शुक्रवार, २६ जुलै, २०१३

ऋषी अष्‍टावक्र

(कथा क्र.113)


हिंदू धर्मशास्‍त्रामध्‍ये अष्‍टावक्र नावाचे एक विचारवंत होऊन गेले. असे म्‍हणतात की अष्‍टावक्र हे केवळ कुरुपच नव्‍हते तर त्‍यांचे शरीरही बेढब होते. त्‍यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे होते म्‍हणून त्‍यांना अष्‍टावक्र हे म्‍हटले जात होते. ही एक प्रसिद्ध कथा आहे. अष्‍टावक्र ऋषी एकदा राजा जनक यांच्‍या दरबारात गेले. दोन्‍ही बाजूंनी उंच आसनावर सभासद, ज्ञानी, पंडीत, ज्ञानकर्मी बसले आणि राजा जनकाचे सिंहासन होते. अष्‍टावक्र ऋषींना द्वारपालाने रोखले नाही. अष्‍टावक्र त्‍यावेळी किशोरवयीन होते. अष्‍टावक्राने जेव्‍हा राजा जनकाच्‍या मुख्‍य सभामंडपात प्रवेश केला तेव्‍हा त्‍याच्‍यावर नजर पडताच सर्वजण एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. इतकेच नाही तर त्‍यांचे हसू थांबत नव्‍हते. हे पाहून अष्‍टावक्राला प्रथम काहीच समजले नाही, मात्र त्‍यानंतर त्‍याला आपल्‍यावर हे सर्वजण हसतात म्‍हणून लक्षात आले. हे पाहून तोही जोरजोरात हसू लागला. जनक राजाने सभेला शांत होण्‍याचे आवाहन केले, सभा शांत होताच राजा जनकाने अष्‍टावक्राला विचारले,'' हे साधू, हे लोक तुमच्‍यावर हसतात हे माझ्या लक्षात आले पण तुम्‍ही का हसता आहात हे समजले नाही'' अष्‍टवक्राने उत्तर दिले,'' महाराज, मला वाटले की राजा जनक जो ज्ञानी, विचारवंत आहे त्‍याच्‍या सभेत ज्ञानी, विचारवंत, हुशार लोक असतील पण इथे तर सर्वच जण कातडीकडे व बाह्य स्‍वरूपाकडे पाहणारे लोक आहेत. माझ्या रूपाकडे पाहून हे लोक मला हसत होते हे पाहून मला यांच्‍या बुद्धीची कीव आली व हसू फुटले.'' जनक राजासह सर्व सभा अष्‍टावक्र ऋषींच्‍या या उत्तराने शरमिंदी झाली. 

तात्‍पर्य- माणसाचे महत्‍व त्‍याच्‍या शरीरावर नाही तर त्‍याचे ज्ञान, परिश्रम आणि कर्मावर आहे.
 
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा