शनिवार, २० जुलै, २०१३

शौर्याचा पुरावा

(कथा क्र.109)

बादशहा अकबराचा दरबार भरला होता. तेवढयात द्वारपालाने येऊन सांगितले की, बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत. ते राजाला काही सांगू इच्‍छितात. अकबराने त्‍यांना दरबारात हजर करण्‍याची आज्ञा केली. ते दोन्‍ही युवक अगदी सुदृढ, पिळदार शरीरयष्‍टीचे होते. त्‍यांच्‍या हातात ढाल व तलवार होती. अकबराने त्‍यांना बोलण्‍याची परवानगी दिली. ते म्‍हणाले, ‘’ आम्‍ही राजपूत आहोत, आमची तुम्‍हाला विनंती आहे की, आम्‍हाला तुमच्‍या सैन्‍यात स्‍थान द्यावे. शौर्य व साहस दाखविता येईल अशी जबाबदारी सोपवावी.’’ अकबराने त्‍यांना विचारले, मी तुमच्‍यावर विश्‍वास कसा ठेवायचा? तुम्‍ही शुरवीर आहात याचे काही प्रमाण आम्‍हाला द्याल काय? दोघेही म्‍हणाले, ‘’पुरावा, प्रमाण म्‍हणजे आम्‍हाला माहितच नाही. आम्‍ही केवळ काम करणे एवढेच जाणतो.’’हे ऐकल्‍यावर बादशहाचा रागाचा पारा चढला, संतापाने तो म्‍हणाला,’ तर मग तुम्‍ही शूर नाही आहात मुळी, आपण मोठे वीर असल्‍याचा आव आणत आहात पण खरे शूर नाहीत. शूर असल्‍याच्‍या बाता मारणा-यांसाठी हा दरबार नाही.’’ बादशहाचे हे आव्‍हानात्‍मक भाषण ऐकून त्‍या दोघांनी देवी भवानीचे स्‍मरण केले व आपल्‍या तलवारी बाहेर काढल्‍या. दोघांनीही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखविले. दोघांच्‍याही तलवारीतुन अक्षरक्ष: ज्‍वाळा बाहेर पडत होत्‍या. दोघांपैकी कुणीच मागे हटत नाही असे दिसत होते.शेवटची चढाई करायची म्‍हणून दोघांनीही ‘जय भवानी’ चा जयघोष केला. एकमेकांच्‍या मानेवर वार करण्‍यासाठी तलवारी सरसावल्‍या. उपस्थित मंडळी श्‍वास रोखून पाहत होती. पहिल्‍याने दुस-याच्‍या मानेवर वार केला, तो पडण्‍याच्‍या बेतात असताना त्‍यानेही तसेच प्रत्‍युत्तर त्‍याला दिले. बादशहा जागेवरून उठून धावला, मरताना ते दोघे म्‍हणाले, राजन, आम्‍ही जन्‍म-मृत्‍युमध्‍ये काहीच अंतर मानत नाही. तुम्‍ही पुरावा मागितला, वीरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता? आम्‍ही तर संधी मिळताच तलवारीच्‍या टोकाला मरण बांधून जगत असतो. अकबराला त्‍याच्‍या कृतीचा पश्‍चाताप झाला. त्‍याने त्‍या दोघांच्‍या कलेवराला कुर्निसात केला. 


तात्‍पर्य-शूरवीर कर्माने नंतर, आधी वाणी, विचार व आचरणातून ओळखले जातात. 


==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा