बुधवार, २५ जून, २०१४

लोभाची शिक्षा

कथा क्र. 217

एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस


तात्‍पर्य लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे. 

1 टिप्पणी: