शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

स्‍वावलंबनातून बंधा-याचे काम

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.255

उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात एका संन्‍याशाने मुक्काम केला होता. ज्‍या गावात संन्‍याशीबुवा राहत होते तेथे पावसाळ्यात गंगानदीला प्रचंड पूर येत असे. त्‍यामुळे गाव पाण्‍यात बुडून जात असे. संन्‍याशीबाबांना हे गावाचे दु:ख बघवले नाही. त्‍यांनी गावक-यांना याबाबत विचारले असता सगळे गावकरी म्‍हणाले महाराज पाऊसकाळ सुरु झाला की आम्‍ही आमची घरेदारे इथेच सोडून दुस-याठिकाणी स्‍थलांतर करतो. पाऊस येतो, गंगामाई रौद्रावतार धारण करते आणि आमचे सर्वस्‍व लुटून परत जाते. मग पूर ओसरला की आम्‍ही येथे येतो आणि पुन्‍हा सगळी जमवाजमव चालू होते. संन्‍याशीबुवांना वाईट वाटले, त्‍यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली आणि त्‍यांच्‍या असे लक्षात आले की एकाच ठिकाणाहून गावात नदी प्रवेश करते आणि त्‍या जागेवर जर बंधारा बांधला तर नदीचा गावातील प्रवेशाचा मार्ग बदलता येऊ शकतो. यासाठी त्‍यांनी गावातील लोकांना बंधारा बांधण्‍याविषयी सुचविले. गावकरी म्‍हणाले, महाराज, आम्‍ही प्रशासनास नदीवर बंधारा बांधण्‍याविषयी अनेकदा सांगून पाहिले पण त्‍याची दखल कोणीही घेतली नाही. संन्‍याशीबुवा म्‍हणाले, मग आपण बंधारा बांधूया. श्रमदानाने काही वाटेल ते शक्य आहे. पण कोणीही तयार झाले नाही. मग दुसरे दिवशी संन्‍याशीबुवाने स्‍वत:च कुदळ, फावडे, पाटी घेऊन बंधा-याचे काम सुरु केले. काही लोकांनी ते पाहिले. रोजच संन्‍याशी दिवसभर एकटाच काम करत असे. पण इतका मोठा बंधारा बांधणे हे काही त्‍यांच्‍या एकट्याच्‍या आवाक्याबाहेरचे होते. लोकांनी हे संन्‍याशीबुवाचे काम पाहिले व त्‍यांना वाटू लागले की हे महाराज त्‍यांचा कोणताही स्‍वार्थ नसताना किंवा त्‍यांचे कोणतेच नुकसान होत नसताना केवळ आपल्‍यासाठी इतके कष्‍ट घेत आहेत मग आपणही त्‍यांची मदत केली पाहिजे. हळूहळू लोकांनी महाराजांना मदत करायला सुरुवात केली आणि मग सगळ्या गावक-यांनी मिळून मोठा बंधारा त्‍या नदीवर बांधून काढला व पूर येण्‍यापासून गावाचे संरक्षण केले.

तात्‍पर्य :- अशक्‍य वाटणा-या गोष्‍टीसुद्धा एकमेकांच्‍या सहकार्याने सहजगत्‍या साध्‍य होऊ शकतात. गरज आहे ती फक्त संघटीत होऊन काम करण्‍याची.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा