मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

इच्‍छांना अंत नसतो


कथा क्र.238

एक राजा प्रजेच्‍या सुखसुविधेकडे लक्ष द्यायचा. तरीही प्रजेकडून दर दिवसाला नवीन मागणी यायची. प्रजेला संतुष्‍ट ठेवण्‍यासाठी राजा रात्रंदिवस झटत होता. परंतु प्रजेच्‍या इच्‍छेला अंत नव्‍हता. अखेरीस राजा आजारी पडला. कारण तो दु:खी कष्‍टी राहत होता. काय केल्‍याने प्रजा सुखी राहिल याचा तो विचार सातत्‍याने करत असे. अनेक वैद्यांनी राजाच्‍या प्रकृतीची तपासणी केली. राजावर उत्तमात उत्तम उपचार करण्‍यात आले, औषधपाणी करण्‍यात आले परंतु फायदा होत नव्‍हता. कारण राजाचे दुखणे हे मानसिक स्‍वरूपाचे होते. योगायोगाने एके दिवशी हिमालयातील साधू त्‍याच्‍याकडे आले. राजाने त्‍यांना आपली व्‍यथा सांगितली. राजा म्‍हणाला, महाराज तुम्‍ही परमज्ञानी आहात, माझ्यावरील संकट दूर करा. साधूंना सर्व परिस्थिती माहिती होती. राजाला शारीरिक नव्‍हे तर मानसिक आजार होता. तो दूर करण्‍याची गरज होती. त्‍यांनी राजाला समजावले, तुझी विचार करण्‍याची पद्धतच तुझी व्‍यथा बनली आहे. तू प्रजेच्‍या इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी आटापिटा करतो आहेस, पण तू हे विसरतोस की, मन हे चंचल असते. मनात विविध प्रकारच्‍या इच्‍छा उत्‍पन्न होतच राहतात. त्‍यामुळे तुझी प्रजा काही ना काही इच्‍छा व्‍यक्त करणारच, तू त्‍यांना जितके देत जाशील तितके त्‍यांचा हव्‍यास वाढत जाईल. मनाच्‍या संतुष्‍टीला सीमा नसते. सुख इच्‍छेची नियंत्रित पूर्ती करण्‍यामध्‍ये आहे. तेव्‍हा इच्‍छा नियंत्रणात ठेवण्‍याची गरज असते. तीच सवय जनतेला लावली पाहिजे. यामुळे तू स्‍वत:चे मानसिक स्‍वास्‍थ हरवून बसला आहेस. राजाला आपली चूक लक्षात आली.

तात्‍पर्य :- इच्‍छा या अमरवेलीसारख्‍या असतात, त्‍या अमर्याद असतात, पहिली इच्‍छा किंवा शंभरावी इच्‍छा ही अमर्यादच असते, तिला मरण नाही फक्त मर्यादित ठेवणे किंवा नियंत्रण ठेवणे हेच आपल्‍या हातात आहे.

मराठी बोधकथा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा