कथा क्र. २
एका गावात एक ज्योतिषी राहत असे. हुशार पण गरीब होता. त्याचा ज्योतिषाचा अभ्यास इतका दांडगा होता कि त्याच्या गणिताप्रमाणेच जणू नियती घडवलेली असावी. पण नशिब कोणाला कुठे घेवून जाईल त्याचा नेम नाही. एके दिवशी त्याच्या बायकोबरोबर त्याचे जोरात भांडण झाले. बायकोने त्याला सांगितले कि आज तरी खायला घेवून या नाहीतर घरी येवू नका. हा बिचारा कोठे जावे कोणाला मागावे या विचारात होता. तितक्यात त्याला सुचले कि या देशा
च्या राजाकडे जावे आणि त्याला भविष्य सांगावे तो खुश झाला तर आपले दिवस चांगले येतील. किमान काही दक्षिणा तरी पदरी पडेल. या आशेने तो दरबारात गेला. राजाने सगळी विचारपूस केली आणि त्याला भविष्य सांगायला सांगितले. ज्योतिषाने गणित मांडले आणि त्याचा चेहरा एकदम पडला. राजा अचंबित झाला आता हसतमुखाने भविष्याविषयी बोलणारा हा माणूस एकदम का उदास झाला. त्याने आदेश दिला कि जे आहे ते खरे सांग. त्याने सांगितले कि राजा येत्या काही दिवसात तू मरणार आहेस. हे ऐकून राजाची बोबडी वळली आणि त्याने त्या ज्योतिषाला अंधार कोठडीत टाकायला सांगितले. मदत राहिली बाजूला पण नशिबी अंधार कोठडी आली. याला काही दिवस उलटले आणि एका सरदाराला यात ज्योतिषाची काही चूक नाही हे जाणवले आणि तो त्याची मदत करायला गेला. सरदाराने सांगितले कि तू राजाला आता असे भविष्य सांग कि तो खुश होईल. ज्योतिषी राजाच्या परवानगीने पुन्हा दरबारात गेला आणि त्याने गणित मांडले. त्याने राजाला सांगितले कि राजा मला तुझा आणि तुझ्या राज्याचा उज्ज्वल भविष्य काळ दिसत आहे. येणारा नवीन राजा हा खूप दयाळू , पराक्रमी आणि प्रजेचे हित साधणारा आहे. आणि लवकरच तुझा मुलगा हा नवीन राजा होणार आहे. हे आपल्या मुलाचे कौतुक ऐकून राजा खुश झाला आणि त्याने त्या ज्योतिषाचा सन्मान करून त्याला भरपूर दक्षिणा दिली. पण प्रत्यक्षात आपला मृत्यू होणार हे त्याने लक्षात घेतले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा