सोमवार, २९ एप्रिल, २०१३
शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३
(स्वत्व)
(कथा क्र ६८)
एका जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न राहिल्याने आपल्या जमातीतील प्राणी कसे वागतात याचे त्याला ज्ञान नव्हते. एके दिवशी बकऱ्या चरत असताना एक वाघ त्यांना पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बक-या शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वाघाचे पिल्लू पण हिंडत आहे. बकऱ्याना त्या पिल्लाची भीती वाटत नाही म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात वाढलेले आहे हे त्याच्या लक्षात येते. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि गर्जना करतो, त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो तसे ते वाघाचे पिल्लू पण पळायला सुरुवात करते, पण मोठा वाघ त्याला अडवतो आणि म्हणतो," अरे! मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळाल्या हे ठीक आहे. पण तू का पळत आहेस? आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत आहेस? बकऱ्या पळून जाणे साहजिक आहे पण मी थांब म्हंटल्यावर तू थांबला याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला देतो " असे म्हणून मोठा वाघ पिल्लाला घेवून पाण्याजवळ जातो तेथे त्याचे प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातील वाघ असण्याची जाणीव करून देतो. पिल्लाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते व ते आपल्या वाघांच्या समुहात राहायला जाते.
तात्पर्य-स्वत्वाची जाणीव होणे हि मोठी गोष्ट आहे.आपण आपल्यातील आपल्याला जोपर्यंत ओळखत नाहीत तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणे राहते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
बुधवार, २४ एप्रिल, २०१३
(हार जीत)
(कथा क्र.६७)
एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमधेही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या महाविद्यालयातील गणेश नावाचा एक विद्यार्थी प्राचार्यांना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,"सर! मी संजयपेक्षाही जास्त अचूकतेने नेम साधू शकतो. संजयला पराजित करणे हे माझे उद्दिष्ट आहे." प्राचार्य मंदसे हसले आणि पुढे गेले, कारण त्यांना माहित होते कि संजयला हरवणे इतके सोपे काम नाही. स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एका धाग्याला एक लाकडी फळ बांधले होते, त्याचा वेध नेमबाजांनी घ्यायचा होता. सर्व नेमबाजांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना यश मिळाले नाही. फक्त गणेश आणि संजय हे दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले. गणेशने यावेळी पुढाकार घेतला. त्याने पहिला नेम साधला तो अचूकपणे, दुसरा नेम त्याचा हुकला आणि तिसराही नेम योग्य पद्धतीने साधला. आता संजयची वेळ होती. संजय नेमबाजीला उभारला कि मुलांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. संजयने पहिला नेम मारला तो चुकला, दुसरा मारला तोही चुकला आणि तिसराही नेम त्याला मारता आला नाही. संजय पराजित झाला. सारी मुले, शिक्षक हिरमुसले झाले. संजय प्रथमच पराजित झाला होता. प्राचार्यांना व शिक्षकांना संजय हरला यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याला एकटे बोलावून घेतले. अनेकांनी त्याला विचारले पण तो काही सांगायला तयार होईना. शेवटी प्राचार्यांनी त्याच्यावर दबाव टाकला तेंव्हा त्याने सांगितले,"सर ! गणेशला मी बाहेर त्याच्या मित्रांबरोबर बोलताना ऐकले कि त्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे या पुरस्काराच्या रकमेतून त्याची फी तो भरणार आहे. मी या गोष्टीची अनेक मित्रांकडून खात्री केली. सर माझ्या हरण्याने जर कुणाचे आयुष्याचे कल्याण होत असेल तर मी कायम हरायला तयार आहे. सर माफ करा यामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला पण त्यातून एका विद्यार्थ्याचे आयुष्य उभारेल याचे मला समाधान आहे." या त्याच्या बोलण्याने सर्वच उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या व प्राचार्यांनी संजयचे एक विशेष गुणवान विद्यार्थी म्हणून अभिनंदन केले.
तात्पर्य-आपल्या सदवर्तन करण्याने कुणाचे ना कुणाचे चांगले कसे करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
सोमवार, २२ एप्रिल, २०१३
(आत्म्याचा संवाद)
(कथा क्र.६६)
एकदा अकबर आणि बिरबल यांच्यात बोलणे चालू होते. बोलता बोलता बिरबल म्हणून गेला,"बादशहा! आपण जसे एकमेकांशी बोलतो तसेच आपले आत्मे एकमेकांशी बोलतात." हे ऐकून अकबर लगेच म्हणाला,"असे बोलणे तुला शोभत नाही, एकतर हे सिद्ध कर नाही तर शिक्षेला तयार हो." बिरबलाने आपले बोलणे सिद्ध करून दाखविण्याची तयारी केली. बिरबल व अकबर लगेचच वेषांतर करून ग्रामीण पोशाखात बाहेर पडले. बिरबल मालक तर अकबर बादशहा त्याचा नोकर झाला होता. काही अंतर गेल्यावर त्यांना एक जंगल लागले, समोरच एक लाकुडतोड्या झाडे तोडत होता. त्याला पाहताच बिरबलाने अकबराला विचारले,"हुजूर! या लाकुडतोड्याबद्दल आपले काय मत आहे?" बादशहा म्हणाला, "अरे याला आताच्या आता मारून टाकावेसे वाटत आहे. तुला दिसत नाही का तो फळा फुलांनी बहरलेले हिरवेगार झाड तोडत आहे ते?" बिरबलाने म्हंटले,"आपण त्याच्याजवळ जाऊ" ते त्याच्याजवळ गेले आणि बिरबल लाकूडतोड्याला म्हणाला,"भाऊ! तू हे हिरवेगार झाड का तोडत आहे?" लाकुडतोड्या म्हणाला,"मित्रा ! अरे माझे उदरनिर्वाहासाठी हि झाडे लागतात.राजधानीकडून आलेले दिसताय काय नवीन बातमी?" बिरबल म्हणतो,"अरे अकबर बादशहा या जगात राहिले नाहीत" लाकुडतोड्या म्हणतो," बरे झाले गेला तो अकबर ! बदमाश होता !" या उत्तराने अकबर हैराण झाला पण त्याने नोकराचा वेश घेतल्या कारणाने त्याला काही बोलता येईना. बिरबलाने त्याला पुढे चालण्यास सांगितले. दोघे पुढे गेले तर काही अंतराने एक वृद्ध महिला बकऱ्या चारताना दिसली, बिरबलाने परत अकबराला विचारले,"या महिलेबद्दल तुमचे मत काय?" अकबर म्हणाला,"या म्हाताऱ्या वयात सुद्धा ती बकऱ्या चारत उन्हातान्हात फिरत आहे म्हणजे ती तिच्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेत आहे." बिरबल काहीच न बोलता वृद्धेकडे अकबराला घेवून गेला. त्याने वृद्धेला विचारले,"आजी तुम्ही या वयात बकऱ्या का चारत आहात?" वृद्ध महिला म्हणाली,"माझ्या कुटुंबाचे पोट या बकऱ्यांवर चालते." त्यानंतर बिरबलाने तिलाही अकबराच्या मृत्यूची बातमी सांगितली, त्याबरोबर वृद्धा मोठ्यामोठ्याने रडू लागली. हे पाहून दोघेही तिथून पुढे गेले. मग बिरबल अकबराला म्हणाला,हुजूर, तुम्ही लाकुद्तोड्याबद्दल गैर शब्द वापरले त्यानेही तसेच शब्द तुमच्याबद्दल वापरले, याउलट वृद्धेच्या बाबतीत तुम्ही चांगले बोलला तिने तुमच्या खोट्या मृत्यूवर खरे दुःख व्यक्त केले. म्हणजेच आपल्याला हे मान्य करावेच लागेल कि तुमच्या आत्म्याने जे विचार प्रकाशित केले त्याचे प्रत्युत्तर समोरच्या अत्म्याकडून मिळाले, खरय ना !" अकबर हसला.
तात्पर्य-सदभावनेतून सदभावना वाढीस लागते. वाईटातून वाईट घडते, त्यामुळे सर्वांसाठी चांगला विचार करा, चांगलेच प्रत्युत्तर मिळेल.
वर्तमानपत्रातून संग्रहित
शनिवार, २० एप्रिल, २०१३
(खरे ऐश्वर्य)
(कथा क्र.६५)
आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती.चालता चालता ती एका ओढ्याकाठी पोहोचली, उन्हात चालून ती दमली होती, तिला तहानही लागली होती, ती ओढ्यापाशी थांबली, गार पाण्याने तोंड धुतले, पाणी प्यायली, आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि झाल्यावर पुढे निघाली. तेवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसली, तिने ती रत्ने उचलून आपल्या पिशवीत ठेवली. दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला, त्याला भूक लागली होती, तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला दिले. उघड्या पिशवीत ठेवलेले रत्न प्रवाशाला दिसले त्याने त्या महिलेला मागितले, तिने क्षणाचा विचार ना करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न त्या प्रवाशाला देवून टाकले. प्रवासी आनंदून निघून गेला. त्याला माहित होते कि ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल कि त्यात त्याचे आयुष्य सुखात तो सुखात जगू शकेल. पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला शोधात आला होता. त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि म्हणाला," तुमच्याकडून रत्न घेतल्यावर अगदी नि:स्पृहपणे ते रत्न देतानाचा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा दिसत होता. इतक्या सहजपणे तुम्ही ते मौल्यवान रत्न मला दिले आणि ते मी घेतले पण त्याने मला शांती दिली नाही. पैसा मी हि करू शकलो असतो त्या रत्नाचा पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रत्न देताना जी शांती ठेवली होती ती मला गप्प बसू देत नव्हती. कृपा करून मला या रत्नापासून सुटका द्या आणि तुमच्या अध्यात्मिक अनुभूतीमधून मला शांती मिळवून द्या"
तात्पर्य-मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही, त्यासाठी मन मोठे, उदार असावे लागते तेंव्हाच मनशांती मिळते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
तात्पर्य-मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही, त्यासाठी मन मोठे, उदार असावे लागते तेंव्हाच मनशांती मिळते.
वर्तमानपत्रातून संग्रहित