सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

खरा वेडा कोण

कथा क्र.232



एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''

तात्‍पर्य :- काही नाही.

वर्तमानपत्रातून संग्रहित


शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

धर्म


कथा क्र.231


एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्‍ठ धर्माचे महत्‍व समजावून सांगेल त्‍याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्‍वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्‍या धर्माचे महत्‍व समजावून सांगण्‍यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्‍ट आठवणीने करत होते की स्‍वत:च्‍या धर्माचे महत्‍व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्‍या धर्माची निंदानालस्‍ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्‍ठ आहे व त्‍यामुळे तो दु:खी होत होता. पण त्‍याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्‍या दर्शनास गेला. तेथे गेल्‍यावर त्‍याने साधूला नमस्‍कार केला व म्‍हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्‍ठ धर्माच्‍या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्‍ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,''सर्वश्रेष्‍ठ धर्म तर जगात अस्तित्‍वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्‍या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्‍यक्ती निष्‍पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्‍हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्‍यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्‍या. साधू राजाला म्‍हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्‍ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्‍येक नावेपाशी जाताच साधू त्‍या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्‍हटले,''महाराज आपल्‍याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्‍याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्‍हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्‍याला स्‍वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्‍याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्‍यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.

तात्‍पर्य :- मित्रमैत्रिणीनो आता वेगळे तात्‍पर्य काय सांगू.

साभार :- धार्मिक कथाऍं –फेसबुक पेज

सदर कथा पूर्वप्रकाशित असून मराठी बोधकथा यांनी भाषांतरीत केली आहे.

(मराठीत ऐकलेल्या, वाचलेल्या काही निवडक कथा देण्याचा एक प्रयत्न)