रविवार, १४ जुलै, २०१३

उपदेश


(कथा क्र.106) 

एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत एका गावात आले. त्‍या गावातील मुख्‍य व्‍यक्ती बुद्धांना पसंत करत नसे. जेव्‍हा त्‍याला माहिती झाले की, बुद्ध आपल्‍या शिष्‍यांसोबत गावात येत आहे तेव्‍हा त्‍याने गावातील लोकांना आदेश दिला की, आपल्‍या घराची दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका. बुद्ध त्‍या व्‍यक्तिच्‍या स्‍वभावाला ओळखून होते. मार्गात जेव्‍हा त्‍याचे घर आले तेव्‍हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले. बुद्धांचा आवाज ऐकून तो मुख्‍य व्यक्ती नाराज झाला आणि म्‍हणू लागला,’’ तुम्‍ही येथून निघून जा, कामधंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता. कष्‍टाचे काम करायला शिका आणि पोट भरा.’’ बुद्ध गुपचुप त्‍याचे अपमानास्‍पद बोलणे ऐकत होते. त्‍याचे बोलणे संपल्‍यावर बुद्ध म्‍हणाले,’’ माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा. आपल्‍या घरी येऊन जर काही खाण्‍यासाठी मागत असेल, आपण ताट सजवून आणले मात्र त्‍यानंतरही तो ते न स्‍वीकारताच निघून गेला तर तुम्‍ही त्‍या खाद्यपदार्थाचे काय कराल?’’ ती व्‍यक्ती म्‍हणाली,’’ मी ते नष्‍ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन’’ तेव्‍हा बुद्ध म्‍हणाले,’’ त्‍या दशेनुसार आपले सामान आपल्‍याजवळच राहिले ना? त्‍याचप्रमाणे आपल्‍या घरी येऊन आम्‍ही भिक्षा मागितली आणि बदल्‍यात आपण आम्‍हाला अपशब्‍द वापरले. भिक्षेत दिलेले हे शब्‍द आम्‍ही अस्‍वीकार केले. त्‍यामुळे ते तुमच्‍याजवळच राहिले.’’ मुख्‍य व्‍यक्तीला आपली चूक उमगून आली. बुद्धांची त्‍याने क्षमा मागितली. तो त्‍यांचा शिष्‍य बनला. 

तात्‍पर्य- उग्रपणाने वागल्‍यास होणा-या कामात अडथळा निर्माण होतो आणि संयमाने वागल्‍यास न होणारे कामसुद्धा पटकन होऊन जाते. 
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

शनिवार, १३ जुलै, २०१३

सुभाषचंद्र बोस

(कथा क्र.105)

नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्‍मजात हुशार होते. त्‍यांच्‍या वडील वकिलांची इच्‍छा होती की त्‍यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी सुभाषबाबू इंग्‍लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्‍यांचा इंग्रजांच्‍या गुलामीला विरोध होता. त्‍यांच्‍यात राष्‍ट्रसेवेची प्रबळ इच्‍छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्‍च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्‍यागमय मार्ग होता. याचे त्‍यांच्‍या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्‍यांनी घेतला. त्‍यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्‍यू यांच्‍याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्‍यांच्‍या वडिलांचे मित्र विल्‍यम ड्युक यांनी त्‍यांचा राजीनामा आपल्‍याजवळ ठेवून त्‍यांच्‍या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्‍या या कार्याकडे गौरव म्‍हणून पाहतोय. मी त्‍याची ही अट मान्‍य करण्‍यासाठी त्‍याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्‍यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्‍यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन उत्तरले,’’ मला लहानपणापासून दोन आण्‍यात भागवायची सवय आहे आणि दोन आणे मी कसेही मिळवीन.’’ विल्‍यम ड्युक अवाक् होऊन त्‍यांच्‍याकडे पाहू लागले. सुभाषचंद्रांना त्‍यांच्‍या वडिलांनी पत्र लिहीले, त्‍यात ते म्‍हणाले,’’ तू देशसेवेचे व्रत घेतले आहेस याचा मला अभिमान आहे. तुला या राष्‍ट्रकार्यात यश मिळो.’’ यावर सुभाषचंद्रांनी वडिलांना लिहीले,’’ बाबा, मला आज स्‍वत:वर गर्व होत आहे. याआधी इतका कधीच झाला नव्‍हता.’’ 

कथासार- राष्‍ट्रसेवेची आवड असणारे प्रत्‍येकजण अनुकूल प्रतिकुल परिस्थितीतही ते कार्य करतात. याला कुटुंबाचे सहकार्य व समर्थन ही राष्‍ट्रसेवा करण्‍यास उद्युक्त करते. 

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============