सोमवार, ३० जून, २०१४

आत्‍मनियंत्रणाचे महत्‍व

कथा क्र.220

एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.


तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो. 

महिलेचा निर्भीडपणा

कथा क्र.219


एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्‍यासाठी निमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्‍नही विचारले. त्‍यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्‍स्‍युक्‍य असणा-या लोकांच्‍याही प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्‍न केले. तो म्‍हणाला,'' जर मी तुम्‍हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्‍येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्‍हटले,'' नाही, आम्‍ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्‍यक्‍त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्‍यास सुचविले. त्‍या महिलेला याचे कारण विचारले असताती म्‍हणाली,''तुम्‍ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्‍यापर्यंतही येत नाही यावरून असे स्‍पष्‍ट होते की तुमच्‍या शाही भांडारामध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या हिश्‍श्‍यापेक्षा जास्‍त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्‍याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्‍हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्‍याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्‍श्‍याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्‍यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्‍या महिलेला धन्‍यवाद देऊ लागले कारण खलिफाच्‍या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्‍याला किंवा धर्माला धोका नसतो.