कथा क्र.199
सोमवार, २८ एप्रिल, २०१४
मुर्ख राजा आणि बुद्धिमान ऋषी
एका राज्यात मूर्ख राजाचे शासन होते. त्याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्या सर्व मूर्ख व चापलुसी करणारे होते. त्या राजाच्या राज्यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्य त्या राज्यात जात नसत. त्यामुळे त्या राज्यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्या राज्यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्ला दिला की त्या ऋषींना आपल्या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्यांचा सत्कार करावा म्हणजे जनतेचा विश्वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्या मुख्य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्या झोपड्या पाहून थांबले व त्यांनी विचारले,’’ या कुणाच्या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्काळ राजाला म्हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी मूर्खानी केलेल्या उपदेशाने राजाचे राज्य लयाला गेले. त्याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा