गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

विचारपण

 🌹🌹🌹🌹 विचारपण 🌹🌹🌹🌹


उतू नको मातू नको

लोकांच्या ताटात बघायचं 

अजिबात सोडू नकोस 

बावरले्ल्या जीवाला कधीच 

घाबरवायचं स़ोडू नकोस 


अडकलेला कुणी असेल तर 

मजा घ्यायची सोडू नकोस 

त्रास देताना कमी 

कधीच तू पडू नकोस 


संकटकाळी मदतीचा

हात पुढे तू करू नकोस 

दुसऱ्याचं कौतुक कधी 

चुकुनही करू नकोस 


चांगलं फक्त आपलंच 

हेका कधी सोडू नकोस 

तुझं ते सगळं माझं 

हे ब्रह्मवाक्य विसरू नकोस 


दुसऱ्याला मोठेपणा 

मुळीच कधी देवू नको

आलेल्या संधीला मात्र 

मुळीच डावलू नकोस 


आपण कोण याचा

विचार कधी करू नकोस 

पाप पुण्याचा हिशोब 

मनामध्ये चुकुनही आणू नको


मागे कोण काय बोलतो 

याची भीती सोडून दे

आपल्या झोळीत सगळं

राहावं म्हणूनच 

सगळं कमवून घे


चांगलं वाईट सगळं 

खरं हेच तू मानून घे

माणुसकी अन् भूतदया 

या शब्दांना अंतर दे


झालं गेलं विसरून जावं

ह्याच्याशी फारकत घे

मनात एक अन् चेहरा एक

मुखवटे तू सजवून घे


माणूस म्हणून जगताना 

माणूसपण विकत घे

प्राण्यांपासून इमानदारी

शिकता आली तर शिकून घे


चार दिवस आयुष्याचे

सुखाने तू जगून घे

आनंदाचे चार क्षण 

वाटता आले तर वाटून घे.

आपल्या पुरते न जगता

दुसऱ्यासाठी जगून घे 


लेखन 

संदीप सुधीर जोशी, पंढरपूर 

दि. ८ जानेवारी २०२५