सोमवार, २४ फेब्रुवारी, २०१४

मानवता

कथा क्र, 181

जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’ संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही


तात्‍पर्य:-ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा