शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

मुर्खाशी गाठ

कथा क्र.131 

एकेदिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्‍हणाला, ''बिरबल, एक प्रश्‍न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्‍यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्‍कीच नसणार तेव्‍हा मला त्‍यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे'' 
बिरबल म्‍हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीतून आपल्‍याला काय निष्‍पन्न होणार आहे तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्‍यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्‍याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्‍यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्‍न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्‍याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्‍यांना दरबारात जाण्‍यापूर्वी चांगला पोशाख घातला आणि त्‍यांना काही कानमंत्र दिला. बिरबल वडीलांना म्‍हणाला,'' बादशहा तुम्‍हाला भेटू इच्छितात, तिथे गेल्‍यावर तो तुम्‍हाला कोणतेही आडवेतिडवे प्रश्‍न विचारेल पण काही केल्‍या तुम्‍ही तोंड उघडू नका. एकही शब्‍द न बोलता गप्‍प बसून रहा. बादशहा चिडेल, संतापेल पण तुम्‍ही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका.'' झाले बिरबलाचे वडील बादशहाच्‍या दरबारात पोहोचले. बादशहा दरबारात येताच वडीलांनी त्‍यांना सलाम केला. बादशहाने त्‍यांना बिरबलाचे वडील म्‍हणून ओळखले पण बोलायला काही तरी सुरुवात करायची म्‍हणून त्‍याने विचारले,'' तुम्‍हीच बिरबलाचे वडील का'' वडील गप्‍पच. त्‍याने पुन्‍हा विचारले,'' तुम्‍ही कुठे राहाता, गावाचे नाव काय, शेती कशी आहे, पाऊसपाणी कसे आहे, गावातील मंडळी कशी आहेत,'' असे अनेक प्रश्‍न विचारले तरी बिरबलाने सांगितल्‍याप्रमाणे वडील गप्‍पच होते. शेवटी बादशहा वैतागला, चिडला आणि संतापाच्‍या भरात बोलून गेला, ''काय बुद्धी झाली आणि या मूर्खाला मी बोलावून घेतले. असल्‍या मूर्खाशी अशीकशी माझी गाठ पडली की जो साध्‍या प्रश्‍नांची सुद्धा उत्तरे देत नाहीये.'' बिरबलाचे वडील मूर्ख शब्‍द ऐकून मनातून संतापले होते पण बिरबलाने सांगितले होते की, काही झाले तरी तोंड उघडायचे नाही. बादशहा कंटाळून निघून गेला व वडीलसुद्धा घरी गेले. त्‍यांनी हा प्रकार बिरबलाच्‍या कानावर घातला. बिरबलाने त्‍यांची समजूत घातली व शांत राहाण्‍यास सांगितले. चार दिवसांनी जेव्‍हा बिरबल पुन्‍हा दरबारात गेला तेव्‍हा बादशहा बिरबलाला म्‍हणाला,'' बिरबल मला तुझ्याशी काही महत्‍वाचे बोलायचे आहे तेव्‍हा तू जवळ ये.'' बिरबल जवळ गेला. बादशहा हळूच त्‍याला म्‍हणाला,'' बिरबल, आपली गाठ जर मूर्खाशी पडली तर काय केले पाहिजे'' बिरबल तात्‍काळ उत्तरला,''महाराज आपण शांत रा‍हिले पाहिजे, गप्प बसले पाहिजे.'' बादशहा म्‍हणाला, '' ते कसे काय'' बिरबल म्‍हणाला,'' माझे वडील नाही का तुमच्‍यासमोर गप्प बसले होते तसेच'' हे ऐकून बादशहाचे तोंड बघण्‍यासारखे झाले. 

तात्‍पर्य-मूर्खाशी वाद घालू नका, गप्प रहा. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा