मंगळवार, ३० जुलै, २०१३
(कोंबडी आणि कोल्हा)
कथा क्र.117
एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’
तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.
(माणुसकी)
(कथा क्र.116)
इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्याने समाजात अत्युच्च स्थान निर्माण केले होते, ज्या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्याचे नाव होते क्झेनथस, इसाप आपल्या आचरणातून क्झेनथसला सतत शिकवण देत असे.
ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत, सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्झेनथसने इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्या दगडाला अडखळून पडला, त्यानेही शिवी हासडली पण तो दगड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी क्झेनथस स्नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्झेनथसने इसापला विचारले तू तर म्हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता पण दगड उचलून टाकण्याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे मी आपणास सांगितले.'' क्झेनथस निरूत्तर झाला.
तात्पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
(खरे दुःख)
(कथा क्र.115)
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.
सौजन्य-internet
शुक्रवार, २६ जुलै, २०१३
(ज्ञान)
(कथा क्र.114)
आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.
साभार- श्री अलोक. (फेसबुक पेज सच्चाई)
सदर कथा पूर्वप्रकाशित असून मराठी बोधकथा यांनी भाषांतरित केली आहे.
ऋषी अष्टावक्र
(कथा क्र.113)
हिंदू धर्मशास्त्रामध्ये अष्टावक्र नावाचे एक विचारवंत होऊन गेले. असे म्हणतात की अष्टावक्र हे केवळ कुरुपच नव्हते तर त्यांचे शरीरही बेढब होते. त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र हे म्हटले जात होते. ही एक प्रसिद्ध कथा आहे. अष्टावक्र ऋषी एकदा राजा जनक यांच्या दरबारात गेले. दोन्ही बाजूंनी उंच आसनावर सभासद, ज्ञानी, पंडीत, ज्ञानकर्मी बसले आणि राजा जनकाचे सिंहासन होते. अष्टावक्र ऋषींना द्वारपालाने रोखले नाही. अष्टावक्र त्यावेळी किशोरवयीन होते. अष्टावक्राने जेव्हा राजा जनकाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश केला तेव्हा त्याच्यावर नजर पडताच सर्वजण एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. इतकेच नाही तर त्यांचे हसू थांबत नव्हते. हे पाहून अष्टावक्राला प्रथम काहीच समजले नाही, मात्र त्यानंतर त्याला आपल्यावर हे सर्वजण हसतात म्हणून लक्षात आले. हे पाहून तोही जोरजोरात हसू लागला. जनक राजाने सभेला शांत होण्याचे आवाहन केले, सभा शांत होताच राजा जनकाने अष्टावक्राला विचारले,'' हे साधू, हे लोक तुमच्यावर हसतात हे माझ्या लक्षात आले पण तुम्ही का हसता आहात हे समजले नाही'' अष्टवक्राने उत्तर दिले,'' महाराज, मला वाटले की राजा जनक जो ज्ञानी, विचारवंत आहे त्याच्या सभेत ज्ञानी, विचारवंत, हुशार लोक असतील पण इथे तर सर्वच जण कातडीकडे व बाह्य स्वरूपाकडे पाहणारे लोक आहेत. माझ्या रूपाकडे पाहून हे लोक मला हसत होते हे पाहून मला यांच्या बुद्धीची कीव आली व हसू फुटले.'' जनक राजासह सर्व सभा अष्टावक्र ऋषींच्या या उत्तराने शरमिंदी झाली.
तात्पर्य- माणसाचे महत्व त्याच्या शरीरावर नाही तर त्याचे ज्ञान, परिश्रम आणि कर्मावर आहे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
(प्रेम)
(कथा क्र.112)
एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.
तात्पर्य- स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.
==============
इंटरनेटवरील एक वाचलेली कथा
==============
मंगळवार, २३ जुलै, २०१३
अपशकुनी
(कथा क्र.113)
दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याच तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो, असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशहाच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचीती घेण्यासाठी, एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की, हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशहाच्य बेगमला सणसणून ताप भरला. स्वत: बादशहालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून, त्याचा तोल जाऊ लागला, आणि त्यामुळं हकिमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला, आणि उन्हं ओसरताच राजस्तानातल्या एका राजाची बादशहानं जिंकून घेतलेला प्रदेश, पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदानं येऊन बादशहाला दिली.‘हा सर्व सकाळी सकाळीच झालेल्या हिराचंद व्यापाऱ्याच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे,’ असा समज होऊन, बादशहान त्याल फ़ाशीची शिक्षा फ़र्माविली. हिराचंदने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चींत रहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करुन, रस्त्याच्या कडेला जाऊन बसला, नित्याप्रमाणे बादशहा त्या रस्त्याने फ़िरायला जाऊ लागला. बादशहाला दुरुन येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशहाकडे हजर केले. बादशहानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, ‘खाविंद, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळं आपला व आपल्या बेगमसाहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला, पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे, त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फ़ाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा, आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे, ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो.’ बादशहाने बिरबलाचे हे शब्द ऎकून जसे त्याला ओळखले, तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फ़र्मावलेली फ़ाशीची शिक्षा रद्द केली.
==============
इंटरनेटवरील एक वाचलेली कथा
==============
बोध
(कथा क्र.110)
राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहऱ्य मोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले.
==============
इंटरनेटवरील एक वाचलेली कथा
==============
शनिवार, २० जुलै, २०१३
शौर्याचा पुरावा
(कथा क्र.109)
बादशहा अकबराचा दरबार भरला होता. तेवढयात द्वारपालाने येऊन सांगितले की, बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत. ते राजाला काही सांगू इच्छितात. अकबराने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा केली. ते दोन्ही युवक अगदी सुदृढ, पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या हातात ढाल व तलवार होती. अकबराने त्यांना बोलण्याची परवानगी दिली. ते म्हणाले, ‘’ आम्ही राजपूत आहोत, आमची तुम्हाला विनंती आहे की, आम्हाला तुमच्या सैन्यात स्थान द्यावे. शौर्य व साहस दाखविता येईल अशी जबाबदारी सोपवावी.’’ अकबराने त्यांना विचारले, मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही शुरवीर आहात याचे काही प्रमाण आम्हाला द्याल काय? दोघेही म्हणाले, ‘’पुरावा, प्रमाण म्हणजे आम्हाला माहितच नाही. आम्ही केवळ काम करणे एवढेच जाणतो.’’हे ऐकल्यावर बादशहाचा रागाचा पारा चढला, संतापाने तो म्हणाला,’ तर मग तुम्ही शूर नाही आहात मुळी, आपण मोठे वीर असल्याचा आव आणत आहात पण खरे शूर नाहीत. शूर असल्याच्या बाता मारणा-यांसाठी हा दरबार नाही.’’ बादशहाचे हे आव्हानात्मक भाषण ऐकून त्या दोघांनी देवी भवानीचे स्मरण केले व आपल्या तलवारी बाहेर काढल्या. दोघांनीही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखविले. दोघांच्याही तलवारीतुन अक्षरक्ष: ज्वाळा बाहेर पडत होत्या. दोघांपैकी कुणीच मागे हटत नाही असे दिसत होते.शेवटची चढाई करायची म्हणून दोघांनीही ‘जय भवानी’ चा जयघोष केला. एकमेकांच्या मानेवर वार करण्यासाठी तलवारी सरसावल्या. उपस्थित मंडळी श्वास रोखून पाहत होती. पहिल्याने दुस-याच्या मानेवर वार केला, तो पडण्याच्या बेतात असताना त्यानेही तसेच प्रत्युत्तर त्याला दिले. बादशहा जागेवरून उठून धावला, मरताना ते दोघे म्हणाले, राजन, आम्ही जन्म-मृत्युमध्ये काहीच अंतर मानत नाही. तुम्ही पुरावा मागितला, वीरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता? आम्ही तर संधी मिळताच तलवारीच्या टोकाला मरण बांधून जगत असतो. अकबराला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला. त्याने त्या दोघांच्या कलेवराला कुर्निसात केला.
तात्पर्य-शूरवीर कर्माने नंतर, आधी वाणी, विचार व आचरणातून ओळखले जातात.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
(कथा क्र.109)
तात्पर्य-शूरवीर कर्माने नंतर, आधी वाणी, विचार व आचरणातून ओळखले जातात.
मंगळवार, १६ जुलै, २०१३
त्रिपिडास्तु दिने दिने
(कथा क्र.108)
मठ्ठंभटाला कधी नव्हे तो एकदा भोज राजाला भेटण्याचा योग आला. मठ्ठंभटाचा तो वरवरचा रुबाब पाहून कुणी महापंडित आपल्याकडे आला असावा, असा गैरसमज होऊन भोजराजाने त्याला नमस्कार केला; त्याबरोबर ‘सुपीडास्तु दिने दिने’ म्हणजे प्रतिदिवशी तुला गोड त्रास व्हावा.’ असा राजाला आशिर्वाद देण्याऎवजी मठ्ठंभट अज्ञानाने म्हणून गेला ‘राजा, त्रिपीडास्तु दिने दिने ।’ (राजा तुला तीन पीडा व्हाव्यात)मठ्ठंभटाने दिलेला हा शापवत ‘आशिर्वाद’ ऎकून राजा भोज रागाने लालबुंद झाला. तो आता मठ्ठंभटाला काहीतरी जबरदस्त शिक्षा देणार हे हेरुन कालीदास पुढे सरसावला व राजाला म्हणाला, ‘मठ्ठंभटांच्या आशीर्वादात फ़ार खोल अर्थ भरला आहे. पाहा ना ?
श्लोक
प्रदाने विप्रपीडास्तु, शिशुपीडास्तु भोजनें ।
शयनें पत्निपीडास्तु, त्रिपिडास्तु दिने दिने ॥
(अर्थ – दानाचे वेळी ब्राम्हणांचा त्रास व्हावा; जेवणाच्या वेळी बालकाडून व झोपण्याचे वेळी पत्नीकडून अशा त-हेने हे तीन (गोड) त्रास तुला प्रति दिनी व्हावेत.)
हे स्पष्टीकरण ऎकून प्रसन्न झालेल्या राजाने मठ्ठंभटाचा बरेच द्रव्य देऊन सन्मान केला, पण त्याचबरोबर कालीदासाने मठ्ठंभटाला यापुढे संस्कृतमधन कुणालाही आशीर्वाद न देण्याबद्दल सुचना करुन, त्याला तिथून हाकून लावला.
तात्पर्य- आपल्याजवळ जर एखाद्या गोष्टीचे अज्ञान असेल तर अशा वेळेला शांत बसणे योग्य ठरते
==============
इंटरनेटवरील एक वाचलेली कथा
==============
प्रदाने विप्रपीडास्तु, शिशुपीडास्तु भोजनें ।
शयनें पत्निपीडास्तु, त्रिपिडास्तु दिने दिने ॥
(अर्थ – दानाचे वेळी ब्राम्हणांचा त्रास व्हावा; जेवणाच्या वेळी बालकाडून व झोपण्याचे वेळी पत्नीकडून अशा त-हेने हे तीन (गोड) त्रास तुला प्रति दिनी व्हावेत.)
हे स्पष्टीकरण ऎकून प्रसन्न झालेल्या राजाने मठ्ठंभटाचा बरेच द्रव्य देऊन सन्मान केला, पण त्याचबरोबर कालीदासाने मठ्ठंभटाला यापुढे संस्कृतमधन कुणालाही आशीर्वाद न देण्याबद्दल सुचना करुन, त्याला तिथून हाकून लावला.
तात्पर्य- आपल्याजवळ जर एखाद्या गोष्टीचे अज्ञान असेल तर अशा वेळेला शांत बसणे योग्य ठरते
==============
इंटरनेटवरील एक वाचलेली कथा
==============
रविवार, १४ जुलै, २०१३
बाल हट्ट
(कथा क्र.107)
एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशहानं त्याला विचारलं, ‘बिरबल ! तू एवढा शिस्तीचा माणूस असताना, तुला आज दरबारात यायला उशीर का झाला ?’बिरबल म्हणाला, ‘काय सांगू खाविंद ? आज माझा लहान मुलगा हट्ट धरुन बसला. काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशीबशी समजूत घालून, मी तसाच घॊड्यावरून दौडत इकडे आलो.’‘बिरबल, पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला, हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही. हे बघ, तुझी परिस्थिती चांगली आहे; तुझ्याकडे नोकरचाकर आहेत; तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला, तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं, आणि तू पटकन इकडे निघून यायचं.’बिरबल म्हणाला, ‘ जहॉंपन्हा, आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना ? आपल्याकडे तर शेकडो नोकरचाकर आहेत ना ? मग आपण असं करु या; आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरुन बसतो. मी धरुन बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा. अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही. नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फ़ायदा उठवाल. आहे कबूल ?’‘हात्तिच्या ! एवढंच ना ? होऊन जाऊ दे.’ बादशहा बोलून गेला. लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हात-पाय झाडीत व रडत म्हणाला ‘आम्हाला ऊस हवा जा ऽ ऽ !’
बादशहा – (सेवकाकडे बघून) अरे बझारसिंग ! माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ? (ऊस येताच) हा बघ आणला ऊस. तो घे आणि चूप रहा.
बिरबल – ( रडण्याचा सूर वरच्या पट्टीत नेत) आम्हाला ऊस असा नको जा ऽऽऽ! त्याचे खंड खंड करुन हवेत.
बादशहा – ( दुसऱ्या सेवकास) अरे खंडोजी ! सुरा आणून, तू माझ्य चिमूरड्याला या उसाचे खंड खंड करुन दे पाहू ? (सेवकाने तसे करताच) हे बघ दिले तुकडे तुकडे करुन. कर आवाज बंद. काय रे ? आता का उगाच केकाटतोस ?
बिरबल – (आवाज पूर्वीपेक्षा चढवून) आता आम्हाला अखंड ऊस हवा जा ऽऽऽ! असे तुकडे तुकडे केलेला नको !
बादशहा – (सेवकास) अरे ऊसखॉं ! माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू ? ( दिला जाताच) आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस ? मग आता का बोंबलतोस ?
बिरबल -(रडण्याचा सूर टिपेला नेत) आम्हाला नवा अखंड ऊस नको जा ऽऽऽ ! खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करुन हवा. ऑं ! ऑं ! ऑं
बादशहा – (भडकून) आता मात्र रडलास, तर त्या उरलेल्या अखंड ऊसानंच झोडपून काढीन.
बिरबल – (एकदम ठाकठीक बसून) खाविंद, मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा, असं ठरलं होत ना ? मग आता माराची धमकी का देता ?
बादशहा – नाही रे बाबा, शरण आलो मी तुला. वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर; पण माझ्या डोक्याची शीर आता तू उठवू नकोस.’ बालहट्टापुढं शरणागती पत्करावी लागते,’ हे तुझं म्हणणं मी मान्य केलं; मग तर झालं?
तात्पर्य-राजहट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट यापुढे भले भले माथा टेकतात.
==============
इंटरनेटवरील एक वाचलेली कथा
==============