शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

(मदत)

 (कथा क्र ६५) 

वीरगडचा राजा सूर्यप्रताप दयाळू आणि परोपकारी होता. त्याच्या राज्यातील एका गावात एकेवर्षी पाऊस पडला नाही. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्या गावात रामचरण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळामुळे त्याच्या घरात खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते, राजाने मदत पाठविली पण गावातील मुखियाने आपल्याच लोंकाना त्या मदतीचा लाभ दिला. जेंव्हा रामचरण मदत मागण्यासाठी गेला तेंव्हा मुखिया त्याला रागावला, आणि त्याला हाकलून दिले. रामचरणची पत्नी आणि मुलाने भुकेने तडफडून जीव टाकला. तेंव्हा रामचरणने वैराग्य स्वीकारले आणि एका साधूच्या दलासोबत तो निघून गेला. साधू दिवसभर भिक्षा मागत असत आणि रात्री मादक पदार्थ खावूनपिवून चोऱ्या करीत असत. चुकीच्या संगतीमुळे रामचरणही नकली ज्योतिषी बनून पैसा जमा करीत असे. त्याने दिवसभर फिरून लोकांविषयी माहिती गोळा करत असे व त्या माहितीचा वापर करत रात्री ज्योतिषाचा वेष धारण करून लोंकाना मूर्ख बनवीत असे. जेंव्हा तो ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाला तेंव्हा राजा सूर्यप्रताप त्याला भेटण्यासाठी आला. परंतु त्याने येण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहिली, रामचरणचे खरे रूप राजाला समजले, सैनिकांनी रामचरणला पकडून राजापुढे उभे केले, राजाने त्याला या त्याच्या खोट्या वागण्याचे कारण विचारले, तेंव्हा रामचरण म्हणाला,"महाराज ! गावाच्या मुखीयाने तुमच्या पाठविलेल्या मदतीतून जर फक्त दोन भाकरी आणि पाणी जर मला दिले असते तर माझी बायको आणि मुलगा मरण्यापासून वाचले असते. तुमची मदत मिळाली नाही आणि ते दोघे भुकेने तडफडून मेले, ते दोघे जगले असते तर मी असा खोटारडेपणाने कधीच वागलो नसतो. लोकांचे ज्योतिष मी काय बघणार! मला माझे कुटुंब सांभाळता आले नाही, माझी व्यथा समजून घ्या. महाराज ! तुम्ही मदत पाठविली पण आमच्यापर्यंत ती आलीच नाही. आता तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे." त्याचे हे खरे बोलणे पाहता राजाने त्याचे गुन्हे लक्षात घेता त्याला सौम्य शिक्षा दिली व त्यानंतर त्याला त्या गावाचा मुखिया बनविले व जुन्या मुखीयाला कडक शिक्षा केली.

तात्पर्य-संकटग्रस्त व्यक्तीला योग्यवेळी पोहोचलेली मदत योग्य ते कार्य साध्य करते, अन्यथा संकटात सापडलेल्या जीवांचा जीव जाण्याची शक्यता असते. जर कुणी संकटात असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा