सोमवार, २९ एप्रिल, २०१३
शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३
(स्वत्व)
(कथा क्र ६८)
एका जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न राहिल्याने आपल्या जमातीतील प्राणी कसे वागतात याचे त्याला ज्ञान नव्हते. एके दिवशी बकऱ्या चरत असताना एक वाघ त्यांना पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बक-या शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वाघाचे पिल्लू पण हिंडत आहे. बकऱ्याना त्या पिल्लाची भीती वाटत नाही म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात वाढलेले आहे हे त्याच्या लक्षात येते. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि गर्जना करतो, त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो तसे ते वाघाचे पिल्लू पण पळायला सुरुवात करते, पण मोठा वाघ त्याला अडवतो आणि म्हणतो," अरे! मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळाल्या हे ठीक आहे. पण तू का पळत आहेस? आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत आहेस? बकऱ्या पळून जाणे साहजिक आहे पण मी थांब म्हंटल्यावर तू थांबला याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला देतो " असे म्हणून मोठा वाघ पिल्लाला घेवून पाण्याजवळ जातो तेथे त्याचे प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातील वाघ असण्याची जाणीव करून देतो. पिल्लाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते व ते आपल्या वाघांच्या समुहात राहायला जाते.
तात्पर्य-स्वत्वाची जाणीव होणे हि मोठी गोष्ट आहे.आपण आपल्यातील आपल्याला जोपर्यंत ओळखत नाहीत तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणे राहते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
बुधवार, २४ एप्रिल, २०१३
(हार जीत)
(कथा क्र.६७)
एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमधेही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या महाविद्यालयातील गणेश नावाचा एक विद्यार्थी प्राचार्यांना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,"सर! मी संजयपेक्षाही जास्त अचूकतेने नेम साधू शकतो. संजयला पराजित करणे हे माझे उद्दिष्ट आहे." प्राचार्य मंदसे हसले आणि पुढे गेले, कारण त्यांना माहित होते कि संजयला हरवणे इतके सोपे काम नाही. स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एका धाग्याला एक लाकडी फळ बांधले होते, त्याचा वेध नेमबाजांनी घ्यायचा होता. सर्व नेमबाजांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना यश मिळाले नाही. फक्त गणेश आणि संजय हे दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले. गणेशने यावेळी पुढाकार घेतला. त्याने पहिला नेम साधला तो अचूकपणे, दुसरा नेम त्याचा हुकला आणि तिसराही नेम योग्य पद्धतीने साधला. आता संजयची वेळ होती. संजय नेमबाजीला उभारला कि मुलांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. संजयने पहिला नेम मारला तो चुकला, दुसरा मारला तोही चुकला आणि तिसराही नेम त्याला मारता आला नाही. संजय पराजित झाला. सारी मुले, शिक्षक हिरमुसले झाले. संजय प्रथमच पराजित झाला होता. प्राचार्यांना व शिक्षकांना संजय हरला यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याला एकटे बोलावून घेतले. अनेकांनी त्याला विचारले पण तो काही सांगायला तयार होईना. शेवटी प्राचार्यांनी त्याच्यावर दबाव टाकला तेंव्हा त्याने सांगितले,"सर ! गणेशला मी बाहेर त्याच्या मित्रांबरोबर बोलताना ऐकले कि त्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे या पुरस्काराच्या रकमेतून त्याची फी तो भरणार आहे. मी या गोष्टीची अनेक मित्रांकडून खात्री केली. सर माझ्या हरण्याने जर कुणाचे आयुष्याचे कल्याण होत असेल तर मी कायम हरायला तयार आहे. सर माफ करा यामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला पण त्यातून एका विद्यार्थ्याचे आयुष्य उभारेल याचे मला समाधान आहे." या त्याच्या बोलण्याने सर्वच उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या व प्राचार्यांनी संजयचे एक विशेष गुणवान विद्यार्थी म्हणून अभिनंदन केले.
तात्पर्य-आपल्या सदवर्तन करण्याने कुणाचे ना कुणाचे चांगले कसे करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
सोमवार, २२ एप्रिल, २०१३
(आत्म्याचा संवाद)
(कथा क्र.६६)
एकदा अकबर आणि बिरबल यांच्यात बोलणे चालू होते. बोलता बोलता बिरबल म्हणून गेला,"बादशहा! आपण जसे एकमेकांशी बोलतो तसेच आपले आत्मे एकमेकांशी बोलतात." हे ऐकून अकबर लगेच म्हणाला,"असे बोलणे तुला शोभत नाही, एकतर हे सिद्ध कर नाही तर शिक्षेला तयार हो." बिरबलाने आपले बोलणे सिद्ध करून दाखविण्याची तयारी केली. बिरबल व अकबर लगेचच वेषांतर करून ग्रामीण पोशाखात बाहेर पडले. बिरबल मालक तर अकबर बादशहा त्याचा नोकर झाला होता. काही अंतर गेल्यावर त्यांना एक जंगल लागले, समोरच एक लाकुडतोड्या झाडे तोडत होता. त्याला पाहताच बिरबलाने अकबराला विचारले,"हुजूर! या लाकुडतोड्याबद्दल आपले काय मत आहे?" बादशहा म्हणाला, "अरे याला आताच्या आता मारून टाकावेसे वाटत आहे. तुला दिसत नाही का तो फळा फुलांनी बहरलेले हिरवेगार झाड तोडत आहे ते?" बिरबलाने म्हंटले,"आपण त्याच्याजवळ जाऊ" ते त्याच्याजवळ गेले आणि बिरबल लाकूडतोड्याला म्हणाला,"भाऊ! तू हे हिरवेगार झाड का तोडत आहे?" लाकुडतोड्या म्हणाला,"मित्रा ! अरे माझे उदरनिर्वाहासाठी हि झाडे लागतात.राजधानीकडून आलेले दिसताय काय नवीन बातमी?" बिरबल म्हणतो,"अरे अकबर बादशहा या जगात राहिले नाहीत" लाकुडतोड्या म्हणतो," बरे झाले गेला तो अकबर ! बदमाश होता !" या उत्तराने अकबर हैराण झाला पण त्याने नोकराचा वेश घेतल्या कारणाने त्याला काही बोलता येईना. बिरबलाने त्याला पुढे चालण्यास सांगितले. दोघे पुढे गेले तर काही अंतराने एक वृद्ध महिला बकऱ्या चारताना दिसली, बिरबलाने परत अकबराला विचारले,"या महिलेबद्दल तुमचे मत काय?" अकबर म्हणाला,"या म्हाताऱ्या वयात सुद्धा ती बकऱ्या चारत उन्हातान्हात फिरत आहे म्हणजे ती तिच्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेत आहे." बिरबल काहीच न बोलता वृद्धेकडे अकबराला घेवून गेला. त्याने वृद्धेला विचारले,"आजी तुम्ही या वयात बकऱ्या का चारत आहात?" वृद्ध महिला म्हणाली,"माझ्या कुटुंबाचे पोट या बकऱ्यांवर चालते." त्यानंतर बिरबलाने तिलाही अकबराच्या मृत्यूची बातमी सांगितली, त्याबरोबर वृद्धा मोठ्यामोठ्याने रडू लागली. हे पाहून दोघेही तिथून पुढे गेले. मग बिरबल अकबराला म्हणाला,हुजूर, तुम्ही लाकुद्तोड्याबद्दल गैर शब्द वापरले त्यानेही तसेच शब्द तुमच्याबद्दल वापरले, याउलट वृद्धेच्या बाबतीत तुम्ही चांगले बोलला तिने तुमच्या खोट्या मृत्यूवर खरे दुःख व्यक्त केले. म्हणजेच आपल्याला हे मान्य करावेच लागेल कि तुमच्या आत्म्याने जे विचार प्रकाशित केले त्याचे प्रत्युत्तर समोरच्या अत्म्याकडून मिळाले, खरय ना !" अकबर हसला.
तात्पर्य-सदभावनेतून सदभावना वाढीस लागते. वाईटातून वाईट घडते, त्यामुळे सर्वांसाठी चांगला विचार करा, चांगलेच प्रत्युत्तर मिळेल.
वर्तमानपत्रातून संग्रहित
शनिवार, २० एप्रिल, २०१३
(खरे ऐश्वर्य)
(कथा क्र.६५)
आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती.चालता चालता ती एका ओढ्याकाठी पोहोचली, उन्हात चालून ती दमली होती, तिला तहानही लागली होती, ती ओढ्यापाशी थांबली, गार पाण्याने तोंड धुतले, पाणी प्यायली, आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि झाल्यावर पुढे निघाली. तेवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसली, तिने ती रत्ने उचलून आपल्या पिशवीत ठेवली. दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला, त्याला भूक लागली होती, तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला दिले. उघड्या पिशवीत ठेवलेले रत्न प्रवाशाला दिसले त्याने त्या महिलेला मागितले, तिने क्षणाचा विचार ना करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न त्या प्रवाशाला देवून टाकले. प्रवासी आनंदून निघून गेला. त्याला माहित होते कि ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल कि त्यात त्याचे आयुष्य सुखात तो सुखात जगू शकेल. पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला शोधात आला होता. त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि म्हणाला," तुमच्याकडून रत्न घेतल्यावर अगदी नि:स्पृहपणे ते रत्न देतानाचा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा दिसत होता. इतक्या सहजपणे तुम्ही ते मौल्यवान रत्न मला दिले आणि ते मी घेतले पण त्याने मला शांती दिली नाही. पैसा मी हि करू शकलो असतो त्या रत्नाचा पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रत्न देताना जी शांती ठेवली होती ती मला गप्प बसू देत नव्हती. कृपा करून मला या रत्नापासून सुटका द्या आणि तुमच्या अध्यात्मिक अनुभूतीमधून मला शांती मिळवून द्या"
तात्पर्य-मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही, त्यासाठी मन मोठे, उदार असावे लागते तेंव्हाच मनशांती मिळते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
तात्पर्य-मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही, त्यासाठी मन मोठे, उदार असावे लागते तेंव्हाच मनशांती मिळते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३
(मदत)
(कथा क्र ६५)
वीरगडचा राजा सूर्यप्रताप दयाळू आणि परोपकारी होता. त्याच्या राज्यातील एका गावात एकेवर्षी पाऊस पडला नाही. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्या गावात रामचरण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळामुळे त्याच्या घरात खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते, राजाने मदत पाठविली पण गावातील मुखियाने आपल्याच लोंकाना त्या मदतीचा लाभ दिला. जेंव्हा रामचरण मदत मागण्यासाठी गेला तेंव्हा मुखिया त्याला रागावला, आणि त्याला हाकलून दिले. रामचरणची पत्नी आणि मुलाने भुकेने तडफडून जीव टाकला. तेंव्हा रामचरणने वैराग्य स्वीकारले आणि एका साधूच्या दलासोबत तो निघून गेला. साधू दिवसभर भिक्षा मागत असत आणि रात्री मादक पदार्थ खावूनपिवून चोऱ्या करीत असत. चुकीच्या संगतीमुळे रामचरणही नकली ज्योतिषी बनून पैसा जमा करीत असे. त्याने दिवसभर फिरून लोकांविषयी माहिती गोळा करत असे व त्या माहितीचा वापर करत रात्री ज्योतिषाचा वेष धारण करून लोंकाना मूर्ख बनवीत असे. जेंव्हा तो ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाला तेंव्हा राजा सूर्यप्रताप त्याला भेटण्यासाठी आला. परंतु त्याने येण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहिली, रामचरणचे खरे रूप राजाला समजले, सैनिकांनी रामचरणला पकडून राजापुढे उभे केले, राजाने त्याला या त्याच्या खोट्या वागण्याचे कारण विचारले, तेंव्हा रामचरण म्हणाला,"महाराज ! गावाच्या मुखीयाने तुमच्या पाठविलेल्या मदतीतून जर फक्त दोन भाकरी आणि पाणी जर मला दिले असते तर माझी बायको आणि मुलगा मरण्यापासून वाचले असते. तुमची मदत मिळाली नाही आणि ते दोघे भुकेने तडफडून मेले, ते दोघे जगले असते तर मी असा खोटारडेपणाने कधीच वागलो नसतो. लोकांचे ज्योतिष मी काय बघणार! मला माझे कुटुंब सांभाळता आले नाही, माझी व्यथा समजून घ्या. महाराज ! तुम्ही मदत पाठविली पण आमच्यापर्यंत ती आलीच नाही. आता तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे." त्याचे हे खरे बोलणे पाहता राजाने त्याचे गुन्हे लक्षात घेता त्याला सौम्य शिक्षा दिली व त्यानंतर त्याला त्या गावाचा मुखिया बनविले व जुन्या मुखीयाला कडक शिक्षा केली.
तात्पर्य-संकटग्रस्त व्यक्तीला योग्यवेळी पोहोचलेली मदत योग्य ते कार्य साध्य करते, अन्यथा संकटात सापडलेल्या जीवांचा जीव जाण्याची शक्यता असते. जर कुणी संकटात असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
गुरुवार, १८ एप्रिल, २०१३
(संत बहिणाबाई)
(कथा क्र ६३)
बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या.एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला,"मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.
तात्पर्य- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "
वर्तमानपत्रातून संग्रहित
बुधवार, १७ एप्रिल, २०१३
(जाणीव)
(कथा क्र.६२)
बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे."
तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.
वर्तमानपत्रातून संग्रहित
मंगळवार, १६ एप्रिल, २०१३
(शिकवण)
(कथा क्र. ६१)
एका गावात हिरामण आणि नारायण या नावाचे दोन शेतकरी राहत होते. दोघेही चांगले मित्र होते. हिरामण मोठ्या शेतजमिनीचा मालक होता तर नारायणाजवळ थोडी जमीन होती. पण नारायण त्यात संतुष्ट होता. एकेदिवशी नारायण हिरामणकडे गेला तेंव्हा हिरामण खूपच त्रस्त झालेला त्याला दिसत होता. त्याच्या संपूर्ण घरात वास येत होता आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत होते. नारायणने हिरामणला त्याच्या अडचणीचे कारण विचारले, तेंव्हा म्हणाला, समजत नाही कि माझी शेती नष्ट का होत आहे? गरजेपुरते धान्यही पिकत नाही. असेच जर चालत राहिले तर काही काळानंतर जगणेही मुश्कील होईल," नारायणने हैराण होवून विचारले, "तुझ्याकडे तर इतकी जमीन आहे. मग तुझे का हाल होत आहेत? तू माझ्या घरी चल. तिथून आपण दोघे एका संताकडे जाऊ, ते तुला योग्य मार्ग दाखवतील." असे म्हणून दोघे नारायणाच्या घरी आले.नारायणाचे घराचे अंगणात येताच हिरामण चमकला, कारण अंगण स्वच्छ झाडून सडा रांगोळी केली होती, जनावरांचे गोठे स्वच्छ दिसत होते. घरात फारशी सुबत्ता नसतानासुद्धा नीटनेटकेपणे घर आवरले होते. देवाच्या तसबिरींना ताज्या फुलांचे हार घातलेले होते, देवापुढे अगरबत्ती लावलेली होती. घरातील वातावरण शांत होते. हे दोघे येताच नारायणाच्या पत्नीने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली. खाणे झाल्यावर नारायण व त्याची पत्नी हे दोघे हिरामणला सांगून काही काळ घरातील कामे करण्यात दंग झाले. कामे आटोपताच नारायण हिरामणला म्हणाला,"चल मित्रा ! आता संतांकडे जाऊ." यावर हिरामण उत्तरला,"मित्रा! तुझ्या घरी येऊन माझे डोळे उघडले आहेत. आता मी सुद्धा तुझ्यासारखे वागण्याचा प्रयत्न करेन. संतांकडे जाण्याची गरज आता मला वाटत नाही, तू मला अशी शिकवण तुझ्या वागणुकीतून दिली आहेस. धन्यवाद मित्रा ! चल निघतो मी.माझे घर आवरायला."
