शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

सिंहाचा जावई

कथा क्र. 123


एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.

तात्पर्य : आपल्या कुवतीबाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरली, तर स्वत:चाच नाश ओढवतो.


==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

(फटकळपणा)

कथा क्र.122

एका गावात एक शेतकरी राहत होता. शेती करण्याशिवाय त्याने काही गायी पाळल्या होत्या. त्यांचे दूध विकून तो गुजराण करत असे. शेतकरी प्रामाणिक होता. त्यामुळे तो दुधात मुळीच भेसळ करत नसे. त्यामुळे त्याचे दूध चांगलेच असणार याची लोकांना खात्री पटली होती. गावातील बहुतांश लोक त्याचेच ग्राहक होते. त्याच्या नियमित ग्राहकांमध्ये एक महिलादेखील होती. तिचा स्वभाव रागीट होता. शेतकर्‍याला तिचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो प्रथम तिच्या घरी दूध पोहोचवत असे. एके दिवशी त्या महिलेने घरी पूजापाठ आयोजित केला होता. बरेच नातेवाईक येणार होते. परंतु नेमके त्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध देण्यास जाऊ शकला नाही. शेतकºयाच्या या वागण्यामुळे ती महिला प्रचंड संतापली. त्याच्या या वागण्याचा तिला खूप रागही आला. पर्यायी व्यवस्था करून तिने कार्यक्रम पार पाडला. दुसºया दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध घेऊन गेला. तेव्हा तिने त्याचा बराच पाणउतारा केला. बराच वेळ तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. शेतकरी गप्प राहिला. काही वेळाने तिच्या रागाचा पारा किंचित कमी झाला, तेव्हा धाडस करून शेतकरी बोलला, ‘माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली. त्याबद्दल मी प्रथम आपली क्षमा मागतो. परंतु काल माझ्या आईचे निधन झाले. मला तिच्यावर अग्निसंस्कार करावे लागले. त्यामुळे मी दूध द्यायला येऊ शकलो नाही.’ हे ऐकताच महिलेला तिची चूक उमगली. शरमेने तिला काहीच बोलता येईना. रागाच्या भरात भलतीच चूक आपण केल्याचा तिला पश्चात्ताप झाला. तिने शेतकºयाची माफी मागितली व यापुढे मागचा-पुढचा विचार न करता कुणाशीही फटकळपणे न वागण्याची तिने शपथ घेतली. 

तात्पर्य असे की, अतिउत्साह, घाई-गडबडीत, समोरच्या व्यक्तीची अडचण जाणून न घेता अनुचित व्यवहार करणे योग्य नाही. गैरसोय झाली तर प्रथम त्याचे कारण शोधावे आणि नंतरच त्यावर प्रतिक्रिया द्यावी.

वर्तमानपत्रातून संग्रहित

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१३

(तृप्तता)

कथा क्र. 121

प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्‍य करत होता. त्‍याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्‍याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्‍याआधीच एक संन्‍याशीबुवा आपल्‍या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्‍या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्‍याशाने राजाला पाहिले व तो म्‍हणाला, '' हे राजन, जर तुम्‍हाला शक्‍य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्‍याच्‍या बोलण्‍याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्‍हाला शक्‍य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्‍या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्‍या आता सोन्याच्‍या मोहोरांनी भरून टाकावे व सन्‍मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्‍यांदा ताट भरून सोन्‍याच्‍या मोहोरा आणल्‍या आणि भिक्षापात्रात टाकल्‍या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्‍याच्‍या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्‍या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्‍याच्‍या मोहोरा संपल्‍या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्‍लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्‍याने संन्‍याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्‍हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्‍या गर्वात तुम्‍हाला व तुमच्‍या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्‍ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्‍य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्‍याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्‍हणजे आपल्‍या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्‍तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्‍याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्‍या हृदयाला भरू शकतो पण मनुष्‍य तो मिळविण्‍याचा कधीच प्रयत्‍न करत नाही.

तात्पर्य- तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे. 

संग्रहित

(भेट)

कथा क्र. 120


एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि-याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि-याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वत:ची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला.


तात्पर्य- आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

(स्वतःचे काम )

(कथा क्र.119)

मक्याच्या शेतात एका पक्षिणीचा खोपा होता. त्यात तिची छोटी छोटी पिलेही होती. मक्याची कापणी होईपर्यंत खोपा सुरक्षित होता. एके दिवशी शेतकरी शेतात आला. तो कुणाशी तरी बोलताना म्हणाला की, ‘उद्या मी माझ्या नातेवाइकांशी पिकाच्या कापणीबाबत बोलणार आहे.’ शेतकर्‍यांचे हे संभाषण पक्षिणीसह तिच्या पिलांनी ऐकले. पिले म्हणाली, ‘आई, लवकरात लवकर आपल्याला खोपा सोडावा लागेल.’ आई म्हणाली, ‘काळजी करू नका. काहीही होणार नाही.’ दुसर्‍या दिवशी कुणीही मदतीला आले नाही, तेव्हा शेतकरी म्हणाला की, आता मी माझ्या शेजार्‍यांना बोलावीन. तिसर्‍या दिवशीही कुणी आले नाही. चौथ्या दिवशीही असेच झाल्यावर तेव्हा शेतकरी म्हणाला, ‘इतरांच्या भरवशावर बसून काम होणार नाही. उद्या मी स्वत:च पिकाची कापणी करतो.’ हे ऐकून पक्षिणीने पिलांना सांगितले, ‘उद्या उजाडण्यापूर्वीच आपल्याला खोपा सोडावा लागेल. कारण शेतकर्‍याला स्वत:चे काम स्वत:च करावे लागते, याची जाणीव झाली आहे.’

तात्पर्य- आपल्या मदतीसाठी कोणीतरी येईल हि अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे 

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============