रविवार, १९ जानेवारी, २०१४

खुनी सेनापती

कथा क्र.166

कुशलगडचा राजा वीरभद्रला एके दिवशी सेनापतीने सूचना दिली,''महाराज, काल रात्री आपल्‍या महालात आपल्‍या सैनिकाची हत्‍या झाली आणि त्‍याच्‍या मृतदेहाजवळ हे पत्र मिळाले आहे'' राजाने ते पत्र वाचले, त्‍यात राजाला धमकी देण्‍यात आली होती की,'लवकरच कुशलगडचे सिंहासन खाली केल नाही तर रोज एक सैनिक मारला जाईल' राजाने खुन्‍याचा शोध घेण्‍याचा आदेश दिला, या दरम्‍यान वीरभद्रचा मुलगा बलभद्र हा शिक्षण पूर्ण करून राज्‍यात परत आला होता. राजकुमार बलभद्रने महालाच्‍या सुरक्षेच्‍या कारभार स्‍वत:कडे घेतला होता. त्‍याने सैनिकांना आज्ञा केली चार-चार सैनिकांची तुकडी बनवून पहारा द्या. योगायोगाने त्‍या रात्री कोणत्‍याही सैनिकाची हत्‍या झाली नाही. तेव्‍हा राजकुमाराने सेनापतीला म्‍हटले,'' असे वाटते की हत्‍या करणारा घाबरला आहे. आता ही सुरक्षा व्‍यवस्‍था भंग करा.'' सेनापतीने विरोध केला. परंतु राजकुमाराने आपले म्‍हणणे सिद्ध करण्‍यासाठी राजमहालाच्‍या पाठीमागील बुरुजावर एक सैनिक तैनात करण्‍यास सांगितले. खुनी त्‍याला मारण्‍यासाठी गेला. त्‍याने सैनिकावर वार केला. परंतु लपुन बसलेल्‍या राजकुमाराने त्‍याला पकडले. तो खुनी सेनापती निघाला. त्‍याने कबुल केले की की शेजारील राज्‍याच्‍या राजाने त्‍याला कुशलगडला जिंकल्‍यावर अर्ध्‍या राजाचा राजा बनविण्‍याचे आमिष दाखविले होते. राजाने सेनापतीला कैद करून देहदंडाची शिक्षा दिली.

तात्‍पर्य :- कधी कधी बाहेरच्‍या लोकांपेक्षा आपल्‍या जवळचे लोकच आपल्‍याला दगा देत असतात. तेव्‍हा बाहेरच्‍या दगाफटका तपासताना जवळच्‍या लोकांनाही तपासले पाहिजे. अति लोभापायी विश्‍वासपात्र लोकही दगा देतात. 
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________

शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

कावळा आणि त्याचा मुलगा

कथा क्र.165


एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते. कावळ्याच्या मुलगा वडिलांना म्हणाला,"बाबा, मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले पण दोन पायाच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही. बाबा कसा स्वाद असतो हो या दोन पायाच्या जीवाच्या मांसाचा?" वडील कावळा म्हणाला,"आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!" मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे. वडील कावळा म्हणाले," ठीक आहे पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा होय म्हणाला. त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेताक्षणी मुलगा म्हणाला,"शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको" वडील कावळा म्हणाला,"थांब तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे." मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ते? पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला. मग तो झाडावर येवून बसला. कावळा मुलाला म्हणाला,"आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?" थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते. फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या, आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते. आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराधहि मारले जात होते. खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाहीपणाचा. गाव निर्मनुष्य भकास झाले होते, सर्वत्र भयाण शांतता पसरली होती या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे. आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते. कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला,"बाबा, हे असेच नेहमी होते का? आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?" कावळा म्हणाला," अरे, या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात हे त्यांच्या लक्षात हि येत नाही. माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचीच जास्त प्रस्थ माजविले आहे आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात.कुठला तरी कोणी तरी येतो आणि भडकावू भाषणे देतो आणि हे त्याचे ऐकतात आणि एकमेकांशी भांडतात. मासाचा एक तुकडा यांच्या वर्षानुवर्षाच्या मैत्रीत खंड पाडतो आणि ते एकमेकांच्या जीवावर उठतात आणि यांना इतकी बुद्धी येईल असे मला तरी वाटत नाही."इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले. 


तात्पर्य-मित्र-मैत्रिणिनो, आता वेगळे काय सांगायचे? तुम्ही सर्वच जण याचा विचार करा.