गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

संत उमर आणि भटका माणूस

कथा क्र. 177

सूफी संत उमर बगदादमध्‍ये राहत होते. त्‍यांच्‍या ख्‍यातीने प्रभावित होऊन मोठया संख्‍येने लोक त्‍यांच्‍याकडे येत असत. ते सर्वानाच प्रेमाने भेटायचे आणि प्रसन्न व संतुष्‍ट करायचे. एकदा एक भटका माणूस त्‍यांच्‍याकडे भेटण्‍यासाठी आला. जेव्‍हा तो उमर यांच्‍या निवासस्‍थानी पोहोचला तेव्‍हा त्‍याला दिसले की, संत उमर हे एक फकीर म्‍हणवतात पण त्‍यांचे बसायचे आसन हे सोन्‍याचे आहे. खोलीला सगळीकडे जरीचे पडदे लावलेले आहेत आणि रेशमी दो-यांची सजावट होती. दो-यांच्‍या खालील बाजूस सोन्‍याचे घुंगरू बांधलेले होते. चहुकडे सुगंधी अत्तराचा वास दरवळत होता. थोडक्‍यात काय विलास आणि वैभवाची छाया या फकीराच्‍या घरावर पसरलेली दिसत होती. उमर काही बोलण्‍याच्‍या आधीच हा भटका माणूस त्‍यांना म्‍हणाला,'' मी आपली फकीरी ख्‍याती ऐकून आपल्‍या दर्शनासाठी आलो होतो पण येथे आल्‍यावर माझी निराशा झाली. आपण फकीरी सोडून वैभवाचा सागर पसरलेला दिसून येतो आहे.'' संत उमर हसले आणि म्‍हणाले,''हे मात्र खरे आहे, पण तुझी हरकत नसेल तर हे सर्व सोडून मी तुझ्याबरोबर यावयास तयार आहे.'' भटका तयार होताच, उमर यांनी सर्व सोडून नेसत्‍या कपड्यांनिशी ते भटक्‍याबरोबर निघाले. काही अंतर जाताच भटका एके ठिकाणी थांबला व उमर यांना म्‍हणाला,'' तुम्‍ही इथेच थांबा, मी माझा भिक्षेचा कटोरा तुमच्‍या घरी विसरलो आहे. तेवढा मी परत जाऊन घेऊन येतो.'' उमर मोठमोठ्याने हसू लागले आणि भटका अचंबित झाला. त्‍याला काही कळेना की तो असा काय वेगळे बोलला की उमर एवढे मोठ्याने हसताहेत. मग उमर म्‍हणाले,'' अरे मित्रा, तुझ्या सांगण्‍यावरून मी माझे सर्व ऐश्‍वर्य सोडून या रानावनात हिंडायला तयार झालो मात्र तुझी त्‍या कटो-याची आसक्ती मात्र सुटली नाही. मनात जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत मनुष्‍य मोठा होत नाही हे मात्र खरे'' भटक्‍याला आपली चूक कळाली व त्‍याने संतांची माफी मागितली


तात्‍पर्य :- मोहाने लालसा वाढते आणि ती संग्रहवृत्तीला प्रोत्‍साहन देते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा