शनिवार, ६ जुलै, २०१३

(स्‍वामी रामतीर्थ व जपानी विद्यार्थी)

(कथा क्र.102)

स्‍वामी रामतीर्थ अमेरिकेला चालले होते तेव्‍हाची गोष्‍ट. ते ज्‍या जहाजात बसले होते त्‍यातून सुमारे दीडशे जपानी विद्यार्थी अमेरिकेला चालले होते. स्‍वामीजींचा त्‍यांच्‍याशी परिचय झाला. आणि ते विद्यार्थी स्‍वामीजींच्‍या ज्ञानाने फारच प्रभवित झाले त्‍या विद्यार्थ्‍यांपैकी अनेकजण श्रीमंत कुटुंबातील होते. स्‍वामीजींनी त्‍यांना बोलता बोलता विचारले, ‘ तुम्‍ही सर्व अमेरिकेला शिक्षणासाठी जात आहात का’ सर्वांनी स्‍वामीजींना विशेष अध्‍ययनासाठी जात असल्‍याचे सांगितले तेव्‍हा स्‍वामीजींनी त्‍या सर्वांना सहज प्रश्‍न केला, ‘ बरं, हे सांगा, बरेच दिवस तुम्‍ही अमेरिकेत राहणार आहात, तर त्‍यासाठी पैशाची व्‍यवस्‍था आपल्‍याकडे काय आहे’ स्‍वामीजींच्‍या त्‍या प्रश्‍नाचे उत्‍तर त्‍या विद्यार्थ्‍यानी दिले, ‘ स्‍वामीजी आम्‍ही तर या जहाजाचे भाडेही सोबत आणलेले नाही. जहाजात काही काम करून त्‍याचे भाडे देऊ आणि अमेरिकेतही आपल्‍या शिक्षणाचा खर्च एखादी नोकरी करून भागवू. आपल्‍या राष्‍ट्राचे धन व्‍यर्थ विदेशात का खर्च करावे, स्‍वामी रामतीर्थांनी पाहीले की सर्व विद्यार्थी जहाजात सफाई आणि छोटे मोठे काम करून जहाजाचे भाडे जमा करीत होते त्‍यांचे देशप्रेम पाहून स्‍वामीजी फारच प्रसन्‍न झाले आणि मनात विचार करू लागले की, विदेशात शि‍क्षण घेणारया भारतीय विद्यार्थ्‍यानीही असा विचार केल्‍यास भारताला संपन्‍न राष्‍ट्र बनायला वेळ लागणार नाही 

तात्‍पर्य- देशातील साधनांचा, धनाचा सद्उपयोग अशी राष्‍ट्रसेवा आहे की ज्‍यामुळे राष्‍ट्र जलदगतीने प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करू शकते

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

गुरुवार, ४ जुलै, २०१३

(‘मी’ चा त्‍याग)

(कथा क्र.101) 

एका विख्‍यात संताला भेटण्‍यासाठी एक राजा आला आणि म्‍हणाला,’’ तुम्‍ही मला त्‍या स्थितीमध्‍ये घेऊन जा, ज्‍या स्थितीमध्‍ये तुम्‍ही आहात.’’ संताने म्‍हटले,’’ महाराज मी तुम्‍हाला त्‍या अवस्‍थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्‍ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्‍हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्‍या दारापाशी येताच संताच्‍या नावाने हाक मारली. त्‍याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्‍हा कुटीपाशी गेला, त्‍याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्‍हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्‍हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्‍हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्‍या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर दिले हाकलून देतात, त्‍यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, आता चौथ्‍या दिवशी जाऊन बघु. चौथ्‍या दिवशी पण राजा गेला, त्‍याने संतांच्‍या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्‍यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्‍हणाले, ‘’राजन तुम्‍ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्‍या उत्तरात तुम्‍ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्‍हाला एकट्यानेच बोलावले होते. तुम्‍ही तुमच्‍या मी पणाला बरोबर घेऊन आलात. मानवीजीवनात या मी पणाला काहीही स्‍थान नाही. मी पणा सोडला की खूप काही शिकावयास मिळते’’ 

तात्‍पर्य- मानवाने ‘’मी’’ पणा सोडल्‍यास खूप काही प्राप्त होते. ‘ मी’ पणाचा मृत्‍यू ज्‍यादिवशी मानवातून होतो तो त्‍यादिवशी संतत्‍वाकडे वाटचाल करू लागतो. 

==============
ऐकलेली कथा 
==============