तात्पर्य-"हात फिरे तिथे लक्ष्मी वसे" या म्हणीनुसार आचरण केल्यास मन प्रसन्न राहते व यश प्राप्तीचा मार्ग दिसतो./ आत्मनिर्भरता(स्वावलंबन) हि यशाची गुरुकिल्ली आहे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
रविवार, १४ एप्रिल, २०१३
(अर्थ)
(कथा क्र.६०)
एक पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला कि राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी हरवू शकत नाही याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले कि राजाला आपली विद्वत्ता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे त्याच्या मनात होते. त्यानुसार ठरवून तो राजदरबारात गेला, त्याने पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुरोहीताने पंडिताला प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला,"पाच मी, पाच शी, पाच न मी आणि पाच न शी याचा अर्थ सांगा?" राजपुरोहीताला प्रश्न समजला नाही. त्याने राज्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागून घेतली. राजाने मुदत दिली मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच. सात दिवसात पुरोहिताने उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने,नशिबाने साथ दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांना हि या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण त्यानाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताने विचाराची दिशा सोडून दिली, आता फक्त मृत्यूचा विचार तो करत होता. मृत्युच्या भीतीने त्याने नगर सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालून चालून थकला तेंव्हा एका झोपडीपाशी जावून बसला. योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत होता,"माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने राजपुरोहित मरणार हे खरे ! अगं ! पंधरा तिथीमध्ये पाच तिथी अशा असतात कि त्यांच्या पुढे 'मी' प्रत्यय लागतो -पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात ज्यामध्ये 'शी' प्रत्यय लागतो-एकादशी,द्वादशी,त्रयोदशी, चतुर्दशी आणि पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मीही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही-प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. बघ हे उत्तर राजपुरोहीताला कधीच येणार नाही." हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात उत्तर दिले व स्वत:चा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला.
तात्पर्य- दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जावू शकतो.
वर्तमानपत्रातून संग्रहित
शुक्रवार, १२ एप्रिल, २०१३
(मनोबल)
(कथा क्र.५९)
एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.
तात्पर्य-निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
बुधवार, १० एप्रिल, २०१३
(ओळख)
(कथा क्र ५९)
राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले. सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली.
तात्पर्य-विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
मंगळवार, ९ एप्रिल, २०१३
(आत्मविश्वास)
(कथा क्र.५७)
एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता.अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.
तात्पर्य- आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.
इंटरनेटवरून संग्रहित
एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता.अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.
सोमवार, ८ एप्रिल, २०१३
(पिसन हारीची विहीर)
(कथा क्र.५६)
प्राचीन भारतात बालविवाहाची प्रथा होती. याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे त्याकाळी मुलीना अशिक्षित ठेवले जायचे आणि एखाद्या मुलीचा पती मृत्यू पावल्यास तिला आयुष्यभर दुख:च सोसावे लागे. मेहनत आणि मजुरीशिवाय तिच्याकडे पर्याय नसे. अशीच एक गरीब बालविधवा पूर्व मथुरेजवळ राहत होती. ती एकटीच होती आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी ती पिठाची गिरणी चालवायची. एक दिवस तिच्या मनात गावातून शहराकडे जाणा-या रस्त्यावर एक विहीर खोदण्याचा विचार आला. कारण त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नव्हती. मात्र त्या बिचाऱ्या गरीब विधवेकडे विहीर खोदून घेण्यासाठी पैसेही नव्हते. शेवटी तिने विचार केला कि दिवसभरात ती दोन आणे मिळवते त्यातील दोन पैसे पाठीमागे टाकायला पाहिजेत. तिने पैसे जमवायला सुरुवात केली. असे करता करता तिने अनेक वर्षे पैसे मागे टाकले. वृद्धावस्थेत तिच्याकडे एक हजार रुपये जमा झाले. (त्या काळी हजार रुपयांना खूप किंमत होती) त्यावेळी तिने आज दिल्ली-आग्रा नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर एक पक्की विहीर खोदली. आजही ती विहीर तिच्या नावाने ओळखली जाते. लोक त्या विहिरीला पिसन हारीची विहीर म्हणून ओळखतात. त्या मार्गावर ती गरीब विधवा तिच्या पश्चात पण प्रसिद्ध आहे. लोक तिथे थांबतात, पाणी पितात आणि मनातून तिच्या कार्याचे आभार मानतात.
तात्पर्य -मर्यादित साधने असतील पण दृढ संकल्पशक्ती असेल तर अशक्य वाटणारे काम शक्य होते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३
(संत रज्जब आणि जुबेर)
कथा क्र ५५
संत रज्जब नेहमीच सर्वोच्च शक्तीच्या स्मरणात मग्न राहत असत. ना कधी वाईट वागत न वाईट विचार करत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकास ते समान वागणूक देत, सदाचरणाबद्दल सांगत, प्रेमळ व गोड वाणीने बोलत. रज्जब आपल्या गावातील लोकांचे श्रद्धाकेंद्र बनले होते. गावातील लोक त्यांचे विचार ऐकत असत आणि व्यवहारात आचरण करत असत. एकेदिवशी परगावचा जुबेर नावाचा एक तरुण त्या गावात कामाच्या शोधात आला होता. त्याला काम तर मिळाले परंतु पैसा हाती येताच तो दारूच्या आहारी गेला. दारू पिऊन तो लोकांना शिव्या देत असे. यामुळे एके दिवशी त्याने दारू पिऊन खूप हंगामा केला, लोकांना खूप काही बोलला आणि तोल ना सावरता आल्याने तो गटारीत जावून पडला. लोकांना वाईटसाईट बोलल्याने त्याला कुणी गटारीतून काढण्यास पुढे आले नाही. त्याचवेळी रज्जब तिथे आले. त्यांनी त्याला उचलले, त्याचे तोंड धुतले आणि जुबेरला म्हणाले,"अरे मित्रा! ज्या तोंडातून तू देवाचे नाव घेतले पाहिजे त्या तोंडातून दारू पितो आणि त्याच तोंडातून ईश्वर स्वरूप असलेल्या अनेक माणसाना शिव्या देतो हे चांगले नाही. हा माणुसकीचा सर्वात मोठा गुन्हा आहे. पण हे कळण्यासाठी जुबेर कुठे शुद्धीत होता. त्याला हे सर्व इतर लोकांनी सांगितले तेंव्हा तो स्वत:बद्दल जास्त वाईट वाटले. लोकांनी त्याला संतांनी केलेल्या सहकार्याची जाणीव करून दिली. या गोष्टीचा जुबेरवर खूप परिणाम झाला. त्याने संकल्प केला कि ज्या तोंडाला संतानी धुतले त्या तोंडातून आयुष्यात कधीच वाईट शब्द निघणार नाहीत. त्याने सात्विक जीवनमार्ग पत्करला.
तात्पर्य-संतांचे मार्गदर्शन नेहमीच चांगले असते, फक्त त्यानुसार आचरण करणे हे आपल्या हातात आहे. चांगले आचरण हि माणसाची ओळख आहे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
गुरुवार, ४ एप्रिल, २०१३
(शिकारी आणि कबुतर)
(कथा क्र. ५४)
एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने दु:खी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले, ती भावनावश झाली ती कबुतराला म्हणाली," मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे." कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली. त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतराने शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दु:खी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली. शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.
तात्पर्य - माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
मंगळवार, २ एप्रिल, २०१३
(गुरुनानक आणि नवाब)
( कथा क्र.५३)
एकदा गुरुनानक सुलतानपूरच्या नवाबाकडे घरी गेले. नवाबानी गुरुदेवांचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यानंतर दोघांच्यामध्ये धर्मावर चर्चा सुरु झाली. नवाबानी म्हटले, आपण हिंदू-मुस्लीम यामध्ये काहीच अंतर करत नाही. त्यामुळे आज तुम्ही माझ्याबरोबर नमाज अदा करण्यासाठी चला. नानकदेव म्हणाले,देणारा एक आहे आणि घेणारा एक आहे तर मी कोण अंतर करणारा? चला मशिदीत चला. दोघेही मशिदीत गेले. नवाबसाहेब नमाज अदा करू लागले, नानकही ध्यानमग्न होवून एका मुद्रेत उभे राहिले. नमाज होताच नवाब म्हणाले, आपण तर नमाज अदा केली नाही. नानक म्हणाले, "माफ करा! आपण जेंव्हा नमाज अदा करत होता तेंव्हा माझे मन माझ्या स्वामींकडे होते. त्या वेळी मला आपल्या स्वामींच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. मात्र आपले लक्ष नमाजाकडे कमी आणि माझ्याकडे जास्त होते काय? आपण देवाचा धावा करतो तेंव्हा आपले मन हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीत जायला आहे." नवाब खजिल होवून म्हणाले, "खरे आहे! माझे लक्ष तुम्ही काय करता यात लागले होते. आम्ही देवाकडे काही तरी मागणी करण्यासाठी येतो तर तुम्ही फक्त देवासाठी इथे येता." गुरु नानक म्हणाले,"आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे, नावे वेगळी दिली तरी देव बदलतो काय? तो सर्व पाहत आहे."
तात्पर्य-ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्ताची गरज आहे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)