गुरुवार, ३० मे, २०१३

(रामप्रसाद बिस्मिल)

(कथा क्र ८५) 

थोर क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांना काकोरी प्रकरणात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या दोन दिवस आधी बिस्मिल यांची आई त्यांना भेटायला कारागृहात आली. जेंव्हा बिस्मिल यांना आईसमोर आणण्यात आले तेंव्हा अचानक या क्रांतिकारकाच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांच्या मनात आईबाबत अनेक सुखद आठवणी जाग्या झाल्या. आईचे प्रेम आणि वात्सल्य आठवत बिस्मिल यांचे मन भरून आले. बिस्मिल यांना रडताना पाहून त्यांची आई मनातल्या मनात काय समजायचे ते समजून गेली. पण या परिस्थितीत आपला मुलगा कमजोर बनवू इच्छित नव्हती. त्यामुळे स्वतः:च्या भावनांवर नियंत्रण ठेवत ती म्हणाली," मला तर वाटत होते कि तू स्वतःच्या भावनांवर विजय मिळवला आहेस. पण इथे तर वेगळेच चित्र दिसत आहे.जीवनभर देशासाठी लढून तू आता माझ्यासाठी अश्रू ढाळत आहेस का? हा कमकुवतपणा ठीक नाही. तू वीराप्रमाणे फासावर चढलास तर मी स्वतःला धन्य समजेन. मला अभिमान आहे कि माझा मुलगा देशाच्या हितासाठी बलिदान देत आहे. माझे काम तुला मोठे करणे होते.त्यानंतर तू देशाचा होतास आणि देशहितासाठी तू कामाला आलास याचा मला आनंद वाटतो. मला याचे जराही दु:ख होत नाही. मग तू का रडतो?" आईचे म्हणणे ऐकून रामप्रसाद यांनी अश्रूवर नियंत्रण मिळवले आणि ते आईला म्हणाले,"आई! मला माझ्या मृत्यूवर जराही दु:ख नाही. विश्वास ठेव मी माझ्या मरणावर संतुष्ट आहे." फाशीवर चढताना रामप्रसाद बिस्मिल यांचे शब्द होते.


"मालिक, तेरी रजा रहे और तू हि तू रहे ,
 बाकी मै रहु न रहु मेरी आरजू रहे, 
जब तक कि तन में जान, 
रगो लहू रहे तेराही जिक्र या तेरी जुस्तजु "

तात्पर्य-बलिदान महान आदर्श आहे. तो आचरणात आणणारा इतिहासात अमर होवून जातो.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

(प्रेरणा)

(कथा क्र ८४) 


संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले.त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले.

तात्पर्य - प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

सोमवार, २७ मे, २०१३

(साधू आणि गवळण)

(कथा क्र ८३) 

एका गावात एक साधू राहत होता लोक त्याचा फार आदर करत असत. त्या गावात दुसऱ्या गावातून दुध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे. सर्वात प्रथम ती साधूला दुध आणून देत असे. त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दुध वाढत असे. एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला. साधूने तिला कारण विचारले तेंव्हा तिने उत्तर दिले,"आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली, त्यामुळे येण्यास उशीर झाला." साधू हसत म्हणाला"लोक तर ईश्वराच्या नावावर संसारसागर पार करतात आणि तुला नदी पार करायला नाव लागते. असे वाटते कि तुला ईश्वरावर विश्वास नाही." त्या भोळ्या गवळणीवर या बोलण्याचा खूपच परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती गवळण साधूच्या आश्रमाच्या दारात साधूला हाक मारू लागली. साधू त्यावेळी अजून झोपलेले होते. तिच्या हाकेने साधू जागा झाला. दार उघडताच तिला पाहून साधू हैराण झाला. त्याने विचारले,"रोजच्या वेळेपेक्षा आज तुम्ही लवकर कशा काय आलात?" गवळण म्हणाली,"महाराज! तुमच्या उपदेशाने माझे काम झाले, नावेची समस्या कायमची संपली. रोजचे भाडे वाचले, आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले आणि नदी पार करून आले" साधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. जेंव्हा ती नदीच्या रस्त्याने जाऊ लागली, तेंव्हा साधूही तिच्यापाठोपाठ नदीत गेला. जेंव्हा पाण्याची पातळी वाढली तेंव्हा साधू घाबरून पाण्यात पडला आणि वाचविण्यासाठी आवाज देवू लागला, तेंव्हा गवळणीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि विचारले," तुम्ही आपलाच उपदेश अंमलात आणून जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता." गवळणीचा ईश्वरावरील गाढ विश्वास पाहून शरमिंदा झाला.

तात्पर्य- संदेश लक्ष्यापासून भरकटत असतो आणि विश्वास फळ देत असतो. दृढ निश्चयाने सर्व काही साध्य होते.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

रविवार, २६ मे, २०१३

(दानवीर कर्ण)

      (कथा क्र.८२)      

कुंतीचा जेष्ठ पुत्र अंगराज कर्ण प्रत्येक दिवशी सुवर्ण दान करत असे. त्यामुळे त्याची ख्याती दानवीर अशी झाली होती. महाभारताच्या युद्धात त्याला वीरगती प्राप्त होऊन जेंव्हा तो स्वर्गात गेला तेंव्हा त्याला तिथे आदराची वागणूक मिळाली, सत्कारपूर्वक वागविण्यात आले. देवराज इंद्राने त्याचे स्वागत केले. सुवर्णजडीत महालात त्याची राहण्याची व्यवस्था केली. त्या महालात सर्व वस्तू सोन्यापासून बनविलेल्या होत्या. हे पाहून राजा कर्णाला आपण जीवनभर केलेल्या सुवर्ण दानाचा गर्व झाला. काही वेळ सोन्याच्या पलंगावर विश्रांती घेतल्यावर कर्णाला तहान लागली. त्याने सेवकाला पाणी आणण्यास सांगितले. सेवकाने सोन्याच्या पेल्यात पातळ झालेले सोन्याचे पाणी आणून दिले. कर्णाला मनातल्या मनात खूप राग आला. परंतु तो काहीच न म्हणता तहानलेलाच झोपला. संध्याकाळी भोजनाच्या वेळी सेवक सोन्याच्या ताटात सोन्याची पोळी, सोन्याची भाजी घेवून आला तेंव्हा मात्र ते पाहून कर्ण संतापला. तो तातडीने देवराज इंद्राकडे गेला. त्याने त्रस्त होवून इंद्राकडे तक्रार केली कि इथे पाणी मागितले तर सोन्याचे आणि अन्न हि सोन्याचे असे का?. देवराज इंद्राने उत्तर दिले,"अंगराज! स्वर्गलोकामध्ये प्राणी त्या वस्तूंचा उपयोग करू शकतात ज्याने आपल्या जीवनकाळात कुणाला सुख संतोष दिला असेल. कारण कि आपण आपण अन्न व पाण्याचे दान न करता सदैव सोन्याचे दान केले त्यामुळे तेच आपल्याला इथे मिळेल" कर्णाला आपली चूक समजून आली. 'अन्न व पाण्याला मी विशेष महत्व दानामध्ये दिले त्यामुळे त्याचे दान करण्याचा मी विचारच नाही. आता तुम्ही मला जीवनभराच्या पुण्याच्या मोबदल्यात केवळ १६ दिवसांसाठी मला पृथ्वीलोकात पाठविण्यात यावे." अशी विनंती त्याने इंद्राकडे केली. इंद्रानेही त्याची ती विनंती मान्य केली. १६ दिवस कर्णाने पृथ्वीवर राहून अन्न,पाणी व वस्त्राचे दान केले आणि पुन्हा स्वर्गात आला. आता स्वर्गात त्याला कोणतेही कष्ट नव्हते.

तात्पर्य-अन्न,पाणी,वस्त्र या मुलभूत गरजा आहेत. ज्यांना त्याची गरज आहे अशा लोकांना ते दान केल्याने आपल्याला समाधान मिळते. सुखापेक्षा संतोष मोठा असतो आणि धनापेक्षा मोठी शक्ती असते.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

बुधवार, २२ मे, २०१३

(क्रांतिकारी उधमसिंह)

(कथा क्र ८१) 

सन १९१९ मध्ये जालियनवाला बागेत एक आमसभा सुरु होती. इंग्रज सरकारचा अधिकारी जनरल डायरने निर्दोष लोकांवर गोळीबार केला. शेकडो लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली, क्रांतिकारकामध्येही या घटनेने वातावरण ढवळून निघाले आणि संतापाचा उद्रेक होण्याची वेळ झाली. उधमसिंह नावाच्या क्रांतीकारकाने जनरल डायरचा बदला घेण्याचा विडा उचलला. उधमसिंहानी दिवस आणि वेळ ठरवून जनरल डायरवर गोळी झाडली. परंतु ते पकडले गेले. त्यांच्यावर खटला भरला गेला. न्यायाधीशांसमोर त्यांना उभे केले असता न्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गर्दीतून वाट काढत एक इंग्रज तरुणी पुढे आली व तिने न्यायाधीशांकडे उधमसिंह यांना प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. त्यांनी तिला परवानगी दिली. त्या मुलीने उधमसिंह यांना एकच प्रश्न विचारला," तुम्ही ज्यावेळेला गोळ्या झाडल्या त्यावेळी अजूनही तुमच्या पिस्तुलात तीन गोळ्या शिल्लक होत्या. मी पण इंग्रज आहे, मलाही इंग्रज या नात्याने तुम्ही का मारले नाही. तसे करून तुम्ही पळून जावू शकला असता पण तुम्ही गेला नाहीत. असे का केले याचे उत्तर द्या!" उधमसिंह यांनी त्या तरुणीला ओळखले, तिच्याकडे पाहून मंदस्मित केले व म्हणाले,"भगिनी! आम्ही भारतीय आहोत. महिलेवर हात उचलणे आमच्या संस्कृतीविरुद्ध आहे. त्यामुळे मी आपल्यावर गोळी झाडली नाही. तसे करणे आम्हा भारतीयांना शोभले नसते." हे उधमसिहांचे विचार ऐकून न्यायालय व ती तरुणी चकित झाले.

तात्पर्य-नीतिवान मनुष्य प्रतिकूल परिस्थितीतही संस्कृतीप्रमाणे आचरण करतो. नैतिकता हि संस्कारातून येते. संस्कारहीन माणसे हीन दर्जाचे वर्तन करतात.


वर्तमानपत्रातून संग्रहित 

(महत्व)

(कथा क्र.८०)

एका आश्रमात एक महात्मा राहत होते. सोबत त्यांचे काही शिष्यपण होते. काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा सुरु होती. महात्मा त्या सर्वांचे विचार ऐकत होते आणि आणि आपले विचारही व्यक्त करत होते. या दरम्यान महात्म्याच्या नजरेस काही तरी पडले व ते त्या दिशेने जावू लागले. त्यांनी ती पडलेली वस्तू उचलून घेण्यास एका शिष्याला सांगितले. दुपारी जेंव्हा महात्मा आपल्या कुटीत परत आले तेंव्हा त्यांनी त्या शिष्याला बोलावले व सकाळी उचलून घेतलेल्या कापसाबद्दल त्याला विचारले असता तो शिष्य म्हणाला,"तुम्ही सांगितलेला कापूस मी उचलला खरा पण काही काळाने मी कचरा समजून तो फेकून दिला. आता तो कचराकुंडीत असेल. " महात्मा म्हणाले,"अरे ! मी या कापसाऐवजी तुला धन किंवा सोने दिले असते तर असेच कचराकुंडीत टाकले असते का? तो कापूस बाहेर उघड्यावर पडला याचा अर्थ कापूस जिथे ठेवला आहे तेथुन कापूस बाहेर वाऱ्याने किंवा अन्य कोणत्या कारणाने बाहेर कसा पडला? शेतकऱ्याने इतक्या कष्टाने तयार केलेल्या कोणत्याही गोष्टी अशा जर थोड्या थोड्याने जर वाया जावू लागल्या तर आपल्या बरोबर समाजाचेहि नुकसान यातून होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फेकून द्यायला लागलो तर त्यातून आपलाच तोटा आहे. कापसाचा तुकडा असेना का पण ज्याने तो कातून ठेवायच्या ऐवजी बाहेर टाकला त्याने कापसाचा तुकडा नाही तर भविष्यात निर्माण होणारे धन फेकून दिले आहे. लक्षात ठेव ! कष्टाने धन मिळते, पण मिळालेल्या धनाचा योग्य वापर करणे, गुंतवणे हेही तितकेच महत्वाचे आहे." 

तात्पर्य- धन हे जरी उपभोगासाठी असले तरी ते चुकीच्या मार्गाने व्यर्थ रीतीने खर्चले जावू नये. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा महत्वपूर्ण असतात.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

सोमवार, २० मे, २०१३

(देवाचा न्याय)

 (कथा क्र.७९) 

पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, 'देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन" त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस,काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा" पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले, पहिल्यांदा श्रीमंत भक्त आला व म्हणाला, "देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराट होऊ दे" (त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले ) गरीब भक्त आला व दर्शन घेवून म्हणाला, "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा! माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे" ( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो ) पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे " (असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो ) तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा" (हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वत: पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.) रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?" गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले," असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो .......... पांडुरंग पुढे म्हणतो ......... अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा पांडुरंग झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो"

तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.

शुक्रवार, १७ मे, २०१३

(व्यवस्थापन)

(कथा क्र ७८)

एकदा धर्मपुर नगराचा राजा सोमसेन शिकारीवरून परतत असताना काही कारणाने आपल्या सर्व साथीदारापासून रस्ता चुकला आणि वेगळ्याच रस्त्याला लागला. जंगलातून रस्ता काढत काढत तो नगराच्या दिशेने वाटचाल करू लागला. रस्त्याने चालत असताना त्याला एक माणूस खांद्यावर कु-हाड घेवून व तोंडाने बासरी वाजवत चाललेला दिसून आला. तो माणूस हि नगराच्या दिशेने चाललेला होता तेंव्हा राजाने त्याच्यासोबत जाण्याचे ठरविले. दोघांनी एकमेकांशी संभाषण सुरु केले. राजाने त्या माणसाला विचारले,"तू कोण आहे?, तुझा व्यवसाय काय? आणि तू जे काही मिळवतो त्यात तू खुश आहे आहे काय?" त्या माणसाने उत्तर दिले,"महाराज! मी एक लाकुडतोड्या असून लाकडे तोडण्याचे काम करतो. रोज मला चार रुपये मिळतात. त्यापैकी पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो, दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो, तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो." या म्हणण्याचा अर्थ राजाला काही समजण्याच्या आतच राजाचे सैनिक शोधत तेथे आले व राजा त्यांच्यासोबत निघून गेला. राजाला त्या लाकुडतोड्याचे म्हणणे शांत बसू देईना, त्याने भर दरबारात हा प्रश्न उपस्थित केला,"तो लाकुडतोड्या जे चार रुपये खर्च करतो, ते कसे ते मला सांगा?" कोणालाच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मग राजाने निर्णय घेतला कि त्या लाकुडतोड्याला दरबारात बोलवायचे. राजाने तसा आदेश दिला व दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्याला घेवून सैनिक हजर झाले. लाकुडतोड्या आलेला दिसताच राजा सोमसेन त्याला म्हणाला,"तुझ्या धनाचे तू जे व्यवस्थापन करतो ते कसे ते मला सांग? मला काल काहीच कळले नाही." लाकुडतोड्या हसून म्हणाला, "महाराज! पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो म्हणजे मी माझ्या परिवाराचे पोषण करतो., दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांच्यासाठी खर्च करतो., तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो म्हणजे म्हणजे मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जेणे करून ते शिकून माझ्या म्हातारपणी मला सांभाळतील.तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो म्हणजे धर्म, दक्षिणा, दान यात खर्च करतो म्हणजे जेंव्हा मी मरेन त्याचे पुण्य मला मिळेल." राजाने हे उत्तर ऐकताच आनंदित होवून लाकुडतोड्याचा मोठा सन्मान केला आणि मोठे इनाम देवून त्याला त्याच्या घरी पाठविले.

मंगळवार, १४ मे, २०१३

(जीवनाचा उपयोग)

(कथा क्र ७८)

कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.

तात्पर्य-जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये. 

रविवार, १२ मे, २०१३

(क्रोधावर नियंत्रण)

  (कथा क्र ७६)   

एक १०-१२ वर्षाचा मुलगा होता. लहानपणापासूनच खूप हट्टी आणि संतापी होता. जेंव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडे तेंव्हा त्याच्या रागाचा पारा प्रचंड चढे. रागाने तो वेडापिसा होत असे. त्याच्या वडिलांनी यावर एक उपाय शोधला, वडील बाजारात गेले आणि त्याच्यासाठी खिळे घेवून आले. मुलाने विचारले,"बाबा! हे खिळे कशासाठी?" वडिलांनी उत्तर दिले,"अरे ! तुला जेंव्हा कधी राग येईल तेंव्हा यातील एक खिळा घे आणि समोरच्या झाडावर ठोक". खिळे आणलेल्या पहिल्या दिवशी मुलाला खूप राग आला, त्याने एकूण ३० खिळे झाडाला ठोकले. असेच तो प्रत्येक वेळी करत गेला. पुढील काही आठवड्यात त्याला ते खिळे ठोकण्याचा कंटाळा आला व त्यामुळे त्याला क्रोधावर नियंत्रण करण्यात यश आले. आता तो झाडावर एखाददुसरा खिळाच ठोकत असे. त्याच्या हे लक्षात आले कि झाडाला खिळे ठोकण्याऐवजी क्रोधावर नियंत्रण करणे कधीही सोपे आहे. शेवट एक दिवस तर असा उजाडला कि त्याने त्या पूर्ण दिवसात झाडाला एकही खिळा ठोकला नाही. जेंव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले तेंव्हा त्याच्या वडिल म्हणाले," तू जसे ते खिळे ठोकले तसे ते सर्व खिळे झाडावरून काढून टाक" मुलाने खिळे काढायला सुरुवात केली तसे त्याच्या लक्षात आले कि खिळे मारणे सोपे आहे पण खिळे काढणे खूप अवघड काम आहे. त्याने खूप मेहनत घेवून ते खिळे काढले व ते दाखवण्यासाठी वडिलांना झाडापाशी घेवून आला. वडिलांनी झाडाकडे पाहत त्याला म्हणाले," तू काम तर चांगले केले. पण तुझ्या एक लक्षात आले कि नाही, बघ हे सुंदर झाड तुझ्या रागाने तू किती खराब करून टाकले आहेस. तू जेंव्हा जेंव्हा रागाला येत होता त्याचे वाईट परिणाम या बिचाऱ्या झाडाला भोगावे लागत होते. तसेच आपल्या वागण्याचेही तसेच असते असेच कि आपण जेंव्हा रागात येतो तेंव्हा आपल्या रागाचे दुष्परिणाम समोरच्याच्या मनावर होतात. शस्त्राने जेवढे घाव होणार नाहीत तेवढे जास्त वार रागाच्या भरात माणूस समोरच्यावर करतो. म्हणून रागापासून दूर राहणे हेच चांगले असते.

तात्पर्य-"अति राग आणि भिक माग" हि मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. राग आवरणे हेच चांगले.


फेसबुकवरून संग्रहित 

शनिवार, ११ मे, २०१३

(खरा मित्र )

  (कथा क्र.७५)  

आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,"गुरुजी ! धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? " गुरुजींनी एक कथा ऐकवली. ती पुढीलप्रमाणे - एका व्यक्तीला तीन मित्र होते, तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र २-३ दिवसातून भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसरा मित्राला मात्र तो २ महिन्यात एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली. त्यामुळे त्याला राजदरबारात बोलावण्यात आले. तो घाबरला. त्याने पहिल्या मित्राला सांगितले व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र त्याने सर्व गोष्ट ऐकून सोबत राहण्यास नकार दिला. कारण तो राजाशी आपले संबंध बिघडवू इच्छित नव्हता. दुसऱ्या मित्रानेही त्याला सोबत येण्याची तयारी दर्शविली पण अचानक कामाचे कारण सांगून येण्याची टाळाटाळ केली. त्या व्यक्तीने तिसऱ्या मित्राला विचारताक्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि राजासमोर त्या व्यक्तीची बाजू मोठ्या धीराने व खंबीरपणे मांडली. राजालापण ते कथन योग्य वाटल्याने त्याने त्या व्यक्तीला दोषमुक्त केले. हि कथा ऐकवून गुरुजींनी समजावले पहिला मित्र म्हणजे पैसा. ते परमप्रिय असते पण मृत्युनंतर काहीच कामी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब. आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाहीत. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतोच पण मृत्युनंतर ही तो एकमेव आपल्या सोबत असतो.

तात्पर्य- माणसाने आपल्या वर्तनातून आपल्या मनुष्य धर्माचे पालन केले पाहिजे, जे माणुसकीच्या दृष्टीने योग्य आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

गुरुवार, ९ मे, २०१३

(मासा आणि हंस)

(कथा क्र ७४) 
एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला. त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते. 

तात्पर्य- मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

बुधवार, ८ मे, २०१३

(लालसा)

(कथा क्र.७३) 

एका गावात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इकडे तिकडे फिरत असता गावकऱ्यांनी त्याला पकडला आणि झाडाला बांधून घातले. मग गावकरी विचार करू लागले याला काय शिक्षा द्यावी का गावातील मुख्य माणसाला विचारावे? या विचारातून असे ठरले कि मुख्य माणसाला बोलावून आणायचे आणि चोराला शिक्षा करायची. सगळे गावकरी त्या चोराला एकटे त्या झाडाला बांधून मुख्य माणसाला बोलावण्यास गेले. काही वेळ गेल्यावर त्या रस्त्याने एक मेंढपाळ जात होता, त्याने त्या चोराला झाडाला बांधलेले पाहिले, त्याला उत्सुकता वाटली त्याने त्या चोराला विचारले,"तू कोण आहेस? तुला असे कोणी बांधून ठेवले आहे? तू काय गुन्हा केला आहेस?" चोराने विचार केला हि सुटायची चांगली संधी चालून आली आहे. चोर म्हणाला, "अरे काय सांगू मित्रा ! मी आहे एक फकीर ! इथे काही चोर आले होते. लोकांची लुट करून ते धन मिळवतात आणि त्याचे पाप लागायला नको म्हणून त्यातील काही धन दान करतात.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कुणी फकीर दानासाठी गाठ पडला नव्हता. ते धन घ्या म्हणत होते पण कुणी त्यांचे धन घेतच नव्हते. अशातच त्यांनी त्यांनी मला दान घ्यावे म्हंटले पण मी नकार देताच त्यांनी मला मारहाण केली व या झाडाला बांधून ठेवले आहे व ते परत येथे येवून मला धनदान करूनच मग पुढे जाणार आहेत." हे ऐकताच मेंढपाळाच्या मनात धनाच्या बाबतीत लोभ निर्माण झाला. तो चोराला म्हणाला,"भाऊ! तू फकीर ! तुला धनाचा काय फायदा! तू ते घेणारही नाहीस, त्यापेक्षा आता अंधाराची वेळ झाली आहे तू त्याचा फायदा घे आणि पळून जा. तुझ्या जागेवर मला बांधून ठेव. अंधार असल्याने ते तू समजून मला धन देतील आणि माझी गरिबीपण हटेल." चोराने तसेच केले. आपल्या जागी मेंढपाळाला बांधून तो पळून गेला. तिकडे गावकरी मुख्य माणसाकडून चोराला समुद्रात फेकून देण्याचा आदेश घेवून आले. त्यांनी चोराची शहानिशा न करता व अंधार असल्याने चोराचा चेहरासुद्धा न पाहता त्याला समुद्रात फेकून दिले. अशा त-हेने धनलोभाने एका गरीबाचा जीव गेला.

तात्पर्य-कोणत्याही गोष्टीचा लोभ चांगला नाही, लोभामुळे आत्मघात होण्याची शक्यता असते. त्यापासून दूर राहणे हेच बरे.! बरोबर आहे ना !

वर्तमानपत्रातून संग्रहित 

मंगळवार, ७ मे, २०१३

(सर्वधर्मसमभाव)


 (कथा क्र.७३) 

एकदा अकबर आणि बिरबल वेषांतर करून राज्यात फेरफटका मारण्यास निघाले, रात्रभर संपूर्ण नगरात भ्रमण करता करता कधी सकाळ झाली ते कळलेच नाही. रात्रभर फिरून दोघेही खूप थकले होते. कोठेतरी विश्रांती घेण्यासाठी ठिकाण बघत होते. तेवढ्यात एका साधूचा आश्रम त्यांच्या नजरेस पडला. थोडावेळ विश्रांती घेण्यासाठी ते आश्रमातील अंगणात असणाऱ्या एका मोठ्या झाडाखाली बसले. काही काळ विश्रांती घेतल्यावर अचानक बिरबलाचे लक्ष साधूच्या घरासमोरील तुळशी वृन्दावनाकडे गेले. ते पाहताच बिरबल झटकन उठला व तुळशी वृन्दावनाकडे गेला.तिथे जावून त्याने तुळशीला नमस्कार केला व प्रदक्षिणा घातल्या. हे अकबर बादशाहाने पाहिले आणि त्याला बिरबलाची चेष्टा करण्याची इच्छा झाली. अकबराने विचारले,"बिरबल! या छोट्याशा रोपट्याला तू नमस्कार काय करतो? त्याला प्रदक्षिणा काय घालतो? काहीतरीच तुझे असते बघ" बिरबल म्हणाला,"महाराज धर्मात तुळशीच्या रोपट्याला मातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आम्ही तिला नमस्कार करतो, प्रदक्षिणा करतो. आमच्या श्रीविष्णू देवाला हि प्रिय आहे. म्हणून ती आम्हाला पूज्य आहे. तुम्हीसुद्धा जर सर्वधर्मसमभाव मानत असाल तर तुम्ही पण तुळशीला वंदन करावे अशी माझी इच्छा आहे." पण बादशहाच्या डोक्यात बिरबलाची अजून कशी चेष्टा करता येईल याचा विचार चालू असल्याने त्याने बिरबलाच्या बोलण्याकडे कमी लक्ष दिले व अकबराने उठून चालायला सुरुवात केली. आपल्या छोट्याशा मागण्यासुद्धा बादशहा पूर्ण करत नाही याचे बिरबलाला वाईट वाटले.त्यामुळे बिरबल काहीच न बोलता बादशहाच्या मागे चालू लागला. बिरबल इतका शांतपणे चालताना पाहून बादशहाच्या मनात विचार आले कि याच्या धर्मावर, त्यातील परंपरावर अशी चेष्टा आपण करायला नको होती. म्हणून त्याने इतर विषय काढले पण बिरबल हुंकार भरत चालत होता.बिरबलाने विचार केला कि आता संधी मिळताच बादशाहाला धर्माच्या बाबतीत धडा शिकवायचा. पुढे जाताच अशी एक संधी त्याला लगेच चालून आली. बिरबलाला एक जंगली वनस्पतिचे एक मोठे झुडूप दिसले. बादशाहाला थांबायला सांगून त्याने तुळशीप्रमाणेच सगळे उपचार केले पण अजून एक नवीन गोष्ट केली.ती म्हणजे, त्या झुडपाला मिठी मारण्याचा व त्याची पाने अंगाला चोळण्याचा खोटा अभिनय त्याने केला. हे बादशाहाला कळले नाही. झुडपाला नमस्कार करणे, प्रदक्षिणा करणे, मिठी मारणे आणि त्याची पाने अंगाला चोळणे ह्या क्रिया बादशाहाला हसू आणत होत्या पण त्याने केले नाही. अकबर गप्प राहिलेला पाहून बिरबल म्हणाला,"तुळस हि जशी आमची माता तसे हे जंगली झुडूप म्हणजे आमच्या धर्मानुसार आमचे पिता समान आहेत." अकबर म्हणाला,"वा रे बिरबल! तुळशीला माता म्हणता आणि फक्त नमस्कार,जंगली झुडपाला मात्र आलिंगन देता." बिरबल म्हणाला,"महाराज आई हि देविस्वरूप मानली आहे. तर पित्याला देवत्व दिले आहे. देवाला भेटण्याचा आनंद तुम्हाला काय कळणार म्हणा? तुम्ही लांबूनच नुसत्या चौकशा करता आहात. भेटायचे असेल तर माझ्या पित्याला भेटा त्यांची पाने अंगावर चोळून घ्या." बादशाहाला वाटले कि आपण सारखेच जर याची चेष्टा करीत राहिलो तर हा दरबारात आपण सर्वधर्मसमभाव पाळत नसल्याचे सांगेल आणि आपली त्यामुळे नाचक्की होईल. त्यापेक्षा आपण त्याचे म्हणणे ऐकू." बिरबलाने जे केले तेच बादशाहने केले नमस्कार केला, प्रदक्षिणा केली आणि नको ते केले ते म्हणजे त्या जंगली वनस्पतीला मिठी मारून त्याची पाने अंगावर चोळली, बिरबलाने फक्त नाटक केले होते पण बादशाहने पाने अंगाला चोळताच त्याच्या अंगाला प्रचंड खाज सुटली, आग होऊ लागली. अकबर जोरात बिरबलाला ओरडला,"अरे असले कसले पित्यासमान झुडूप ! माझ्या अंगाची त्याने आग केली. तुला मात्र काहीच केले नाही." बिरबल म्हणाला,"महाराज तुम्ही तुळशी मातेला वंदन केले नाही याचा आमच्या पित्याला राग आलेला दिसतोय. म्हणून त्याने मला काही केले नाही पण तुम्हाला मात्र ते त्रास देत आहे." अकबर मनातून काय समजायचे ते समजला. बिरबलाने अकबराला सर्वधर्मसमभावतेची चांगली अद्दल घडवली.

तात्पर्य-कोणत्याच धर्माची, त्यातील परंपरेची नकळतही थट्टा करू नये. कोणी करत असेल तर त्याला ते न करण्यास सांगावे. सगळे धर्म हे देवाला सारखेच.!

गुरुवार, २ मे, २०१३

(राजा आणि मंत्री)

(कथा क्र ७१) 


एका सम्राटाला रात्री येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही" सम्राट म्हणाले,"अहो! हिशोबात काही चूक असेल." मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वत:तपासला आहे." सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." परंतु मंत्री म्हणाला," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे." आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,"महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." यावर राजा म्हणाला,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.


तात्पर्य-सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

(कु-हाड आणि दांडा)

(कथा क्र ७०)


एकदा कु-हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाला. दोघेही स्वत:ला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते लाकडाचा दांडा नंतर शांत झाला. मात्र कु-हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती. कु-हाडीला प्रचंड अहंकार होता.ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती,"अरे लाकडाच्या दांडक्या ! तू स्वत:ला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्यापुढे पाणी भरते, मी ठरवले तर मोठमोठे वृक्ष मी सहज कापून काढते, तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणे चांगले नाही. तू माझी बरोबरी करू नको." लाकडाचा दांडा कु-हाडीचे अहंकारी सुरातील बोलणे मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कु-हाड शांत झाली मग लाकडाचा दांडा बोलू लागला,"तू जे म्हणते आहेस ते सर्व खरे आहे. तू झाडे तोडू शकतेस, तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे. हे सगळे खरे आहे पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिले नाहीस ते म्हणजे तू वरीलपैकी कोणतेच काम एकट्याने करू शकत नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या सहकार्याची गरज हि लागतेच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाही हे तुला माहित असतानासुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेंव्हा स्वत:ला यापासून वेळीच सावर अन्यथा तुला कुणी किंमत देणार नाही." कु-हाडीला तिची चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली.

तात्पर्य-सहकार्य भावना महत्वाची असते. अहंकारातून सहकार्य भावनेला जर तडा गेला तर काम करता येणे अशक्य आहे. परस्परसंबधी आदरभाव ठेवणे गरजेचे आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित