गुरुवार, २६ मार्च, २०२०

ऐलतीर पैलतीर

🙏🏻🙏🏻कथेचे प्रास्ताविक🙏🏻🙏🏻
आपल्या जीवनात अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी अनेक अनुभव येत असतात. काही दैवत्वाची प्रचिती देऊन जातात तर काहींची आठवण सुद्धा नको असते. मानवी शरीरात प्रवेश केल्यावर त्याचा उपयोग करून आयुष्यात कार्यसिद्धी झाल्यावर कधीतरी हे शरीर सोडावे लागते. मग त्या आयुष्याला जर एक प्रवास मानले आणि त्या आयुष्यात दिशादर्शक कोणीतरी एक नियंता आहे असे जर मानले तर त्या दिशादर्शकाची काय बाजू असेल आपल्या आयुष्याकडे बघण्याची हे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्याला कोणी भगवान, देव, नियंता, निसर्ग काही म्हणू दे पण त्याच्या भावना काय असतील हे मांडण्याचा हा एक प्रयत्न या कथेद्वारे मी करत आहे. हेच सगळे बरोबर किंवा चुकीचे आहे हा माझा दावा नाही पण असेही असू शकते असे मला वाटते. व्यक्ती तितक्याच प्रकृती या न्यायाने प्रत्येकाचे मत यावर माझ्याशी सहमत असेलच असे नाही.
आपला
संदीप जोशी, पंढरपूर

ऐलतीर पैलतीर
त्या गावी जाण्याचा प्रसंग कधीच आला नाही माझ्यावर पण एका कामासाठी जाण्यासाठी मी निघालो आणि मग एका माहितगार माणसाने मला सांगितले की जाता आहात संध्याकाळ व्हायच्या आत नदीच्या काठी जाऊन थांबा म्हणजे पलीकडे गावात जायला नाव(होडी) मिळेल. मी म्हणालो दुसरी काही व्यवस्था नाही का? तो माझ्याकडे बघून म्हणाला की नाही हो, ही नावच इकडून तिकडे फेरी मारते मात्र संध्याकाळी पाच नंतर फेरी बंद होते. पाच वाजता शेवट होतो. मी एसटीने प्रवास करत त्या नदीच्या काठी उतरलो आणि वाट बघत बसलो. अर्ध्या तासाने नाव येताना दिसली. नाव हळूहळू किनाऱ्यावर आली आणि नावाड्याने पूर्वीपासून ओळख असल्यासारखे माझ्याकडे बघून स्मित हास्य केले. नावेतून पाचच प्रवासी आले होते. त्यांनी पैसे दिले आणि निघून गेले. नावाडी माझ्याकडे बघून मला म्हणाला, काय यायचंय का पैलतीरावर? मी म्हणालो, खरंतर जावे का नको याच संभ्रमात मी आता आहे आणि संध्याकाळची वेळ, मी एकटाच प्रवासी आणि तोही या परक्या ठिकाणी आलेला काय करू तेच खरे कळत नाही मला." असे म्हणून मी नावेत चढताक्षणी नावाडी मला म्हणाला," जेव्हा लोकांना काही कळेनासे होते तेव्हा लोक माझ्यावर भरवसा ठेवून या नावेत बसतात. काळजी करू नका मी पोहोचवेन तुम्हाला पैलतीरावर अगदी सुरक्षितपणे. ऐलतीरावर पैलतीरावर दोन्ही बाजूला लोक फक्त माझीच वाट बघत असतात. मी कधी येतोय आणि त्यांना या नदीतून पार करून कधी नेतो यासाठी त्यांचे डोळे आसुसलेले असतात. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरही त्यांचा विश्वास बसत नाही आणि ते विश्वास ठेवतही नाहीत. माझे काम मी इतक्या प्रामाणिकपणे करतो की लोकांचा माझ्यावरचा भरवसा कधीच तुटत नाही आणि मीही तो तुटू देत नाही. त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी, सुखाच्या, दुःखाच्या क्षणी, संकटात त्यांनी कधीही मला हाक मारावं आणि मी यावं इतकं आता पक्कं झालंय बघा. पण वाईट मात्र एकच वाटतं की त्यांची गरज असतानाच फक्त मला लोक बोलावतात आणि माझा थोडासा भोळा स्वभाव असल्याने मी त्यांच्या त्या बोलावण्याने किंवा आपल्या कामाशी मी प्रामाणिक असल्याने का होईना म्हणा मी लगेच लोकांच्या मदतीला धावतो. कित्येक वेळा तर मी जेवताजेवता सुद्धा कामावर पोहोचलो आहे. एरव्ही मी काय करतो, काय खातो, काय पितो, माझी आवडनिवड, माझी मुलेबाळे या गोष्टींची कुणालासुद्धा खबरबात ही नाही. माझ्या गोष्टी विचारायला त्यांना फुरसत आहे कुठे. फक्त त्यांच्या कामी मी उपयोगी पडतो म्हणून मी चांगला आहे नाहीतर मी वाईट असतो. पैसासुद्धा मी कुणाकडून मागणी करून घेत नाही. जे द्याल त्याचा स्वीकार करतो आणि नाही कुणी दिले तर त्यालाही काही बोलत नाही मी. आपल्याला जे मिळेल त्यात माझे समाधान असते. तरीदेखील लोक म्हणतात की याने अलीकडे पलिकडे नेण्यात वेळ घालवला. मला सांगा नदी पार करून जाण्यासाठी लागणारा वेळ काय मी चालवतो का. नदी वाहती आहे, तिच्या प्रवाहात फक्त वल्हे मारून नावेला मार्गदर्शन मी करतो. पण लोकांची अपेक्षा असते की लगेचच पलिकडे पोहोचलो म्हणजे बरे लगेच कसे बरे पोचता येईल काही काळ जावा लागतोच ना त्यासाठी. आता तुमचा तीर जवळ आला आहे. तयारीत राहा, ज्या कामासाठी आला आहात ते नीट समजून उमजून, व्यवस्थितपणे करा आणि काम झाले की याच तीरावर या. मी आहेच इथे तुम्हाला परत घेऊन जायला." नदीकाठी नाव त्याने थांबवली आणि मग मी नावेतून उतरलो. त्याने पैसे सांगितले नाही मग वरच्या खिशात जी रक्कम होती ती त्याच्या हातावर दिली. त्याने एक प्रसन्न पण आश्वासक हास्य माझ्याकडे बघून केले. मी थोडा पुढे गेलो आणि मागे वळून पाहिले तर तो तिथेच उभा होता. मी त्याच्यापाशी गेलो आणि त्याचे हातात घेऊन म्हणालो, तुम्ही सगळे सांगितले पण तुमचे नाव काही सांगितले नाही किंवा बोलण्याच्या ओघात एकदाही तोंडात येऊ दिले नाही. काय आहे तुमचे नाव? नाव कळले म्हणजे परतीच्या वेळी तुम्हाला त्या नावाने मला तुम्हाला हाक मारता येईल." तो क्षणभर माझ्याकडे बघत म्हणाला," माझे ठेवलेले असे काही नाव नाही. ज्याला ज्या नावाने हाक मारायची तो त्या नावाने हाक मारतो आणि मी त्या नावाच्या हाकेला १००% ओ देतो आणि येतोच. तुम्ही पण कुठल्याही नावाने हाक मारा मी येईनच."
©लेखन
संदीप सुधीर जोशी
पंढरपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा