सांगितले. राजपुरोहिताची गाळण उडाली, राजाला मुक्ती कशी मिळवून द्यावी, त्याने यासाठी आठ दिवसांची मुदत मागून घेतली. त्याच्या मुलीने त्याला काळजीचे कारण विचारले, कारण ऐकून ती म्हणाली, ठीक आहे राजाच्या या मुक्तीच्या प्रश्नाचे उत्तर मी देईन. आठव्या दिवशी राजपुरोहित आपल्या मुलीबरोबर दरबारात गेले. पुरोहितकन्येने राजाला बागेत येण्याची विनंती केली. बागेत गेल्यावर तिने दोघांनाही वेगवेगळ्या झाडांना बांधले. झाडाला बांधलेल्या तिच्या वडीलांना मोकळे करण्याची विनंती तिने राजाला केली. याने राजा रागावला, चिडला व तो म्हणाला, मी स्वत:च बांधलो गेलो आहे मी काय राजपुरोहिताना मोकळे करणार. राजाचे उत्तर ऐकताच मुलगी म्हणाली, महाराज, अशाच प्रकारे प्रत्येक जीव हा कर्मबंधनाने बांधला गेला आहे. ते दुस-यांना काय मुक्त करणार, प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचा हिशोब करण्यात गुंतलेला असतो मग ख-या अर्थाने मुक्त होण्यासाठी सदगुरुच वाट दाखवू शकतात.
मराठी बोधकथा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा