बुधवार, २६ मार्च, २०१४

खरी आई कि खोटी आई

        कथा क्र.189        

एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.''

तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. 

रविवार, २३ मार्च, २०१४

शोध

कथा क्र. 188

फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्‍यासाठी राजवाड्याच्‍या छतावर गेली होती. तिने आपला मौल्‍यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्‍यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्‍हणजे काहीतरी खाण्‍याची गोष्‍ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्‍याने कंठा खाण्‍यासाठी प्रयत्‍न केले. मौल्‍यवान अशा कंठ्यामध्‍ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्‍याने ते खाण्‍याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्‍याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्‍यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्‍या लक्षात एक गोष्‍ट आली की आपला मौल्‍यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्‍हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्‍ही त्‍याचा शोध घेण्‍याचे आदेश द्या.'' राजा म्‍हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्‍हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्‍याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्‍या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्‍या हाराचा शोध घ्‍या. जो कोणी तो हार आणून देईल त्‍याला आपण अर्धे राज्‍य बक्षीस म्‍हणून देऊ अशी घोषणाही त्‍याने त्‍यावेळी केली. अर्धे राज्‍य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्‍याच्‍या नाल्‍यामध्‍ये त्‍याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्‍या पाण्‍यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्‍य बक्षीसाच्‍या आशेने एका सैनिकाने त्‍या पाण्‍यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्‍याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्‍या मनातही लोभ निर्माण झाला. त्‍यानेही अर्धे राज्‍य मिळविण्‍यासाठी त्‍या नाल्‍यात उडी मारली. पण हार पुन्‍हा गायब झाला. त्‍या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्‍या आशेने त्‍या घाण पाण्‍यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्‍याच हातात येत नव्‍हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्‍य प्रधानजी यांनाही अर्ध्‍या राज्‍याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्‍हा कोणी उडी मारे तेव्‍हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्‍य त्‍या पाण्‍याच्‍या वास सहन न झाल्‍याने पटकन पाण्‍यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्‍हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्‍य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारून हार शोधण्‍यासाठी प्रयत्‍न केले हे राजाच्‍या कानावर गेले व त्‍याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्‍य गमवावे लागेल. त्‍यासाठी राजाही तेथे आला व त्‍याने आपली राजवस्‍त्रे उतरवली आणि त्‍यानेही त्‍या नाल्‍यात उडी मारली. त्‍याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्‍यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्‍या घाणेरड्या पाण्‍यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्‍यात पडला आहे म्‍हणून सर्वजण पाण्‍यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्‍याना विचारले काय झाले? संत त्‍यावर म्‍हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्‍ही ज्‍या हाराकडे पाहून पाण्‍यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्‍यात दिसते आहे ते त्‍याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्‍ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्‍यात शोधत आहात.'' लोकांच्‍या लक्षात खरा प्रकार आल्‍यावर लोक शरमिंदा झाले.


कथासार :- मानवी जीवनाची पण आज त्‍या लोकांप्रमाणेच अवस्‍था झाली आहे. जे आपल्‍याला पाहिजे आहे त्‍याच्‍या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्‍वास्‍थ्‍य हे शोधण्‍यापेक्षा आपण त्‍याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्‍यापेक्षा आपण कितीतरी गोष्‍टी गमावित आहोत. खरंय ना  

बुधवार, १९ मार्च, २०१४

सदाचरण व नैतिकता

कथा क्र. 187

फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्‍या विद्वत्तेचा व योग्‍यतेचा यथायोग्‍य आदर होता म्‍हणूनच तो त्‍यांची प्रत्‍येक गोष्‍ट ऐकत असे. प्रजेमध्‍येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्‍मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्‍याला इतक्‍या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्‍यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्‍यासाठी एक गुप्‍त योजना बनविली. दुस-या दिवशी त्‍यानी दरबारातून परतताना राजाच्‍या खजिन्‍यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्‍याने न पाहिल्‍यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्‍हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्‍वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्‍यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्‍या व खिशात भरल्‍या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्‍यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्‍ट राजाच्‍या कानावर गेली. न्‍यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्‍या या चुकीबद्दल त्‍यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्‍यात यावी. तीनवेळेला त्‍यांनी कोषातून धन चोरले म्‍हणून तीन महिने सजा देण्‍यात आली आहे जेणेकरून ते पुन्‍हा असा अपराध करण्‍यात यशस्‍वी होणार नाही. या न्‍यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्‍यास इच्‍छुक होतो की लोक कशामुळे मला सन्‍मान देतात, वैयक्तिक माझा सन्‍मान करतात की मी करत असलेल्‍या सदाचरणाचा लोक सन्‍मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्‍व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्‍त झालो आणि त्‍यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्‍मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्‍ही कोणत्‍याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्‍हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्‍ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्‍हणणे ऐकले व स्‍वत:ला सैनिकांच्‍या स्‍वाधीन केले.


तात्‍पर्य :-सदाचरण हेच मनुष्‍याचे धन आहे. नैतिकता पाळणे आणि ती आचरणात आणणे यातच मनुष्‍यजन्‍माचे सार्थक आहे. 

महत्‍व आईचे

कथा क्र. 186

एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही? मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. ''


तात्‍पर्य :- आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही.

मंगळवार, ११ मार्च, २०१४

मोह

कथा क्र. 185

एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारीबाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता. पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू. पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,"भाऊ !! तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत." कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?" पुजारीबाबा हो म्हणाले. त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्‍याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्‍हा तुम्‍ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्‍यावा म्‍हणून मी ते दहा रूपये तुम्‍हाला मुद्दाम जास्‍त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्‍ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्‍टरने गाडी पुढे जाण्‍यासाठी बेल वाजवली. पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्‍हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्‍ही मला त्‍यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्‍या दहा रूपयांच्‍या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''


तात्‍पर्य :- मोह हा वाईट असतो, ज्‍याक्षणी मोहाने मन ग्रासते त्‍याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागते. 

शुक्रवार, ७ मार्च, २०१४

एम.विश्‍वेश्‍वरैय्या

कथा क्र,184

खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्‍य होते. माणसांनी खच्‍चून भरलेली एक रेल्‍वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्‍यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्‍यम उंचीचा हा मनुष्‍य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्‍याच्‍या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्‍यातील बहुतांश इंग्रज त्‍याची चेष्‍टामस्‍करी करत होते. त्‍याला खेडूत, अडाणी समजून त्‍याच्‍या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्‍यांच्‍या त्‍या चेष्‍टामस्‍करीकडे, टिंगल करण्‍याकडे त्‍या भारतीयाचे लक्ष नव्‍हते. तो त्‍याच्‍या नादात मग्‍न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्‍याने रेल्‍वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्‍काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्‍याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्‍याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्‍वे थांबविली’’ त्‍या सावऴया रंगाच्‍या व्‍यक्तिने उत्तर दिले,’’ मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्‍वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्‍यक्ति उत्‍तरली,’’ माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्‍वे पट्ट्या खराब झाल्‍या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्‍यक्ति म्‍हणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्‍वेच्‍या गतीमध्‍ये काही फरक पडला आहे आणि त्‍यामुळे रेल्‍वेचा जो विशिष्‍ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्‍वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’  गार्डने याची खातरजमा करून बघण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्‍या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्‍टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्‍वेत त्‍या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. केवळ त्‍या माणसाच्‍या ज्ञानामुळे आज त्‍यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्‍या माणसाची प्रशंसा व स्‍तुती करू लागले. गार्डने त्‍यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्‍या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्‍वरैय्या असून मी व्‍यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्‍यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्‍तब्‍ध झाले. कारण त्‍याकाळात विश्र्वेश्‍वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्‍हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्‍यांची क्षमा मागितली.

रविवार, २ मार्च, २०१४

उपाय

 कथा क्र, 183 

आचार्य विनोबा भावे यांना भेटायला एक महिला आली. ती म्‍हणाली,'' मी दु:खी आहे. माझा पती दारुडा आहे. रोज दारू पिऊन मला अपशब्‍द बोलत असतो आणि कधी-कधी मारहाणही करतो. माझे जीवन त्‍याने नरकासमान बनवले आहे.'' विनोबांनी तिला विचारले,''तो जेव्‍हा दारू पितो तेव्‍हा तू काय करत असतेस?'' ती म्‍हणाली,'तेव्‍हा मला त्‍याचा खूप राग येतो. पहिल्‍यांदा मी त्‍याला फार वाईट बोलायची, परंतु त्‍याच्‍यावर कसलाही परिणाम होत नाही हे पाहून मी आता उपवास करणे सुरु केल आहे.'' विनोबांनी प्रश्‍न केला,''उपवासात खाणे-पिणे सर्व सोडून देतेस का?'' महिला म्‍हणाली,''नाही, फळे खात असते.'' तेव्‍हा विनोबांनी म्‍हटले,'' मग तर तुझा पती आणखीनच नाराज होत असेल, कारण की तुझ्या फळे खाण्‍यामुळे घरखर्चात वाढ होत असेल.'' हे ऐकताच महिला रडू लागली तेव्‍हा विनोबा म्‍हणाले,'' रागाने किंवा जेवण सोडून दिल्‍याने कुणालाही चुकीच्‍या मार्गावरून हटवले जाऊ श्‍कत नाही. प्रेम तेच असते, जे आपल्‍यात निर्माण होते. मनात दुर्भावना असेल आणि प्रेमाचा देखावा केला तर त्‍याचा प्रभाव उलट होतो.'' महिला म्‍हणाली,''मी काय करु? त्‍याला दारुच्‍या नशेत पाहून माझा माझ्यावर ताबा राहत नाही.'' विनोबांनी समजावले,'' हेच तर चुकीचे आहे, तू आपल्‍या पतीला वाईट मार्गापासून तेव्‍हाच रोखू शकशील, जेव्‍हा तू वाईट गोष्‍टींना समजून घेशील. त्‍याचा पहिल्‍यांदा प्रयत्‍न कर.'' महिलेच्‍या लक्षात आपली चूक आली की, क्रोधाने क्रोधाला जिंकले जाऊ शकत नाही. त्‍यावर प्रेमानेच विजय मिळविता येऊ शकतो हाच मार्ग मिळाल्‍याचा आनंद तिच्‍या चेह-यावर दिसू लागला.तात्‍पर्य :- वाईट व्यक्तीची घृणा करत बसण्‍यापेक्षा वाईट वृत्ती कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत आणि हे कार्य दृढ इच्‍छा‍शक्तीनेच शक्‍य आहे.