मंगळवार, २४ जून, २०१४

हि-यापेक्षा जनता महत्‍वाची

   कथा क्र. 216   

एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्‍हणाला,''माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''


तात्‍पर्य :- आपल्‍या हाती जर सत्‍ता असेल तर त्‍याचा योग्‍य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्‍ट ठरते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा