सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

महाराजा सत्यशील

कथा क्र.134

विजयगडचा राजा सत्यशील याला आपल्या उत्तराधिका-याचा शोध होता. मंत्र्याशी चर्चा केल्यावर त्याने म्हंटले,"आपले ४ पुत्र दयाशील, धर्मशील, कर्मशील आणि विवेकशील हे आहेत ना! मग आपण चिंता का करता?" राजा म्हटले," आमच्या कुळात केवळ योग्यतेनुसार राजा निवडला जातो." तेंव्हा मंत्र्याने त्याची योग्यता पारखण्याचा आग्रह केला राजाला ती गोष्ट योग्य वाटली. त्याने आपल्या चारही मुलांना अशा गावात पाठविले जिथे लोक दरोडेखोरांपासून त्रस्त होते. चौघेही तेथे गेले. विवेकशील सोडून इतर तिघेही गावातील मुख्य व्यक्तीच्या घरी थांबले. दयाशील गावात फिरायला निघाला तेंव्हा त्याने गावात दरोडेखोरांनी केलेली गावाची दुर्दशा पाहून त्याला दुःख झाले. त्याने त्या मुख्य व्यक्तीला बोलावून एका घरात आश्रम बनविला व सर्व त्रस्त लोकांना बोलावून त्यांची तेथे सेवा करू लागला. एके दिवशी दरोडेखोरांनी तो आश्रमही नष्ट करून टाकला. तेंव्हा तेथील लोकांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धैर्यशील याने त्या लोकांना धैर्याने थांबविले आणि तो आश्रम पुन्हा बांधला. एके रात्री परत दरोडेखोर आले तेंव्हा कर्मशीलच्या नेतृत्वाखाली लोक दरोडेखोरांशी लढले आणि दरोडेखोरांना पळवून लावले. त्या मुख्य व्यक्तीने आता हि शुभ वार्ता महाराजांना कळवण्याचा राजकुमारांकडे आग्रह धरला पण विवेकशील याचा कुठेच पत्ता नव्हता. तितक्यात विवेकशील तेथे आला आणि म्हणाला,"माझा उद्देश समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा होता.दरोडेखोराच्या आईवडिलांची हत्या मुख्य व्यक्तीने केली होती त्याचा बदला हे दरोडेखोर या गावाशी घेत होते. चूक त्यांची नाही तर मुख्य व्यक्तीची आहे. त्याला आधी तुरुंगात टाका." राजाने तशीच कारवाई केली व विवेकशील यालाच वारस नेमले. 

तात्पर्य-विवेक सदगुणाच्या उपयोगाचे ज्ञान देत आहे. ते अन्य गुणांपेक्षा श्रेष्ठ आहे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

(अन राजाचे डोळे उघडले)

कथा क्र.133


रामगडचा राजा अतिशय सणकी होता. एके रात्री त्याच्या डोक्यात अशी सनक शिरली. त्याने आपल्या दरबारातील मंत्र्याला बोलावून घेतले आणि सांगितले कि," आम्ही हे जाणून घेवू इच्छितो कि राज्यात कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे कि नाही?" राजा आणि मंत्री रात्रभर आणि पूर्ण दिवस नगरात फिरत होते. शहराबाहेर त्यांना एक झोपडी दिसली, राजाने त्याच्याजवळील १०० सुवर्णमुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली व ते दोघेजण राजवाड्याच्या दिशेने निघाले. राजाने वाटेल त्याची कल्पना मंत्र्याला सांगितली,"या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो सुवर्णमुद्रा परत करण्यासाठी आपल्याकडे परत येईल तेंव्हा आम्ही त्याला बक्षीस देवू आणि त्याने त्या परत केल्या नाहीत तर त्याला शिक्षा करू." ती झोपडी श्याम नावाच्या एका गरीब व्यक्तीची होती. त्याने राजाला आणि मंत्र्याला झोपडीकडे येताना पहिले होते. राजा सणकी आहे हे त्याला माहित होते. त्याने राजाला त्या मुद्रा परत केल्या आणि या मुद्रा माझ्या नाहीत त्यावर माझा अधिकार नाही म्हणून परत घ्या असे राजाला त्याने सांगितले. राजाने खुश होवून त्याला २०० सुवर्णमुद्रा भेट दिल्या. नंतर हाच क्रम चालू राहिला. दर पाचव्या दिवशी कुणीतरी सुवर्णमुद्रा घेवून दरबारात येत असे व राजा त्याला दुप्पट मुद्रा देत असे.मंत्र्याने याला विरोध केला कारण यातून तिजोरी खाली होत चालली होती. प्रामाणिकतेच्या नावाखाली चालू असलेला हा बनाव आहे हे मंत्र्याला समजत होते पण त्याचा नाईलाज होता.हे सगळे सहन न झाल्याने त्याने अखेर एक दिवस धाडस करून मंत्री राजाला घेवून श्यामच्या घरी गेला तर पाहतो काय? श्याम आणि भेटी मिळवणारा प्रत्येकजण तेथे हजर होता. झोपडी आता झोपडी राहिली नव्हती तर एक अलिशान वाडा झाला होता. सर्वजण ऐषारामात राहत होते. सर्व प्रकार राजाच्या लक्षात आला. त्याचे डोळे उघडले, त्याने श्यामला तुरुंगात टाकले व सुवर्णमुद्रा राजकोशात जमा करण्याचे आदेश दिले.

तात्पर्य-मदत करतानाही ती योग्य पद्धतीने योग्य माणसाला मिळते आहे कि नाही याचाही विचार व्हायला हवा. 

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============