शनिवार, २५ जानेवारी, २०१४

संकटसमयीचे धैर्य

कथा क्र.168


अरब देशात पूर्वी एक बादशहा होऊन गेला. तो अत्‍यंत थाटात राहायचा. एकदा शेजारच्‍या देशाने त्‍याला युद्धाचे आव्‍हान दिले. बादशहा आपले सैन्‍य घेऊन सीमेवर निघाला. दुर्दैवाने त्‍याला शत्रूकडून हार पत्‍करावी लागली. त्‍याला बंदी बनवून आणण्‍यात आले. त्‍याला त्‍या जेलमध्‍ये ठेवण्‍यात आले होते. तेथे स्‍वयंपाक्‍यांनाही ठेवण्‍यात आले होते. त्‍याने आपल्‍या स्‍वयंपाक्‍यास जेवण बनवण्‍यास सांगितले. तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे एकच मांसाचा तुकडा उरला होता. त्‍यांनी तोच तुकडा उकळण्‍यासाठी ठेवला. तेवढयात एक कुत्रा ते‍थे आला. मांसाच्‍या तुकड्याचा वास आल्‍याने त्‍याने भांड्यात तोंड घातले. पण त्‍याचे तोंड त्‍या भांडयात अडकले. आपले तोंड भांड्यातून सोडवू न शकलेले ते कुत्रे पळून गेले. ते पाहून बादशहाला हसू आवरले नाही व तो हसू लागला. बादशहा हसतो आहे हे पाहून पहा-यावरील सैनिकाने त्‍याला विचारले, तुम्‍ही इतक्‍या अडचणीत असूनसुद्धा हसता कसे? दुसरा कोणी असता तर शरमेने मान खाली घालून बसला असता. तेव्‍हा बादशहा म्‍हणाला,’’ तोंड लपवून कोणती समस्‍या सुटते काय? वेळ फिरली की काय काय करावे लागते हे आता कुत्र्यापासून पहायला मिळाले याचे मला हसू आले आणि शिकायलाही. खरा माणूस दु:खही हसून पचवतो. संकटसमयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे धैर्यशील म्‍हणवले जातात.’’

तात्‍पर्य :- संकटाशी सामना करणे हेच पुरुषार्थाचे लक्षण आहे. 

______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा