रविवार, २३ डिसेंबर, २०१२

सत्संगाचा परिणाम



कथा क्र. ५  

एका गावात एक चोर आणि त्याचा मुलगा राहत होते. वडिलांनी खूप चो-या केल्या होत्या. त्यांचा शेवट जसा जवळ आला तसे त्यांनी मुलाला जवळ बोलावून घेतले आणि ''काय वाटेल ते होऊ दे पण कोणत्याही प्रवचन किंवा कीर्तनाच्या वाटेला चुकूनही जाऊ नको'' असा मुलाला उपदेश केला. त्यांनी मग प्राण सोडले. मुलानेही हा उपदेश मनापासून पाळला पण त्यामागील कारण त्याला कळले नाही. एके दिवशी जंगलातून पळून गावाकडे येत असताना चुकून एका मंदिराच्या पाठीमागे तो आडोश्याला लपला. त्या मंदिरात एका महाराजांचे प्रवचन चालू होते. प्रवचनात त्यांनी एक कथा निवडली होती. त्यातील एकाच वाक्य ह्याचा नकळत कानावर पडले. ते म्हणजे ''देवांची सावली पडत नाही''. ह्याने ते मुद्दाम ऐकले नव्हते तरी त्याच्या डोक्यात ते चांगलेच भिनले. नेमके त्याच वाटेवर राजाचे सैनिक त्याला आडवे आले आणि त्यांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. बरेच दिवस खूप त्रास देवूनही, खुप मार खावूनही याने गुन्हा कबूल केला नाही तेंव्हा राजा चिंतीत झाला आणि त्याने सरदारांची सभा बोलावली आणि चोराबद्दल सांगितले व उपाय सुचविण्याबद्दल सांगितले. एका सरदाराने शेवटी एक उपाय सुचविला. तो म्हणाला हा कशाला घाबरत नाही किंवा कशाला बधत नाही तेंव्हा याला देवाची तरी भीती घालू आणि ह्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेवू. मग एका सुंदर स्त्रीला खुपसे दागदागिने घालून देवीच्या रुपात सजविण्यात आले आणि ह्याच्या समोर पाठविण्यात आले. तुरुंगात सर्वत्र अंधार होता आणि फक्त थोडा उजेड या स्त्री वर पाडण्यात आला. चोराने पाहिले एक देवी आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला गुन्हा कबूल करण्यास सांगत आहे. पण ह्याच वेळी त्याला नेमके प्रवचनातील ''देवांची सावली पडत नाही'' हे वाक्य आठवले आणि त्याचा समोरील देवीची सावली पडलेली त्याला दिसली.त्याच बरोबर त्याला कळले कि हि देवी नाही माणूस आहे , तरी त्याला कळून चुकले आपण एकदा प्रवचन चुकून ऐकले तर आपल्याला इतका फायदा झाला. मग हि लुटमार कशाला? चोरी कशाला? त्यापेक्षा चांगला मार्ग पत्करून जीवन जगण्याचा त्याने निश्चय केला.

तात्पर्य- चांगले विचार ऐकल्याने, चांगली संगत केल्याने माणसाला चांगले वागण्याची प्रेरणा मिळते.

वर्तमानपत्रातून संग्रहित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा