मंगळवार, ३० जुलै, २०१३

(माणुसकी)

(कथा क्र.116) 


इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे.
ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला.

तात्‍पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा