शनिवार, ५ जुलै, २०१४

साधू आणि यक्ष

    कथा क्र.222    


एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले.

तात्‍पर्य एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो. 

आचार्य विनोबा भावे

  कथा क्र. 221    

भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''


तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.